ग़ज़ल समर्पणाची भावना आणि फुलांचा दरवळ

माणसांच्या स्वागतासाठी निसर्ग सदैव तत्पर असतो. माणसांचं स्वागत करण्यासाठी सूर्य रोज उगवतो. पाखरांची स्वागतपर किलबिल कानांना सुखावणारी, मनाला प्रसन्न करणारी असते. उमलणाऱ्या फुलांचा दरवळ जगणं धुंद करणारा असतो.

निसर्ग परोपरीनं माणसांचं स्वागत करत आलाय. स्वागत करण्याचा हा सद्गुण माणसानं निसर्गाकडूनच आत्मसात केला आहे. ग़ज़लकार हा सत्याचं स्वागत करणारा असतो. त्याची नाळ मानवतेच्या प्रेमाशी जोडलेली असते. ग़ज़लकारांच्या जीवनातही अनेक स्वागत सोहळे येत असतात. त्याविषयी त्यांना काय वाटतं हे त्यांच्या शेरांतून जाणून घेऊ या.

जगात अशीही काही माणसं असतात. ज्यांना स्वागत, गौरवाचा तिटकारा असतो. स्वागत म्हणजे निरुपायाला शिळ्या शब्दांनी सजवणं असतं. अशीच त्यांची धारणा होते. ज्या गुणवान माणसाची ऐन उमेदीच्या काळात उपेक्षा होते.

स्वागताला तो पात्र असूनही त्याची प्रज्ञा, प्रतिभा डावलली जाते. मग उतरणीला लागल्यावर त्याचा कोणी गुणगौरव केला काय, स्वागत केलं काय, याचं त्याला फारसं अप्रूप नाही वाटत.

उलट त्यातला फोलपणाच त्याला जाणवत राहातं. भूतकाळातील उपेक्षा त्याच्या मनात घर करून असते. मग ग़ज़लकार जगण्यातल्या अनुभवाचीच ग़ज़ल करतो. त्या अनुषंगानंच सुरेश भट म्हणतात.

जग माझ्या निरुपायाला सजविते शिळ्या शब्दांनी…

हा माझा गौरव नाही! हे माझे स्वागत नाही!

वाचा : शायर ए आजम ‘साहिर लुधियानवी’ स्त्रियांसाठी मसिहा

वाचा : मराठीतील ‘कोहिनूर-ए-गझल’ इलाही जमादार

काही माणसांना निसर्गतः सदाबहार व्यक्तिमत्व लाभलेलं असतं. वय झालं तरी त्याच्यातील हिरवेपणा फुलत, बहरत राहातो. अशा व्यक्तिमत्त्वाचं स्वागत माणसं तर करतातच करतात पण फुलांची निमंत्रणही त्यांना घरबसल्या येत राहातात. त्यांच्या स्वागतासाठी साक्षात वसंत दारात येऊन थांबतो.

असं भाग्य क्वचितच एखाद्याला लाभतं. ज्यांना असं भाग्य लाभतं ते नेहमी स्वागताच्या, सत्काराच्या केंद्रस्थानी राहातात. जिथं अस्सलपणाची कुवत जोखणारा, जपणारा, गुणवत्तेची कदर करणारा रसिक मनाचा समाज असतो. तिथं अशा व्यक्तिमत्त्वाचा आदर होत जातो. वि. म. नळकांडे यांची कैफियत अशीच काहीशी आहे.

वय संपले तरीही आला घरी वसंत

दारात स्वागताला हा थांबला वसंत

अशी कित्येक गुणवान, कर्तृत्ववान माणसं असतात. परंतु त्यांच्या हयातीत त्यांच्या वाट्याला कधीच हार-तुरे नाही येत. तशी अपेक्षाही ते बाळगत नसतात. निरपेक्षपणे पुढ्यात आलेली कामं उत्तमोत्तम पद्धतीनं करत राहातात. त्यांना ना कुणाचा हेवा वाटतो ना ते कोणाच्या स्पर्धेत सामील होतात.

त्यांचा त्यांच्या कार्यावर भरवसा असतो. ते अविश्रांत आपल्या कामात गढून गेलेले असतात. अशांच्या हातूनच जगावेगळं कार्य घडतं. त्यांची कीर्ती दिगंत असते.

आभाळाला त्याची जाणीव असते. थोर माणसाच्या स्वागताला माणसांची नाही तर आभाळाची गरज असते. त्याच्या स्वागतार्थ आभाळ वाकलेले असते. तो सद् गतीला पोहोचतो. यापेक्षा थोरवी ती काय? किशोर मुगल यांचा शेरही भल्या माणसाची भलामण करतो.

सत्कारण्यास ज्यांना माती न लाभली

बघ स्वागतास त्यांच्या आभाळ वाकले!

वाचा : उर्दू इतिहासलेखनात शिवकालीन ग्रंथांचे महत्त्व

वाचा : इकबाल यांची कविता म्हणजे कामगार हिताचा एल्गार

आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्वागतासाठी आपण काळजाच्या पायघड्या घालतो. त्याच्या वाटेत काळीज अंथरतो. परंतु हे काळीजच जर त्याच्या ताब्यात गेलेलं असेल. शोधूनही सापडत नसेल तर स्वागत करायचं कसं, हा प्रश्न शेवटी उरतोच.

