नाशिक येथे होत असलेल्या 94व्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’चे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर आहेत. प्रकृती अस्वस्थामुळे ते संमेलनाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांचे अध्यक्षीय भाषण एका चित्रफितीच्या माध्यमातून संमेलनाच्या उद्घाटनावेळी दाखवण्यात आले. त्यांचे अनकट भाषण, खास तुमच्यासाठी…
उपस्थित साहित्यप्रेमी श्रोते मंडळी, सर्वप्रथम आजच्या महत्वाच्या प्रसंगी मला माझे विचार मांडायला संधी दिलीत याबद्दल आपणा सर्वांचे आभार मानतो. तसेच माझे भाषण आपल्या पसंतीस उतरले नाही तर त्याबाबत आधीच दिलगिरी व्यक्त करतो.
कुठल्याही भाषेतले साहित्य ती भाषा वापरणाऱ्या समाजातील घडामोडींनी प्रभावित झालेले असते. साहित्याचा काहीही विषय असो, ते लिहिणारा त्याच्या भोवतालच्या परिस्थितीपासून अलिप्त राहू शकत नाही.
एखाद्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत “ह्या पुस्तकातील घटना व पात्रे काल्पनिक असून त्यांचा प्रत्यक्षाशी काहीही संबंध नाही.” इत्यादी विधाने सापडतात. त्यांनी कायद्याचे समाधान होत असेल, पण लेखकाने आत्मपरीक्षण केल्यास त्याला अशा विधानात तथ्य नसल्याचे आढळून येईल. परंतु याचा अर्थ असा नव्हे की, सामाजिक घडामोडीचे संपूर्ण प्रतिबिंब साहित्यात उमटते.
एखादी भाषा पुष्कळ विकसित असेल तर समाजाचे बहुतेक पैलू त्यात उमटतात. परंतु काही महत्वाचे पैलू भाषेकडून उपेक्षिले गेले तर त्या बाबतीत तिला असमृद्ध समजले पाहिजे. अशा मानदंडाद्वारे आपण असे म्हणू शकतो की इंग्रजी भाषा मराठी भाषेपेक्षा अधिक समृद्ध आहे.
मराठीचे अपूर्णत्व सर्वात जास्त जर कुठे जाणवत असेल तर ते विज्ञान-साहित्याबाबतीत. विसावे शतक हे विज्ञानाचे शतक म्हटल्यास चूक ठरणार नाही. आइन्स्टाइनचा सापेक्षतावाद आणि प्लांक-आइन्स्टाइन-बोर यांचा पुंजवाद हे दोन महत्त्वाचे मूलभूत सिद्धांत ह्या शतकाच्या पहिल्या पंधरा वर्षात भौतिकशास्त्राला मिळाले.
अमूर्त गणिताच्या अनेक नव्या शाखा ह्या शतकात चालू झाल्या. वर्षानुवर्षे न सुटू शकणारे प्रश्न चुटकीसरशी सोडवणारी गणकयंत्रे ह्या शतकाच्या उत्तरार्धात निघाली. विश्वाचे विराट दर्शन आणि अणूच्या अंतरंगाचे सूक्ष्म दर्शन मानवाला आज पहायला मिळत आहे. जीवशास्त्राच्या मुळाशी असलेला डी.एन.ए. रेणू शास्त्रज्ञांना सुमारे सहा दशकांपूर्वी गवसला. विज्ञानाची ही गरुडझेप तंत्रज्ञानाच्या रूपाने मानवी जीवन अधिक प्रगत, विकसित करायला कारणीभूत ठरली.
विज्ञान-साहित्य म्हणजे काय?
वैज्ञानिक संशोधनाचे प्रबंध किंवा एखाद्या विषयातील पोटशाखेत जागतिक स्तरावरील संशोधनाचा आढावा यांना मी विज्ञान-साहित्यात धरत नाही. परंतु एखादा वैज्ञानिक शोध जनसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी लिहिलेले लेख मी विज्ञान-साहित्यात धरेन. अर्थात एखाद्या वैज्ञानिक कल्पनेला मुळाशी धरून त्याभोवती रचलेली कथा किंवा कादंबरी मी विज्ञान-साहित्य म्हणून मानली तर त्याबद्दल कोणाचा आक्षेप असू नये.
