जेव्हा प्रा. बेन्नूर यांनी दिला बॅ. जिना यांच्या स्मृतिस्थळी जाण्यास नकार

न 2007मध्ये माझ्या जीवनात एक आश्चर्यकारक घटना घडली. कराची पाकिस्तानातील (पीप्स – पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ प्रोफेशनल सायन्स) तर्फे 14 एप्रिल 2007ला आंबेडकर जयंती साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही संस्था पूर्णपणे सेकुलर.

मंडळाचे अध्यक्ष कराचीतील एक कोट्यधीश सिंधी ग्रहस्थ, उपाध्यक्ष एक ख्रिश्चन, सचिव मुस्लिम व सहसचिव, एक हिंदू इंजीनियर. याप्रसंगी त्यांना आंबेडकरावर बोलणारे महाराष्ट्रातील तीन वक्ते हवे होते. हिंदी किंवा इंग्रजीतूनच बोलणारे. माझ्या एका मित्राचा मुलगा या मंडळीच्या संपर्कात होता. त्याने माझे नाव सूचवले व माझा मोबाईल नंबर दिला.

मग ती मंडळी मला विनंती करू लागली की आणखीन दोन नावे तुम्हीच सूचवा. मी त्यांना ताबडतोब बेन्नूर सरांचे नाव, त्यांचा फोन क्रमांक त्यांना न विचारताच देऊन टाकला. त्यांना रीतसर निमंत्रण गेले. मला ते म्हणाले की, “पाकिस्तानला जाण्याची माझी अजिबात इच्छा नाही. पण माझे एक नातेवाईक कराचीत असतात, तेवढ्यासाठी मी हे निमंत्रण स्वीकारत आहे.”

मी म्हटलं की, “आपण दोघं जायलाच हवे.” आमचा पूर्ण खर्च ही संस्था करणार होती. मग पासपोर्टसाठी त्यांची व माझी पळापळी. मी सोबत माझ्या पत्नीलाही घेतले होते. बहुतेक 12 एप्रिल 2007ला आम्ही मुंबई विमानतळावरून कराचीला निघालो. कार्यक्रम फाईव्ह स्टार हॉटेलात होता. परतल्यानंतर मी ‘दैनिक लोकमत’मध्ये खूपच विस्ताराने या दौफ्यावर लिहिलेले आहे. बेन्नूर सरांनीदेखील ‘परिवर्तनाचा वाटसरू’मध्ये दीर्घ लेखमाला लिहिली.

कराची येथील दोन महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख मला करावा लागेल. त्यातून सरांची दृष्टी किती निकोप होती व काही प्रश्नाबाबत ती किती हळवे होते, हे लक्षात येईल. पहिली घटना ही बॅ. जिनांच्या स्मृती स्थळासंबंधीची आहे.

आमचा मुक्काम तेथे आठवडाभर होता. कार्यक्रम फक्त एका दिवसाचा. राहिलेल्या दिवसात ते रोज आम्हाला कराचीतील प्रसिद्ध अशा ठिकाणी घेऊन जायचे. त्यापैकी एक ठिकाण होते बॅ. जिनांचे स्मृतिस्थळ. हेच स्मृतिस्थळ कराची येथील सर्वात उंच टेकडीवर अप्रतिमरित्या तयार करण्यात आलेले आहे वर जाण्यासाठी अनेक पायऱ्या आहेत.

वाचा : प्रा. फकरुद्दीन बेन्नूर : संवेदनशील आणि विद्यार्थीप्रिय प्राध्यापक

वाचा : प्रा. फकरुद्दीन बेन्नूर : समन्वयाची संकल्पना प्रत्यक्षात राबवणारे सुधारक

आयोजक आम्हाला तेथे घेऊन गेले व म्हणाले, “तुम्ही वर जाऊन पाहून या निवांतपणे. तोपर्यंत आम्ही आमची काही कामे आटोपून घेऊत.” मी, पत्नी व सर असे तिघे स्मृतिस्थळाकडे निघालो. एक दोन पायऱ्या चढल्यानंतर ते थांबले आणि हुंदके देऊन रडू लागले.

