राहत इंदोरी : जमिनीशी नाळ जोडलेला कलंदर शायर

देशातच नव्हे तर भारताबाहेर आंतरराष्ट्रीय मुशायरे गाजवणारे डॉ. राहत इंदोरी यांच्या शायरीत कल्पनाविलासला कवडीभरही थारा नव्हता. त्यांच्या वस्तुनिष्ठ गज़लांमध्ये होता, धगधगत्या वास्तवांच्या थरारांचा नवनव्या अनुभवांच्या असोशीचा थक्क करणारा थर. त्यांची गझल उत्कट संवेदनेने अस्पर्शित अनुभवाला अशी कडकडून मिठी मारायची की, ऐकणाऱ्याचा, वाचणाऱ्याच्या जीवाचा थरकाप उडायचा.

त्यांच्या प्रत्येक मुशायराभर वाह, वाहची तुडुंब नदी अगदी दुथडी भरून वाहायची. त्यांचे माइकवर येणे म्हणजे उत्स्फूर्त दादेच्या गगनभेदी हाळ्यांचा झंजावात!

पन्नासाच्या दशकाच्या नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे १ जानेवारी १९५० रोजी जन्मलेले राहतउल्ला कुरैशी आपल्या गज़ला व तिच्या सादरीकरणाने अजरामर झाले. मध्य प्रदेश राज्यातील ‘माळवा’ हे त्यांचे जन्मगाव. त्यांचे बालपण व तरुणाईचा कालंखड फार संघर्षातून गेला.

राहत साहेब एक प्रकारे अनुभवजन्य कवी होते. त्यांना दैनंदिन जीवनात जे अनुभव यायचे, सर्वसामान्य माणसाचे अडगळीत पडलेले प्रश्न जे त्यांना खुणवायचे, त्यांचे उकळते रसायन त्यांच्या गज़लांमधून कानावाटे रसिकांच्या मनात ओतले जायचे. राहत साहेब सुचलेलं नाही, तर बोचलेलं लिहायचे.

त्यांच्या शायरीची दृष्टी रात्रंदिन सजग, जागी, चिकित्सक होती. त्यांच्या गज़लामधल्या दृश्य अनुभवात श्रोता पार विरघळून जायचा. वयाची कुंपणं ओलांडायचा. त्यांची गज़ल म्हणजे सकस आशयाचा वेधक उत्पत्तीबरोबर दृश्यानुभवाची अविराम रेलचेल होती. श्रोत्यांच्या आत कोंडून राहिलेली शांतता बोलकी करण्याची महत्तम कामगिरी त्यांची गज़ल वठवायची.

मेरे हुजरे में नहीं और कहीं पर रख दो

आसमा लाए हो, ले आओ जमीन पर रख दो।

नजारा देखिए कलियों के फूल होने का

यही वक्त है दुआएं कबूल होने का

राहतसाहेबांना ऐकणे म्हणजे रोमरंध्रात चैतन्याच्या बीजांची सलग पेरणी. त्यांच्या गझल संग्रहाच्या वाचनानुभवही याच पठडीत मोडणारा. कधी धूसर उदासवाणा उजेड, तर कधी आत्मानंदाच्या लखलखाटाचे तांडेच तांडे अगदी दिक्काल उजळून टाकणारे. त्यांच्या गज़लेत भारल्यासारखे भटकणे म्हणजे सर्जनशीलतेचा सबंध प्रांत आपल्या मालकीचा झाल्याची समृद्ध जाणीव. त्यांच्या गजलांमध्ये अधोरेखित, प्रतिध्वनित होणारा जगणं; सर्व भाषिकांना आपलं वाटणं हेच त्यांच्या यशाचे गमक होतं.

वाचा : राहत इंदौरी : उर्दूतल्या विद्रोही परंपरेचे वारसदार

वाचा : मराठीतील ‘कोहिनूर-ए-गझल’ इलाही जमादार

वाचा : कलीम खान : पुरस्कार नाकारणारे जगावेगळे वल्ली

हयातीत झाले होते मिथक

जिवंतपणी मिथक, दंतकथा होण्याचं भाग्य प्रत्येकाला लाभत नाही. पण तो राहत साहेबांना लाभला. त्यांच्या शायरीचा डंका जिवंतपणी तर निनादला आणि आता मरणोत्तरही गरजत आहे.