मराठीतील विज्ञान-साहित्याकडे वळण्यापूर्वी मी इंग्रजी भाषेतील काही उदाहरणे घेतो. केवळ एक अपवाद (पहिलाच!) सोडून! या आधीच्या शतकात विज्ञानयुगाची चाहूल लागली असे म्हणायला हरकत नाही. टेलिग्राफ, टेलीफोन, आगगाड्या, औद्योगिक क्रांती यांचा अनुभव अनेक देशांना झाला होता. अशा पार्श्वभूमीवर जुल्स व्हर्न याने ‘ऐशी दिवसांत पृथ्वीप्रदक्षिणा’अशासारखे पुस्तक लिहिले.
त्या कादंबरीतील कथानकात वर नमूद केलेल्या वैज्ञानिक साधनांचा उपयोग होताच, परंतु विज्ञान कादंबरी म्हणता येईल असे त्याच्यात काय होते? पृथ्वीप्रदिक्षणा पूर्वेकडे जात केली तर दिवस रात्र मिळून २४ तासांहून कमी होतात.
आजच्या जेट विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशाला ह्याचा प्रत्यय लगेच येतो. पण जहाजाने हळूहळू प्रवास करताना हे तितकेसे जाणवत नाही. त्यामुळे सबंध पृथ्वीप्रदिक्षिणा करून येणाऱ्याचा एक दिवसाचा कालखंड ‘वाचतो’ह्या वैज्ञानिक तथ्याचा कथानकात कौशल्याने उपयोग केला आहे म्हणून तिला विज्ञान कादंबरी म्हटले पाहिजे.
द्रष्टेपणासाठी लेखक वैज्ञानिक किंवा तंत्रज्ञ असायला पाहिजे असे नव्हे. ई. एम. फॉर्स्टर (ज्यांचे पुस्तक ‘पॅसेज टु इंडिया’ जगप्रसिद्ध आहे.) साहित्यिक होते, विचारवंत होते, पण विज्ञानाचे अभ्यासक नव्हते. मात्र, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या वाढत्या वापरामुळे मानव अधिकाधिक यंत्रावलंबी होत चालला आहे हे त्यांना दिसत होते.
सहा दशकांपूर्वी ‘यंत्र थांबते’ ह्या कथेत त्यांनी ज्या यंत्रावर मानवी संस्कृती सर्वस्वी अवलंबून आहे ते यंत्र थांबल्यावर त्या संस्कृतीचे काय हाल होतील याचे चित्र रंगवले आहे. वीजपुरवठा बंद झाला की, न्यूयॉर्कसारख्या ‘अतिप्रगत’ शहरातील लोकांचे कसे हाल झाले याचे प्रात्यक्षिक पाहून ती कथा अतिरंजित वाटत नाही. परंतु विज्ञानाचे मनोरंजक चित्र समाजापुढे उभे करायचे काम अनेक लेखकांनी केले आहे.
विज्ञानाची ओळख जनसामान्यास करून देण्याची प्रथा १९व्या शतकात मायकेल फॅरॅडे याने सुरू केली. फॅरॅडेने भाषणे, प्रयोग, प्रात्यक्षिके, लेखन आदी करून आपले शोध सोप्या भाषेत समजावून सांगितले. त्या प्रयत्नांतून जन्माला आलेली विज्ञान संस्था रॉयल इंस्टिट्यूशन आजही ते काम चोखपणे बजावीत असते.
अशा पार्श्वभूमीवर मराठी साहित्याकडे पाहिले की त्यात विज्ञान-साहित्य किती अल्प प्रमाणात आहे ते दिसून येईल. विज्ञानकथालेखक केवळ हाताच्या बोटांवर मोजण्याइतके आणि प्रतिष्ठित साहित्यिकांमध्ये विज्ञानाबद्दल (आदर असला तरी) एक प्रकारची भीती दिसून येते.