म्हणाले, “मी वर येणार नाही.” आम्ही दोघे घाबरलो. मी म्हटलं, “काही त्रास होतोय का? दवाखान्यात जाऊयात.” ते रडत म्हणाले, “त्रास या गोष्टीचा आहे की ज्या माणसामुळे मुसलमानांना भारतात जगणे अवघड होऊन गेलेले आहे, त्याच्या कबरीकडे मी का म्हणून येऊ?” आणि ते जिनाबद्दल खूप काहीं वेडेवाकडे बोलू लागले आणि हुंदके देत रडू लागले. बरे झाले हे ते सर्व मराठीतून बोलत होते. येणाऱ्या जाणाऱ्यानी ते ऐकले असते, तर तेथे तमाशा झाला असता. कदाचित आम्हाला तिथे राहणे अवघड झाले असते.

त्यांचे म्हणणे पूर्ण खरे होते. ते पायरीवर बसले आणि म्हणाले, “तुम्ही पाहून या. मी नाही येणार.” आम्ही दोघे त्यांच्या जवळ बसलो, पाठीवर हात ठेवला. मी म्हटले, “तुम्ही जर वर येणार नसाल तर आम्हीदेखील वर जाणार नाही. आमची पाहण्याची इच्छा नाही.”

नंतर मी म्हणालो, “ही वस्तुस्थिती जरी असली तरी इतक्या दूर आलोत पाहून घ्यायला काय हरकत आहे?” त्यांना खूप समजावे लागले. हळूहळू त्याचे रडणे थांबले. हळवेपणातून ते थोडेसे बाहेर आले आणि माझा हट्ट पाहून मी येतोय असे म्हणून ते निघाले.

त्या हॉटेलात सर्वांच्या जेवणाची व्यवस्था एका मोठ्या हॉलमध्ये बुफे पद्धतीने करण्यात आलेली होती. मांसाचे डझनावारी पदार्थ तेथे मांडण्यात आले होते. एका अत्यंत आकर्षक अशा मांसाचा तुकडा मी व बेन्नूर सर यांनी घेतला. माझ्या पत्नीसोबत कराची येथील एका हिंदू संस्थेची सेक्रेटरी शर्मा नावाची बाई होती. ती माझ्या पत्नीला आमच्याकडे बोट दाखवून काहीतरी म्हणाली असावी.

माझी पत्नी आपला प्लेट हातात घेऊन धावत माझ्याकडे आली व मराठीतून जोरात म्हणाली तो मांसाचा तुकडा ताबडतोब काढून फेकून द्या. ते गोमांस आहे. सरांनी पटकन आपला तो तुकडा जिथून उचलला होता तेथे ठेवला. मला तो खाण्याचा मोह झाला. मी पत्नीला म्हणालो, “काय फरक पडणार आहे.”

तर सर माझ्याकडे खूप रागाने पाहत राहिले आणि माझ्या प्लेटमधील तुकडा उचलून तो जेथून उचलला होता तेथे ठेवून दिला. आणि म्हणाले, “हे असले प्रकार येथे करायचे नाहीत. माझ्या सोबत हे चालणार नाही!” आणि हे सर्व काही सेकंदात घडले.

वाचा : दिलीपकुमार : मुस्लिम ओबीसी चळवळीचे ‘अर्ध्वयू’

वाचा : प्रशासकीय बदल की लक्षद्वीपच्या संस्कृतीवर हल्ला?

आश्चर्यजनक संघटन कौशल्य

प्रा. बेन्नूर यांचे संघटन कौशल्य आश्चर्यजनक होते. त्यांनी महाराष्ट्रात ‘मुस्लिम मराठी साहित्य परिषद’, ‘ओबीसी संघटने’चे शेकडो कार्यकर्ते उभे केले. हळूहळू या संघटनेबद्दल देखील त्यांचा भ्रमनिरास सुरू झाला. पुन्हा तेच ही मंडळी मला आता बाजूला काढतात.

अगदी विलास सोनवणेपासून नदाफपर्यंत ते आपल्या तक्रारी माझ्यासमोर ठेवू लागले. फोनवर मला ते आपली व्यथा बोलून दाखवत. जेव्हा संघटना स्वतःच्या पायावर उभी राहते, त्या वेळी संघटनेच्या निर्मात्यास मंडळी बाहेर करतात ही त्यांची व्यथा. पण एक झाले, यामुळे अखिल भारतीय स्तरावर एक मुस्लिम विचारवंत म्हणून त्यांची ओळख पक्की झाली.

आमच्या दोघांच्या जीवनात भोगलेल्या दुःखात खूप मोठे साम्य होते. आम्हा दोघातील संवाद खूप आत्मीयतेचे व पारदर्शी होते. मी जर एखाद्या तणावातून जात असेन तर ते खूप अस्वस्थ व्हायचे आणि माझीदेखील तशीच अवस्था व्हायची.