पूर्वी मुशायरा विश्वात गोड गळ्यांच्या शायरांची चलती होती. परंतु राहत साहेबांनी परंपरेची चक्रे उलटी फिरवली. मुशायर्‍यात आपल्या सादरीकरणाची एक विशिष्ट लकब, विशिष्ट शैली त्यांनी रुढ केली. नंतर उर्दू व हिंदी शायरीच्या सादरीकरणात त्यांचे अनुकरण व्हायला लागले. विदर्भातील शायर अबरार काशिफ, नईम फराज, तनवीर गाजी यांना पुढे येण्यात राहत साहेबांच्या प्रोत्साहनाचा अगत्याने व कृतज्ञतापूर्वक उल्लेख करावा लागेल.

वावटळीचे पाय लावून राहत साहेब मुशायरा निमित्त भारतभर व भारताबाहेर सतत फिरत राहिले. मुशायर्‍यात त्यांची उपस्थिती म्हणजे मुशायराच्या यशस्वितेची दणकट हमी. देशात व विदेशात त्यांची एवढी भ्रमंती झाली की त्यांच्या शायरीच्या श्रावणासाठी जगाचा नकाशा तोकडा पडला. माझ्या सावरखेर्डा गावीदेखील त्यांनी एक अजरामर मुशायरा केला.

माझ्या या आडवळणी गावात देशपातळीवर भव्य मुशायऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. मुशायऱ्याचा अध्यक्ष या नात्याने त्यांना निमंत्रित करण्याची जबाबदारी माझ्यावर आली. व्यवसाय बंधु असल्याने माझी आणि राहत साहेब यांच्यामध्ये एक भावनिक नाते होते. मी राहत साहेबांना फोन केला. त्यांनी कोणतेही आढेवेढे घेतले नाही. व्यस्ततेच्या सबबी पुढे रेटल्या नाही. क्षणार्धात होकार दिला.

चिखलीवरून सावरखेर्डापर्यंत माझ्या छोट्या मारुती कारमध्ये बसून आले. रस्ताभर जगभराच्या रंजक गोष्टी सांगत राहिले. गावात पोचल्यावर माझ्या घरी येऊन तळ ठोकला. घरी आल्यावर घरच्यांची आत्मियतेने विचारपूस करू लागले. अशी की माझ्या कुटुंबीयांची आणि त्यांचे जणू कित्येक वर्षां-वर्षाचे घट्ट संबंध असावे.

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे एक उत्तुंग शायर आमच्या घरात वास्तव्याला आहे, याचे दडपण त्यांच्या सहज वागण्यामुळे हद्दपार झाले. तणावाच्या टम्म फुगलेल्या फुग्याला त्यांच्या मनमिळावू आणि आत्मीयतेने उत्फुल्ल स्वभावामुळे टाचणी लागली.

माझ्या घरातला त्यांच्या वास्तव्याचा तो दिवस म्हणजे आनंदोत्सव होता. वाडा भर त्यांचा मन मोकळा-ढाकळा प्रेमळ वावर, घरातल्या माणसासारखा आवडीचा जेवणाचा आग्रह, जशी त्यांची गज़ल पारदर्शी तसं त्यांचं वागणंदेखील पारदर्शी. खऱ्या अर्थाने डॉ. राहत इंदोरी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पण मोठेपणाची झूल भिरकावलेले कलंदर शायर होते.