विज्ञान म्हणजे आपल्या आकलनापलीकडले असा बहुतेक साहित्यिकांचा ग्रह झालेला असल्याने ते आपली प्रतिभा विज्ञानाच्या दिशेने चालवायला धजत नाहीत. अनेकदा वाचक किंवा श्रोते देखील आपल्याला वैज्ञानिक तथ्ये समजणारच नाहीत असा ग्रह बाळगतात.
विज्ञान-कथालेखकांची ही अवस्था तर विज्ञान समाजापर्यंत मनोरंजक पद्धतीने मांडण्याचे काम किती लोक करतात? सुदैवाने असे लेखन करणार्यांच्या संख्येत वाढ होत आहे. काही वृत्तपत्रात आठवड्याचा एक दिवस पानभर मजकूर विज्ञानाबद्दल असतो. काही नियतकालिकांत देखील विज्ञानविषयक माहिती सापडते.
‘सृष्टीज्ञान’ सारख्या नियतकालिकेने तर विज्ञानयुगाची चाहूल खूप आधीपासून ओळखली. तरी देखील अद्यापही समाजात विज्ञानाचे पाय रोवलेले नाहीत याची पदोपदी जाणीव होते. खगोलशास्त्र आणि फलज्योतिष यांच्यातला मूलभूत फरक अजून तथाकथित सुशिक्षितांना देखील कळत नाही हे पाहून मन खिन्न होते. ‘तुम्ही फलज्योतिषाला विज्ञान म्हणत नाही याचे कारण तुमची मनोवृत्ती पूर्वग्रहदूषित आहे’ असा आरोप जेव्हा माझ्यासारख्या वैज्ञानिकावर केला जातो तेव्हा हसावे की रडावे हे कळत नाही.
विज्ञानाची शाखा म्हणवून घेऊ इच्छिणाऱ्या विषयाला काही कसोट्यांवर उत्तीर्ण व्हावे लागते. त्या कसोट्या फलज्योतिषाला लावून पाहिल्यावर त्यांत तो विषय अनुत्तीर्ण ठरतो. हे अनेक प्रयोगांती अनेक वैज्ञानिकांनी सप्रमाण सिद्ध केले आहे. असे असून भारताच्या राजधानीत आंतरराष्ट्रीय मेळाव्यांत फलज्योतिषावर मंत्री लोक समर्थनपर भाषणे देतात यावरून आपल्या समाजाची वैज्ञानिक पातळी किती खालावली आहे याची जाणीव होते.
सर्वसामान्य माणसांची (अर्थात भारतातील) एक अशी गोड गैरसमजूत आहे की, आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान हे आपल्या पूर्वजांना माहीत होते आणि ते वेदादीकरून पुरातन वाङ्मयात समाविष्ट आहे. ह्या बाबतीत वस्तुस्थिती काय आहे ते थोडक्यात नमूद करतो. जर पुरातन समाज वैज्ञानिकदृष्ट्या अतिप्रगत असेल तर त्याचे प्रतिबिंब पुरातन साहित्यात सापडायला पाहिजे. पुष्पक विमान, क्षेपणास्त्रे, दूरदृष्टी इत्यादींची उदाहरणे पुराणात सापडतात. परंतु ती गोष्टीरूपाने आहेत, ज्याला आपण गणितीय विज्ञानवाङ्मय म्हणतो त्या स्वरुपात नाहीत.
हा फरक एका आधुनिक उदाहरणाने स्पष्ट करतो. अपोलो ११ ह्या अंतराळ स्वारीत मानवाने चंद्रावर जाऊन दाखविले. ह्या स्वारीचे सविस्तर वर्णन अनेक वृत्तपत्रांतून आणि नियतकालिकातून प्रसिद्ध झाले. अशीच चंद्रावरच्या स्वारीतील हकीकत जूल्स व्हर्नच्या लिखाणात सापडते.
समजा, इतर कुठलीही माहिती उपलब्ध नसेल तर ह्या दोन स्वाऱ्यांपैकी वास्तविक कुठली आणि काल्पनिक कुठली ते सांगता येणार नाही. परंतु जर अधिक खोलात शिरलो तर आपल्याला अंतराळ तंत्रज्ञानाला वाहिलेले विज्ञान आणि गणिताच्या भाषेत लिहिलेले अनेक प्रबंध, अहवाल आणि अभिलेख सापडतील ज्यावरून अपोलो ११चे यान कसे तयार केले, त्याची एकंदर यात्रा कशी आखली गेली, अंतराळवीरांना कुठल्या कुठल्या चाचण्यांतून जावे लागले वगैरे सर्व तांत्रिक माहिती मिळेल.
