मीच दिल्ली, मीच केरळ, मीच हिंदुस्थान आहे
मरणही माझे भुईला, कुंकवाचे दान आहे
बाबरी मस्जिद असो वा जन्मभू पुरुषोत्तमाची
माझियासाठी अयोध्या आदराचे स्थान आहे
असा उदात्त दृष्टिकोन असलेला साहित्यातील तारा मावळला, यवतमाळ जिल्ह्यातील आर्णिचे जेष्ठ साहित्यिक आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य पदावरून निवृत्त झालेले कलीम खान सरांनी मराठी हिंदी इंग्रजी संस्कृत आणि ऊर्दू भाषेवर कमालीचे प्रभुत्व मिळवले होते.
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी गाव तसे तर गंगा-जमुनी तहजिबचे गाव. गावात होणाऱ्या अनेक धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमातून खान सरांचा पिंड घडत गेला.
राष्ट्रीय स्तराच्या अनेक कव्वालांच्या कव्वालीच्या माध्यमातून त्यांच्यावर वृत्त गझल यांचे संस्कार झाले आणि या संस्काराचे अनेक पैलू त्यांच्या साहित्यात आणि जगण्यात आढळून येतात.
वाचा : कलीम खान : पुरस्कार नाकारणारे जगावेगळे वल्ली
वाचा : मराठीतील ‘कोहिनूर-ए-गझल’ इलाही जमादार
गज़लकार कवी सोबतच ते उत्तम असे निवेदक म्हणून साऱ्या महाराष्ट्राला परिचित आहेत, ग्रामीण नागरी संस्कृतीचा सुंदर मिलाफ त्यांच्या निवेदनात आढळायचा, भाषेचे सारे भेद कलीमसरांजवळ लोप पावत असे.
फारसी, उर्दू, हिंदी, मराठी, संस्कृत या भाषेतील गज़ल, शेर, अभंग, ओव्या, कविता यांचे पाठांतरण आणि समयसूचकतेनूसार वापर हे त्यांच्या निवेदनातील कमालीचे सामर्थ्य होते.
पानी पीने को नही
ऐसा अपना देश
चला चांद पर ढुंढने
पानी के अवशेष
या आशयाचे दोहे अखिल मानवतेचा पुरस्कार करतात,
तुझ्या घरात जीवना शिरुन पाहिले जरा
मुठीत श्वास पोरके धरून पाहीले जरा
दगा दिलास तू मला असे तरी म्हणू कसे
मलाच मी भुईत या पुरुन पाहिले जरा.
या अशा अनेक त्यांच्या व्यापक अशा रचना आहे, त्यांची गजल म्हणजे मातीमध्ये उगवूनसुद्धा मेघापर्यत पोहचली आहे, वेगळा बाज, वेगळ्या धाटणीची त्यांची गजल, त्यांच्या एकुणच साहित्यात अर्वाचीन प्राचीन मध्ययुगीन संस्कृतीचा मिलाफ आहे.
वाचा : शायर ए आजम ‘साहिर लुधियानवी’ स्त्रियांसाठी मसिहा
वाचा : प्रगतिशील कविंच्या उर्दू शायरीतून ‘नेहरू दर्शन’
जन्माने मुस्लिम असलेले कलीम सर भारतीय संस्कृतीचे खंदे समर्थक होते, गीता, कुरआन, धम्मपदावर ते अगदी सहजपणे अधिकारवाणीने बोलायचे. भगवद्गीतेवर त्यांची महाराष्ट्रभर अनेक व्याख्यान झाली आहे. त्यांचे विद्यार्थी त्यांना आधुनिक कबीर मानायचे,
मुखीया माझिया गोड वाणी मराठी
मला शोधण्याची निशाणी मराठी
जरी मातृभाषा मराठी न माझी
उभ्या जीवनाची कहाणी मराठी.
त्यांची गज़ल वैचारिक बैठकीची आणि चिंतनशिल आहे. दोहे आणि गजल यातून ते जीवनाचे साधे सोपे तत्त्वज्ञान मांडायचे.
“काव्य म्हणजे शब्द वजा करुन जो भाव प्रकट होतो तोची काव्य म्हणावा”, काव्याची इतकी साधी सरळ व्याख्या त्यांनी केली.
‘गज़ल कौमुदी’, ‘कलीम के दोहे’, ‘मंजर’, ‘कलीम च्या कविता’, हे प्रकाशित साहित्य ‘चांद की टहनीया’, ‘सूर्याच्या पारंब्या’, ‘कलीमच्या रुबाईया’ हे त्यांचे प्रकाशनाच्या वाटेवर असलेले साहित्य.
साहित्याच्या विविध विचारधारेत त्यांनी कधीच स्वतःची विभागणी होऊ दिली नाही. कलीम सरांनी फक्त माणुसकी जपली म्हणूनच साहित्याच्या प्रत्येक मंचावर त्यांची उपस्थिती आवर्जून असायची.
कलीम सरांचं एकाएकी जाण मनाला चटका लावून जाणारं आहे, त्यांच्या जाण्यामुळे मराठी साहित्यातील गंगा-जमुनी तहजिब जिवापाड जपणाऱ्या प्रत्येकाची कधीच भरुन निघणारी वैयक्तिक हानी झाली आहे.
जाता जाता ‘चांद की टहनिया’ मधून काही ओळी-
जिंदगी तेरे सहरा मे मै क्यू रहू
मौत की सुन बुलाती है हसीं वादीया.
जाता जाता :
लेखक साहित्यिक, कवी असून सावनेर येथे राज्य परिवहन महामंडळात कार्यरत आहेत.