वाचा : शायर ए आजम ‘साहिर लुधियानवी’ स्त्रियांसाठी मसिहा

वाचा : प्रगतिशील कविंच्या उर्दू शायरीतून ‘नेहरू दर्शन’

वाचा : उर्दू इतिहासलेखनात शिवकालीन ग्रंथांचे महत्त्व

शेर ऐकण्याचा मोह

सूर्य मावळतीकडे वळला. राहत साहेब माझ्या घराच्या गच्चीवर गेले. गच्चीवरून दिसणारा माझं निसर्गरम्य गाव बराच वेळ डोळ्यात साठवत राहिले. मी त्यांच्या बाजूला उभा राहून त्यांच्या चेहऱ्यावरची निरागसता अपलकपणे न्याहाळू होतो. समाधानी नजर फिरवत राहत साहेब अचानक पुटपुटले,

“सर पर सात अकाश, जमी पर सात समंदर बिखरे है। आंखें छोटी पड़ जाती है इतने मंजर बिखरे हैं। इस बस्ती के लोगों से जब बातें की तो यह जाना दुनियाभर को जोड़ने वाले अंदर ही अंदर बिखरे हैं।”

त्यांच्या तोंडावाटे बाहेर पडणारे शब्द मी कानांच्या ओंजळी करून ऐकत होतो. त्यांच्या सहवासातील एक एक क्षण मनाच्या संदर्भग्रंथात साठवत होतो. त्यांची सर्जनशील, चिकित्सक नजर दूर डोंगरावर रोखलेली होती. आजवर मुशायर्‍यात कधी न ऐकलेले त्यांचे शेर ऐकण्याचा मोह मला आवरता आवरत नव्हता.

राहत साहेब क्षणभर स्थिरावले. डोंगराच्या पायथ्यातल्या झाडांना अपलकपणे बघत राहिले. मौनाला तोडत मला उद्देशून म्हणाले, “अजीम गाँव की आबोहवां में बला की अपनाइयात होती है। कभी-कभी लगता है शहरों के, मुशायरे के शोर-शराबे से दूर किसी पहाड़ के दामन में बसे गांव में बस जाऊं।”

पुराने शहरों के मंजर निकलने लगते हैं

जमी जहां भी खुले घर निकलने लगते हैं

बलंदियों का तसव्वुर भी खूब होता है

कभी-कभी तो मेरे पर निकलने लगते हैं।

जगभरातील मुशायर्‍यात त्यांनी कधीही न ऐकवलेल्या गज़लांनी, कित्यांची, शेरांनी मला चिंब भिजवत होते. मालामाल झाल्याची समृद्ध जाणीव माझ्या मनभर फैलावत होती.

रोज तारों की नुमाइश में खलल पड़ता है

चांद पागल है अंधेरों में निकल पड़ता है

एक दीवाना मुसाफिर है मेरी आंखों में

वक्त बेवक्त ठहर जाता है चल पड़ता है

अपनी ताबीर के चक्कर में मेरा जागता ख्वाब

रोज सूरज की तरह घर से निकल पड़ता है।

सूर्य क्षितीजाच्या घरट्यात वास्तव्याला निघालेला होता. पाखरू मुक्कामाच्या झाडाकडे वळली होती. अंगणात काजळी सावल्या गोळा होत होत्या. हळू-हळू करीत मुशायऱ्याची वेळ जवळ येऊन ठेपली. राहत साहेब गच्चीवरून खाली उतरले. पायऱ्या उतरताना मला उद्देशून एक किता म्हटला,

ढलेंगा दिन तो सुलगने लगेगा दिल मेरा

मुझे भी घर के चरागों के साथ रख देना

ये आने वाले जमानों के काम आएंगे

कहीं छुपा के मेरे तजरबात रख देना

मी उसळून ‘वाह’ म्हणालो. उतरताना जिन्याच्या काही पायऱ्या अजून बाकी होत्या. राहत साहेब अचानक थांबले. माझ्याकडे वळून वदले,

अंधेरी रात के गुमराह जुगनूओं के लिए

उदास धूप की टहनी पर रास्ते रख देना

मैं एक सच हों अगर सुन सके तो सुनते रहो

गलत कहूं तो मेरे मुंह पर हाथ रख देना

माझं तर नशीब फळफळलं होतं. राहत साहेब, माझ्या अंतकरणात कायम घरटं करून असलेले त्यांचे आवडते शेर आणि त्यांचा मी एकुलता एक श्रोता; भरून पावलो होतो.

वाचा : समाजाची भाषा का आणि कशी बिघडते?