काळीज ज्याच्या आधीन होतं हे खरं तर झोकून देऊन प्रेम करणंच असतं. त्यात समर्पणाची भावना असते. पण काळीज अंथरून स्वागत नाही करता येत याची मात्र मनाला रुखरुख लागून राहाते. याचं शल्य संध्या पाटील त्यांच्या शेरातून शब्दांकित करतात.

स्वागतासाठी कसे मी अंथरावे काळजाला

शोधुनीही सापडेना ते तुझ्या ताब्यात आहे

ती आपल्याला सोडून अकाली गेली की आपला आनंदही लयास जातो. आनंदाशी आपला संबंधच तुटून जातो. दुःखच आपल्या भोवती फेर धरते. हे दुःखदायी वास्तव असतं. अशा अवस्थेत हसून दुःखाचं स्वागत करण्यापलीकडं हाती काहीच नाही उरत. ती असती तर आनंदाचे औक्षण असते.

तिच्याशिवाय जगणं म्हणजे रखरखीत वाळवंटच! या दुःखाच्या वाळवंटात कधीतरी आनंदाची हिरवळ येईल्. याकरिता मन स्वागतशील ठेवावं लागतं. दुःखानंतर सुखाचं आगमन अटळ असतं. म्हणून दु:खाचं हसून स्वागत करायला हवंच. असं अरुण सांगोळे यांना वाटतं.

हसून स्वागत करतो आता दुःखाचे मी

आनंदाचे औक्षण असते ती असतीतर

समाजजीवनात माणसं कधीच एकसारखी, एक स्वभावाची नसतात. जशी चांगली, कदरदान माणसं असतात. तशी वाईट प्रवृत्तीची, खोडपत्री माणसंसुद्धा असतात. जी चांगुलपणाचा, थोरपणाचा आदर करत नाहीत.

अशी माणसं गर्विष्ठ असतात. जी दुसऱ्यांशी तुच्छतेनं वागतात, दुर्व्यवहार करतात. ती मानवजातीला बट्टा लावणारीच असतात. अशा माणसांच्या संगतीत कधीच राहाता कामा नये. नुसता देखावा निर्माण करणाऱ्यांच्या स्वागतानं चुकूनही हुरळून जाऊ नये.

त्यांच्यापासून शक्यतो चार हात दूर राहण्यातच आपलं कल्याण असतं हे जाणता आलं पाहिजे. अशा भानगडबाज माणसांच्या दुटप्पी वागणुकीवर डी. एन. गांगण यांचा शेर नेमकेपणानं प्रहार करतो.

तुच्छतेने वागले मजशी सदा जे

काय हरळू आज त्यांच्या स्वागताने

वाचा : राहत इंदौरी : उर्दूतल्या विद्रोही परंपरेचे वारसदार

वाचा : राहत इंदोरी : जमिनीशी नाळ जोडलेला कलंदर शायर

जगाचं वागणंच मोठं चमत्कारिक असतं. जो खऱ्या अर्थांन स्वागतास पात्र असतो. अशा बुद्धिवाद्याकडं ढुंकूनही पाहिलं नाही जात. स्वागत करण्यात येतं ते भलत्याच ऐऱ्यागैऱ्याचं. खरंतर ज्याच्या वाटा त्यास मिळायला हवं ज्यांना माणूस अन् त्याची पात्रता समजूनच घ्यायची नसते.

अशांचे स्वागतसोहळे बेगडीच असतात. त्यात आंतरिक भावनेचा ओलावा नसतो. त्यामुळं पात्र माणसाच्या भावना स्वागताविना कोमेजून जातात. अशा बनावट स्वागत सोहळ्याची खंत प्रफुल्ल कुलकर्णी यांच्या शेरातून प्रकट होते.

स्वागता आतूर वेड्या भावना कोमेजलेल्या

गंध वेड्या पाऊलांनी वाट ही मळलीच नाही

मी जेव्हा दैन्यावस्थेत होतो माझ्या घराचं दारही ठेंगणंच होतं. मनस्वी इच्छा असून देखील मी कुणाचं स्वागत करू शकलो नाही. गरीब, ठेंगण्या घराचं स्वागत स्वीकारण्यात काय हाशील, असं प्रत्येकालाच वाटत होतं.

कालांतरानं मी जेव्हा आकाशाला भिडणारं नवं घर बांधलं तेव्हा मात्र येणाऱ्यांचं मी मनाजोगं स्वागत करू लागलो. ही माझ्यासाठी केवढी समाधानाची बाब ठरली असं ओमप्रकाश ढोरे अभिमानानं सांगताहेत.

मी नव्याने पुन्हा घर आता बांधले

स्वागताला तुझ्या मी उभा उंबरी!

बहुतांशी ग़ज़लकारांनी स्वागताचं महत्त्व अन् त्यातून मिळणारी प्रेरणा याविषयी भाष्य केलं आहे. तर काहींनी बेगडी स्वागताबद्दल पोटतिडकीनं खंत व्यक्त केलीय. अखेर स्वागतकर्त्याच्या हेतूवर स्वागताचं मोल अवलंबून असतं. हेही तितकंच खरं!

जाता जाता :

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.