मी सोलापुरी त्यांच्या जुन्या घरी जायचो, त्या वेळी म्हणायचो, “यार ‘प्यासा’ची गाणी किंवा बेगम अख्तरच्या गजलांची रेकॉर्ड लावा ना.” त्यावेळी ते मला म्हणायचे, “तुम्हाला यार संगीतातले, गाण्यातले काहीच कळत नाही. गज़ल किंवा शास्त्रीय संगीतातील राग ऐकण्याच्या काही वेळा निश्चित असतात. कधीही काही ऐकायचे नसते. त्या विशिष्ट वेळातच ते ऐकले पाहिजे. रात्रीची शांतता असावी, एकांत असावा.”

अशा वेळी मी म्हणायचो, “दुःखाची गाणी, रात्रीच्या अंधारात आणि नीरव शांततेत. बापरे ! त्या वातावरणात ते ऐकून मनाची काय अवस्था होईल. अंधार आणि एकांत!” ते म्हणाले, “या जीवनात एकटेपण आणि अंधारच आहे. तर अंधारात बसून अशी गाणी ऐकणे जास्त चांगले असते.” ते म्हणाले, “तुमच्या तरी जीवनात अंधार आणि एकटेपणा शिवाय काय आहे?”

मी म्हणालो, “तरी देखील मी त्या अंधारात प्रकाश पहात असतो ना. अंधाराचे, एक टेपणाचे विष पीत असतो ना.” ते म्हणाले, “तुम्ही व्हा शिवजी, मी तर होणार नाही.”

आम्ही दोघे आठवड्यातून किमान एकदा तर फोन वरून बोलायचे. बऱ्याच दिवसांत जर त्यांचा फोन आला नाही तर मी त्यांना फोन करायचा. कसे आहात? माझा प्रश्न. तिकडून उत्तर यायचे मरत नाही म्हणून जगतोय. मला लक्षात यायचं की मामला गंभीर आहे. मग रविवारी सरळ सोलापुरी. घरी पोहचलो. काहीच बोलत नाहीत.

मला लक्षात येते की ते अजून सामान्य झालेले नाहीत. मी टेबलावर हळूच ‘म्हातारा संन्यासी’ ठेवतो. दोघांना जोडणारा हा संन्यासी. सोलापुरात उतरल्यावर मी त्याला सोबत घेतला होता. त्याशिवाय काही नमकीन. त्याकडे हळूच पाहत राहिले. उठून दोन ग्लास घेऊन येतात. आणि एक-एक घोट अगदी संथपणे ते घेऊ लागतात. एका पेगवर ते कधीच घेत नाहीत. मी पटकन घेणाऱ्यांपैकी. मला त्यावर ती खूप रागवायचे.

मी तेथे पोहचलो असेल अकरा साडेअकराला. एक-दीडला ते बाहेर जाण्यासाठी तयार होतात. तेथून ते मला आपल्या एम80 स्कूटरवर हैदराबाद रोडवरील एका ढाब्यावर घेऊन जातात. ढाबेवाला त्यांना चांगला ओळखतो. न सांगता आमच्यासमोर मटणाचे लोणचे, मटन मसाला व ज्वारीच्या गरम भाकरी आणून ठेवतो.

जेवल्यानंतर हळूहळू ते बोलू लागतात. नेहमी प्रमाणे गप्पा. कॉलेजच्या मुलींचे, मुलांचे, प्राध्यापकांचे, विद्यार्थ्यांचे कारनामे, लफडी, प्राध्यापकांचे नमुने वगैरे वगैरे. गंभीर विषयावर जवळपास नाहीच. एक दीड तासानंतर ते मला सरळ बस स्टँडवर घेऊन जातात. लातूरच्या बसमध्ये बसवतात.

त्या काळी ते सतत चारमिनार ओढायचे. बहुतेक सेवानिवृत्तीनंतर त्यांनी ती सोडली. आजारपणामुळे नंतर ‘म्हातारा संन्यासी’देखील दूर करावा लागला.

वाचा : ‘ऑक्सफॅम अहवाल २०२१’ म्हणजे विषमतेचा विषाणू

वाचा : करोना महामारीचे सांप्रदायिकीकरण

जाने वो कैसे लोग थे

प्रा. बेन्नूर सरांचे शेवटचे दिवस खूप ताण तणावाचे, त्रासाचे, दुःखाचे गेले. बरेच दिवस ते पुण्याकडे भावाकडे राहत. एकदा मी त्यांना तेथे जाऊन भेटलो होतो. या काळात त्यांचे लेखन जोमाने सुरू होते. आत्मकथा ‘कुदरत’देखील ते लिहित होते. त्यांचा आजार खूप वाढला होता.