वाचा : ग़ज़ल समर्पणाची भावना आणि फुलांचा दरवळ

वाचा : मुस्लिमांच्या माणुसकीची मोडतोड सांगणारा ‘वर्तमानाचा वतनदार’

ऐतिहासिक मुशायरा

गावच्या उर्दू शाळेच्या प्रांगणात काशिफ यांच्या रसाळ सूत्रसंचालनाखाली मुशायरा आरंभ झाला. आयोजक मरहूम शफी कादरी, रफीक प्यारे, दाऊद सेठ कुरेशी, असलम अंजुम, अरशद सोहिल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राहत साहेब व इतर मान्यवर शायरांचे मनपूर्व इस्तेखबाल केला.

मुशायऱ्यात अनेक मान्यवर शायर निमंत्रित होते. त्यात अबरार काशिफ, नईम फराज, नईम अख्तर खादमी, मरहूम शम्स जालनवी, अल्तमश शम्स, अलताफ जिया, अहमद निसार, मतीन बेकल, सुफियान काजी, मन्नान फराज, साजिद महेशर, मरहूम शब्बीर पटेल अरशद, एजाज खान एजाज, साबिर शात साबिर, इमरान सानी, नदीम नवाज, साबिर कमाल, अजीम रायपुरी, मुस्तकीम अरशद, मोहसिन असर या सर्व शायरांचे गावाने उत्साहाने स्वागत केले.

भरघोस वाहवा मिळवत सर्व शायरांनी आपल्या सकस रचना सादर केल्या.

गावचा व जळच्या परिसरातील सबंध रसिक समुदाय राहत साहेबांना ऐकण्यासाठी एकवटला होता. प्रतीक्षेच्या बर्फाची लादी वितळली. शेवटी राहत साहेब माइकवर आले. शिट्ट्या व टाळ्यांचा प्रचंड गजर झाला. साऱ्या परिसरात एक वेगळाच उत्साह संचारला होता. चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा गजर दीर्घकाळ सुरू होता. राहत साहेब कृतज्ञपणे स्तबंध होऊन काही क्षण नुसते शांत उभे राहले. ही त्यांची गावाला मानवंदना होती.

हा मुशायरा अनेक अर्थाने गावच्या व माझ्या स्मरणात आहे. राहत साहेबही मुशायरानिमित्त अनेक गडगंज शहरात गेले असतील. काही शहर त्यांच्या स्मरणात राहिली तर काही शहर विस्मरणात गेली असतील. पण माझ्या गावचे नाव ते आयुष्यभर विसरले नसतील, हे मी आत्मविश्वासाने सांगू शकतो. त्याचे कारणही मजेदार आहे.

सादरीकरणालाठी उठताना राहत साहेब आपला मोबाईल बसल्या जागी ठेवून माइकवर आले. अन् तिथेच घात झाला. त्यांच्या मोबाईलवर पूर्वीपासून डोळा ठेवून असलेल्या गावातल्या अज्ञाताने डाव साधला. मंडपभर पसरलेल्या वाहवाला मानवंदना देत राहत साहेबांनी रजा घेतली. जागेवर जाऊन पाहतात तर मोबाईल गायब.

राहत अस्वस्थ झाले. मी माईक वर आलो. ज्याने मोबाइल लंपास केला त्या अज्ञाताला तो परत करण्याची वारंवार आर्जवी स्वरात विनंती केली. काहीच फायदा झाला नाही. मोबाईल परतीच्या सगळ्या वाटा बंद झाल्या. मुशायरा श्रवण करण्यासाठी आलेला सबंध श्रोता वर्ग आपापल्या जागी स्तब्ध उभा होता. गावच्या इभ्रतीचा प्रश्न होता.

अकोला महानगरपालिका विरोधी पक्षनेता आणि माझे जीवश्च मित्र साजिद खान पठाण माइकवर आले. त्यांनी मोबाईल परत करणाऱ्याला ५ हजार रुपयांची घसघशीत रक्कम बक्षीस म्हणून घोषित केली. पण त्याचाही काहीच फायदा झाला नाही.

वाचा : मुस्लिमविषयक पुस्तकांचा वानवा का आहे?

वाचा : ‘रेनेसां स्टेट’ लिहिणारे गिरीश कुबेर म्हणजे पुरंदरेंचा इंग्लिश अवतार

वाचा : नवीन लेखकांसाठी पुस्तके प्रकाशित करण्याची सोपी प्रक्रिया

जोडलेली माणसं पर द्या !