ह्या दुसऱ्या प्रकारच्या माहितीवरून कुठल्याही तंत्रसमृद्ध संस्कृतीला तशी अंतराळयात्रा आखता येईल. पुराणांतील वर्णने फार तर पहिल्या प्रकारची आहेत, दुसऱ्या प्रकारची नाहीत. पुष्पक विमान तयार करायची नियमपुस्तिका (मॅन्युअल) अद्याप उपलब्ध नाही.
वायव्यास्त्र, अग्नेयास्त्र वगैरे कसे बनवले जाते याची कृती महाभारतात सापडत नाही. सध्या उपलब्ध पौराणिक वाङ्मयातून केवळ इतकेच निदान करता येते की, ते लिहीणाऱ्यांची कल्पनाशक्ती अचाट होती. परंतु त्यापलीकडे जायला हवा असलेला पुरावा सध्यातरी उपलब्ध नाही.
हा पुरावा का उपलब्ध नाही? याचे कारण बरेच वेळा असे सांगण्यात येते की, आपल्या पूर्वजांनी ती माहिती सांकेतिक भाषेत लिहून ठेवली आहे किंवा ती माहिती नष्ट झाली. अर्थात अशी विधाने तपासून पाहता येत नसल्याने त्यांना वैज्ञानिक तपासणीत काही महत्त्व राहत नाही. तो केवळ ज्याच्या त्याच्या विश्वासाचा प्रश्न उरतो. तसेच असे विधान जर कोणी केले, “जर पुराणात ही वर्णने आहेत तर ती कल्पनाशक्ती निर्माण व्हायला खरी वस्तुस्थिती तशी नसणार काय?” तर त्या विधानाला उत्तर म्हणून असे म्हणता येईल.
“त्या विधानांप्रमाणेच ‘स्टार वॉर्स’ सारखे चित्रपट तशी संस्कृती पृथ्वीवर आहे असे सांगतात.” वास्तविक हे चित्रपट पूर्णतः काल्पनिक असून त्यातील वैज्ञानिक भाग जवळ जवळ शून्य आहे.
महाभारतीय युद्धांत एक घटना सांगितली आहे. गांधारीने दुर्योधनाला सांगितले की सकाळी अंघोळ करून मला भेटायला ये, पण पूर्ण नग्नावस्थेत. तिच्या डोळ्यातली शक्ती वापरून तिला दुर्योधनाला न्याहाळायाचे होते. त्याचे सर्वांग अमर्त्य करायचे होते. त्याप्रमाणे तो येत असताना वाटेत श्रीकृष्ण भेटला. त्याने त्याची नग्नावस्था पाहून हेटाळणी केली.
वडिलमंडळींना भेटायला जाताना असा कसा जातोस असे म्हणून कृष्णाने निदान लंगोट तरी घाल असे सुचवले. तो गांधारीपुढे आला आणि तिने डोळ्यावरची पट्टी काढून त्याला न्याहाळले. फक्त लंगोटाने झाकलेला भाग सोडून बाकीचे शरीर मजबूत झाले.
पण अखेर गदायुद्धात भीमाने त्याच भागावर गदा मारून दुर्योधनाला मारले. जर हस्तिनापुरात निदान राजवाड्यात तरी बाथरूम, शॉवर इ. सोयी असत्या तर दुर्योधनाला वाटेत कृष्ण भेटला नसता! नळ, धावते पाणी आणि वीज यांची सोय नव्हती याचे हे उदाहरण नव्हे का? आधुनिक काळात आपण सुखसोयींमध्ये नळातून वाहते पाणी, विजेचे दिवे या गोष्टी आवश्यक समजतो.
लेखक प्रसिद्ध वैज्ञानिक आणि नाशिक येथील 94व्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’चे अध्यक्ष आहेत.