आयुर्वेद, होमिओपॅथी, ऍलोपॅथीचे उपचार चालले होते. फारसा गुण येत नव्हता. मला समजले की ते खूपच आजारी आहेत व सोलापुरी आलेले आहेत आणि एके दिवशी सकाळी अचानक त्यांचा फोन आला. आवाज खूपच क्षीण होता. म्हणाले, “आता मी फार दिवस जगणार नाही, भेटायला या.” जीवनात पहिल्यांदा मला ते स्वतःहून भेटायला बोलावत होते. त्यांच्या या आवाजाने मी खूप अस्वस्थ झालो आणि म्हणालो मी येईन.

नंतर मी पत्नीला ही बातमी सांगितली. ती म्हणाली, “आता वेळ घालायचं नाही. उद्या निघुत.” मी त्यांना लगेच फोन करून सांगितले, “उद्या आम्ही दोघे तुमच्याकडे येत आहोत.” दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ-साडेनऊला त्यांचा फोन आला. मी म्हणालो, “निघालोय.”

पुन्हा अकरा वाजता फोन आला. “कुठपर्यंत आलात.” म्हणालो. “उजनी पर्यंत.” मला लक्षात आले परिस्थिती गंभीर आहे, आता कुठे थांबायचे नाही. सरळ सोलापूर. तुळजापूर पर्यंत आलो की पुन्हा फोन कुठपर्यंत पोचलात? शेवटी एकदाचा पोहचलो.

पत्नी म्हणाली, “तुम्ही दोघे मित्र आहात. मोकळेपणाने बोलत बसा. मी गाडीत बसून राहीन. गप्पा संपल्या की फोन करा. मी येईन.” त्यांना भेटून ती गेली. आमच्या गप्पा सुरू झाल्या. मी त्यांना म्हणालो, “तुमचा ‘गौरवग्रंथ’ तयार झालेला आहे. कलीम अजीमनी खूप प्रयत्नपूर्वक हा गौरव ग्रंथ तयार केलेला आहे. माझा त्यात कसलेच योगदान नसताना देखील संपादक म्हणून त्यांनी माझे नाव दिलेले आहे.”

हे ऐकून ते केवळ हसले. मी म्हणालो, “केवळ दहा-पंधरा दिवसात तो ग्रंथ तयार होईल आणि इथे सोलापुरात तुमचा भव्य नागरी सत्कार करण्यात येईल.”

ते म्हणाले, “मी तिथे येऊ शकणार नाही.” मी म्हणालो, “आम्ही तुम्हाला व्हीलचेअरवर तेथे घेऊन जाऊ. तुमची फक्त उपस्थिती राहिल.” ते म्हणाले, “तोपर्यंत मी जगलो तर ना!”

त्यानंतर ते म्हणाले, “माझी बरीच पुस्तके तयार आहेत. आजपर्यंत याकडे कोणी लक्ष दिले नाही. पण कलीम अजीम आणि सरफराज अहमद खूप मेहनत घेत आहेत. आणि त्यांच्याच प्रयत्नांमुळे काही ग्रंथ आता प्रकाशित होतील. आयुष्यात पहिल्यांदा त्यांना साथ देणारे दोघे भेटले याचा मला आनंद झाला.

नंतर ते उस्मानाबादचे डॉक्टर, विलास सोनवणे, नदीफ यांच्या बद्दल तक्रार करू लागले. मला सतत वाटायचे की असे का होत असावे? गप्पा सुरू होऊन अवघे वीस-पंचवीस मिनिटे अजून झालेली झाली नव्हती की त्यांनी मोबाईल लावला आणि म्हणाले, “या सर आलेत.” आणि डोळे पण बंद करून घेतले. मी चुपचाप बसून.

सरफराज आले. ते म्हणाले, “सरांनी मला बोलावलं होतं तुम्ही आलात म्हणून.” मी त्यांना म्हणालो, “आपण बाहेर बसून गप्पा मारूत.” त्यांनी डोळे उघडले व माझ्याकडे पाहून म्हणाले, “आता तुम्ही येथेच बसून गप्पा मारा.” आमच्या गप्पा सुरू होऊन पाच-दहा मिनिट झाले असतील-नसतील ही त्यांनी डोळे उघडले आणि म्हणाले, “तुम्ही इथून जा बरं ताबडतोब.”