दुसरीकडे अस्वस्थ राहत साहेब काकुळतीला येऊन म्हणत होते, “मला मानधनाची रक्कम नाही मिळाली तरी चालेल. पण मला माझा मोबाईल मिळवून द्या. मोबाईल महत्त्वाचा नाही, त्यातील नंबर महत्त्वाचे आहेत. नंबर म्हणजे माणसं. आयुष्यभर जोडलेला एक-एक माणूस नंबरचा रूपात माझ्या मोबाईलमध्ये वास्तव्याला आहे.”

राहत इंदोरी निराश होऊन निघून गेले. त्यांची निराश होणे साहिल राही म्हणजे माझ्या मुलाच्या जिव्हारी लागले. मोहल्ल्यातील तऱ्हेतऱ्हेचे उनाड मुलं तो चांगल्या पद्धतीने ओळखून होता. साहिलने सगळ्यांना रिंगणात घेत हिसका दाखवला.

त्याने शक्कल लढवत सर्वांना उद्देशून म्हटले, “आम्ही मैदानात सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. ज्याने मोबाईल चोरला तो कॅमेरात आला आहे. आता आम्ही पोलिसांना बोलावले आहे. ते काही वेळात येतील. ज्या मुलाने मोबाईल ढापला होता, त्याला दरदरून घाम फुटला. लगेच चोरी करणारा मुलगा जड पावलाने साहिलजवळ आला आणि कापऱ्या आवाजात गुन्ह्याची कबुली दिली.

ज्या ठिकाणी त्याने मोबाईल लपवला ते ठिकाण दाखवले. त्याने मोबाईल खड्डा करून पुरला होता. त्यावर माती ढकलली होती. साहिलने मोबाईन ताब्यात घेतला व लगेच दुसरी गाडी घेऊन मित्रमंडळीसह राहत साहेबांच्या प्रवासाच्या दिशेने निघाला. राहत साहेब भुसावळहून इंदोरची ट्रेन पकडणार होते.

मुक्ताईनगरच्या एका ढाब्यावर ते जेवत असल्याची माहिती मिळाली. साहिल आणि त्याची मित्रमंडळी त्यांच्यापर्यंत पोहोचली. मोबाईल त्यांच्या सुपूर्द केला. राहत साहेबांच्या चेहऱ्यावर गगनात मावेनासा आनंद ओसंडायला लागला. राहत साहेबांनी साहिलला कडकडून मिठी मारली. ..म्हणून माझं गाव आणि गावचा तो मुशायरा राहत साहेबांच्या आयुष्यभर स्मरणात राहिला. अनेक ठिकाणी त्यांनी या घटनेचा उल्लेख रंगदारपणे केल्याचं ऐकण्यात आलं.

ह्या मुशायऱ्यानंतर आमचे नाते अधिक घट्ट झाले. त्यांनी ‘अस्बाक पब्लिकेशन’तर्फे प्रसिद्ध झालेल्या माझ्या ‘पोधा मेरे आंगन का’ या गझल संग्रहासाठी ‘संगलाख जमिनों से उगा पौधा अजीम नवाज राही’ या शीर्षकाखाली प्रदीर्घ प्रस्तावना लिहिली. प्रस्तावनेत माझ्या गज़लांबरोबर पारिवारिक संबंधाचा भावनिक उल्लेख आवार्जून केला.

गेल्या वर्षी ११ ऑगस्टला करोनाच्या भयंकर रोगराईने या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या शायराला आपल्यातून खेचून नेले. आता त्यांच्या जाण्यावर भाष्य करताना पापणकाठ ओलावले आहेत. भाषा शोकदग्ध झाली आहे. जमिनीशी घट्ट नाळ जुळवून, माणसांत सदैव रमणारा युगप्रवर्तक शायर काळाच्या पडद्याआड गेला आहे, कधीही न परतण्यासाठी !

हम जैसे फूल कहां रोज-रोज खिलते हैं

यह गुलाब बड़ी मुश्किल से मिलते हैं

जाता जाता :