अनिस चिश्ती : इस्लामी तत्त्वज्ञानाचे मराठी विचारवंत

स्लामी तत्त्वज्ञानाचे ज्येष्ठ विचारवंत अनिस चिश्ती यांचे पुण्यात निधन झाले. त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यानंतर शहरातील दोन तीन हॉस्पिटलमध्ये त्यांना नेण्यात आले. मात्र तिथे बेड शिल्लक नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ वेळेवर उपचार होऊ शकले नाही. त्यातच त्यांचे निधन झाले.

अनिस चिश्ती यांचा जन्म पुण्यातलाच. मराठी वातावरणात ते वाढले. सुरुवातीच्या काळात काही वर्षे त्यांनी अध्यापनाचे काम केले. उर्दू या विषयाचे अत्यंत लोकप्रिय शिक्षक होते. महाराष्ट्र राज्यातील नववी व बारावीच्या क्रमिक पुस्तकांमधून त्यांच्या लेखनाचा समावेश आहे. अवघड विषय साधा, सोपा आणि सुलभ करून सांगण्यामध्ये त्यांची हातोटी होती. मराठी, उर्दू आणि पर्शियन भाषेचे जाणकार होते. शिवाय इंग्रजीवरदेखील त्यांची उत्तम पकड होती.

‘इस्लामी तत्त्वज्ञान’, ‘न्यायशास्त्र (फिकह)’ व ‘कुरआन’चे ते अभ्यासक होते. मराठी भाषिकांना साध्या व सोप्या भाषेत इस्लाम समजून घेण्यासाठी त्यांनी ओघवत्या भाषेत पुस्तके व लेखमाला लिहिल्या आहेत.

वाचा : साहित्य-संस्कृती व्यवहारातील पालखीवाहू ‘मुस्लिम’

वाचा : कलीम खान : साहित्यातील आधुनिक कबीर

इस्लामच्या अभ्यासाची साधने मराठी भाषेत आणण्यासाठी चिश्ती यांनी मोठे प्रयत्न केले होते. त्यांनी माधव विनायक प्रधान या जंजिऱ्याच्या नवाबकडे तैनात असणाऱ्या मराठी विद्वानाने लिहिलेले प्रेषितांच्या चरित्राचे संकलन करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. शंभर वर्षांपूर्वी लिहिलेले हे प्रेषित चरित्र आज मराठी भाषेचा उत्तम ठेवा आहे. चिश्ती यांच्या अथक प्रयत्नामुळे हे दुर्लभ ग्रंथ मराठी भाषकांसाठी उपलब्ध होऊ शकला.

दरवर्षी रमजान महिन्यात ते अग्रणी वृत्तपत्रात इस्लामविषयक सदर लिहित. शिवाय इतर वेळीदेखील त्यांची सदरे वाचकांच्या भेटीला नियमित येत. उर्दू साहित्य व इस्लाम हे त्यांच्या आवडीचे विषय. लिहिताना मात्र त्यांनी नेहमी मराठी भाषेचा आग्रह धरला. उर्दू व इंग्रजी भाषेतही त्यांनी काही पुस्तके लिहिली आहेत.

इस्लामचे अभ्यासक व उत्तम वक्ता म्हणून ते परिचित होते. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे ते सदस्य होते. शिवाय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य शिक्षण व प्रशिक्षण शास्त्र संशोधन संस्था, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन, नवतुल उलेमा लखनऊ, नॅशनल कौन्सिल फॉर प्रमोशन ऑफ उर्दू लँग्वेज अशा अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक संस्थांशी ते निगडित होते.

मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे संस्थापक मौलाना अलीमियां नदवी यांचे ते जवळचे सहकारी होते. त्यांनी नदवींच्या काही पुस्तकांचे मराठी भाषांतर केले होते. भारतीय मुस्लिमांचा जीवनव्यवहार आणि संस्कृती, प्रथा, परंपरांविषयीचे अलीमियां नदवी यांच्या पुस्तकाचे मराठीत केलेल्या भाषांतराला मोठा प्रतिसाद मिळाला होता.

मुस्लिम समाज व त्यांच्या सांस्कृतिक परंपरांचा चिश्ती यांना चांगला अभ्यास होता. डॉ. इकबाल यांच्या तत्त्वज्ञानाचा त्यांनी विशेष अभ्यास करून एका ग्रंथाची निर्मीती त्यांनी केलेली आहे. इकबालप्रणित राष्ट्रवादाच्या सिध्दान्तावर आणि नंतर आकारास आलेल्या विश्वबंधुत्वाच्या संकल्पनेवर त्यांनी लिखाण केले आहे.