लातूरहून निघाल्यापासून जो माणूस फोन करून विचारतो की लवकर या, लवकर या.. आणि आता येथून जा म्हणतोय. त्यांची बहीण बहुतेक हे सर्व ऐकत असावी. ती बाहेर येऊन म्हणाली, अलीकडे भय्या असेच बोलतात. प्रेमाने बोलावतील आणि लगेच झिडकारतील.. तुम्ही काही मनावर घेऊ नका. औषध घेणेदेखील त्यांनी सोडलेले आहे.

त्यांचा रागीट चेहरा पाहून मी व सरफराज निराश मनाने बाहेर पडलो. पत्नीला फोन लावला. ती म्हणाली, “इतक्या लवकर संपल्या गप्पा.” मी काहीच म्हणालो नाही. ती आली. आत जाऊन त्यांचा निरोप घेतला. माझा चेहरा पाहून ती काहीच बोलली नाही. आधी ठरवले होते की सरांशी गप्पा झाल्यावर सरळ हैदराबाद रोडवर जाऊन त्या ढाबावरचे जेवण पत्नीला द्यावे. पण आता कसलाही उत्साह नव्हता. आता सर जगणार नाहीत, हे आम्हा दोघांनाही स्पष्ट झाले होते.

उदास मन:स्थितीत गाडीत बसलो. ड्रायव्हरला म्हणालो, “आता सरळ उजनी. सकाळपासून आम्हा तिघांपैकी काही खाल्लेल नव्हते.

आणि नंतरच्या पाच दिवसातच निरोप आला की सर गेले. डॉक्टर एहसानउल्ला कादरी (लातूर) यांचा फोन आला, मी गाडी काढतोय. बेन्नुरांच्या दफनविधीसाठी साठी जाऊत. याच कादरीजींनी अनेक प्रयत्नातून बुलडाणा की अकोला येथील एका युनानी वैद्याचे औषध सरांसाठी आणून दिले होते. त्या औषधांनी त्यांना गुणही येत होता. पण त्यांनी ते औषध घेणे ही बंद केले होते. ते स्वतःहून मरणाला सामोरे गेले होते.

थोड्या वेळानंतर शहाजिंदेचा फोन आला. “तयार व्हा सर. जायचे आहे.” मी म्हणालो, “मी येणार नाही. मला सहन होणार नाही. तेथे मला काही झाले तर तुम्हा सर्वांची पंचाईत होईल. माझा आता स्वतःवरच विश्वास नाही. जवळपास 55 वर्षांचा हा संबंध. मी हे सर्व सहन करू शकणार नाही.”

त्यांच्या ओठावर सतत ‘प्यासा’ चित्रपटातील या गीताच्या ओळी असायच्या.

“जाने वो कैसे लोग थे जिनके

प्यार को प्यार मिला

हमने तो जब कलियाँ माँगी

काँटों का हार मिला

जाने वो …

खुशियों की मंज़िल ढूँढी तो

ग़म की गर्द मिली

चाहत के नग़मे चाहे तो

आँहें सर्द मिली

दिल के बोझ को दूना कर गया जो ग़मखार मिला

हमने तो जब …”

आपल्यामागे विलक्षण असे विचारधन ठेवून ते गेले. आता त्यांचे लेखन प्रकाशित करण्याच्या कामी यूसुफ बेन्नूर, कलीम अजीम, सरफराज लागलेले आहेत. दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. आणखी पाच प्रकाशकाकडे आहेत, ती यथावकाश प्रकाशित होतील. शिवाय अजून बरेच लेखन संकलन करणे सुरू आहे. त्यातूनही चांगली पुस्तके आकाराला येतील.

आम्हा दोघांच्या संबंधात कधीही जात-धर्म आडवा आला नाही. माझ्या कुटुंबातील कुणीही त्यांना वेगळा असा मानला नाही. आम्ही निखळ माणुसकीच्या नात्याने बांधलेले होतो. ते गेले माझ्या मनाचा एक कोपरा कायमपणे रिकामा ठेवून गेले. त्यांच्या आवडत्या गाण्याच्या ओळी म्हणतच मला आता जगावे लागेल.

“बिछड गया हर साथी,

देकर पल दो पल का साथ

इसको ही जीना कहते हैं तो यूंही जी लेंगे

उफ न करेंगे, लब सी लेंगे, आंसू पी लेंगे.”

जाता जाता :