वाचा : रफिक झकारिया : एक समर्पित राजकारणी आणि विचारवंत

वाचा : ‘ऑक्सफॅम अहवाल २०२१’ म्हणजे विषमतेचा विषाणू

इकबालवरील त्यांच्या गाजलेल्या उर्दू पुस्तकाचे मराठी भाषांतर प्रकाशित होण्याच्या मार्गावर होते. पुण्यातील एका मराठी प्रकाशकाकडे गेल्या वर्षांपासून ते पडून आहे. हे पुस्तक लवकर यावे, अशी त्यांची इच्छा होती. इकबालवरील त्यांचे बहुप्रतिक्षित पुस्तक गाजिउद्दीन रिसर्च सेंटरला प्रकाशनासाठी देण्याचा त्यांनी शब्द दिला होता. त्यात काही दुरुस्ता व नवीन मांडणी करण्याचे काम सुरू होते.

उर्दू आणि फारसी साहित्याचा त्यांचा अभ्यास, त्याकडे पाहण्याची त्यांची दृष्टी अतिशय महत्त्वाची होती. मराठी भाषेतली उत्तम ग्रंथ उर्दू भाषेत आले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. शिवाय उर्दूतील अनेक महत्त्वाची ग्रंथ मराठीत आली पाहिजे, असेही ते म्हणायचे. असे काम करणाऱ्या गाजिउद्दीन रिसर्च सेंटरचा ते सार्वजनिक कार्यक्रमात आवार्जून उल्लेख करायचे.

त्यांच्या मागे एक मुलगी आणि नातवंडे आहेत. पत्नीचे २०१६ मध्ये निधन झाले. सोमवारी इशा नमाजनंतर त्यांच्यावर पुण्यात निवडक लोकांच्या उपस्थित मुहम्म्दिया क़ब्रस्तानमध्ये दफनविधी झाला. रात्रीचा लॉकडाऊन असल्याने शहरातील प्रतिष्ठित नागरिक पोहचू शकले नाही. अनेक मान्यवरांनी त्यांना सोशल मीडियातून आदरांजली वाहिली आहे.

कुरआन व  इस्लामी तत्त्वज्ञान शिकवण्यासाठी त्यांनी सौदी अरब, अरब अमिरात, तुर्कस्तान, इंग्लंड, कॅनडा, अमेरिका, जॉर्डन, सीरिया,  इटली, फ्रान्स, इजिप्तसह अनेक देशांचा अनेकवेळा दौरा केला होता.

वाचा : भारतात धार्मिक स्वातंत्र्याची अवस्था बिकट का होतेय?

वाचा : पश्चिम बंगाल निवडणुकीत काँग्रेसची ‘मुस्लिममुक्त’ धोरणे

इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इंटिग्रेशन येथे भारतीय सेना पदाधिकाऱ्यांना तसेच मसुरी व महाराष्ट्रातील प्रबोधिनी येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांना धर्मशास्त्र, सद्भावना, मानवी ऐक्य इत्यादी विषयांचे प्रशिक्षण त्यांनी दिले होते. ‘सेना प्रशिक्षण कमान’तर्फे त्यांना ‘आर्मी कमांडर्स कमेन्डेशन कार्ड’ प्रदान करण्यात आले होते. विशेष म्हणजे भारतीय सेनेच्या इतिहासात प्रथमच एका बिनलष्करी व्यक्तीला असा सन्मान देण्यात आला आहे.

पुण्यातील विविध सांस्कृतिक व साहित्यिक कार्यक्रमात त्यांचा सतत वावर असायचा. डिसेंबरमध्ये पुण्यातील गदिमा यांच्या स्मारकाच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते भर पावसात सामील झाले होते. शहारतील विविध आंदोलने, निदर्शने व इतर सांस्कृतिक घडामोडीत ते हमखास सामील असायचे.

मराठी, उर्दू व इंग्रजी भाषेतून त्यांची ५० हून अधिक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. मराठी वर्तमानपत्रे, मासिके आणि दिवाळी अंकातून ते नियमित लिहित असत. त्यांच्या अनेक लेखमाला ‘सकाळ’,  ‘लोकमत’, ‘लोकसत्ता’ आणि अन्य वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या आहेत. डेक्कन क्वेस्टच्या वतीने त्यांना खिराजे अकीदत.

जाता जाता: