“१८५७ ते १९४७ या ९० वर्षाच्या काळात झालेल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा साधार व सविस्तर इतिहास अद्याप लिहिला गेलेला नाही, तसेच सामन्यात: इंग्रजी भाषेतच उपलब्ध असलेल्या साधनांच्या साह्याने आजही इतिहास लेखन केले जाते. भारतीय भाषांत लिहिल्या गेलेल्या रोजनिशा, पत्रे, चरित्रे, आत्मचरित्रे, आठवणी यांचा तसेच भारतीय भाषांतील जुन्या वृत्तपत्रांच्या संचिकांचा जेवढा उपयोग करणे शक्य आहे तेवढा इतिहासकारांनी अद्याप केलेला नाही” ही य. दि. फडके यांनी १९८६ साली व्यक्त केलेली खंत आजही पूर्ण झालेली नाही असेच म्हणावे लागते.
इतिहास हे धुरीणत्वाचे (Hegemony) निर्माण करण्याचे माध्यम असल्यामुळे आपणास सोयीचा इतिहास रचण्यासाठी आवश्यक त्याच घटीतांचा उपयोग केला जातो. म्हणून इतिहास आणि भूतकाळामध्ये फरक असतो हे आपण गांभीर्याने लक्षात ठेवायला हवे. अभ्यासकांनी इतिहास लेखन परंपरेच्या समाजशास्त्राचे (Sociology of Historiography) भान आवश्य ठेवले पाहिजे.
स्वातंत्र्य लढा आणि मुसलमान यांचा विचार करत असतांना हे इतिहासलेखनशास्त्राचे समाजशास्त्र समजून आणि जाणून घेणे खूपच महत्त्वाचे ठरते. मुस्लिम लीगने पाकिस्तानची मागणी केल्यामुळे सगळा मुस्लिम समाज लीगच्या पाठीशी उभे राहिले आणि अखेर देशाची फाळणी झाली, अशी मांडणी करणाऱ्यांनी १८५७ ते १९४७च्या नव्वद वर्षाच्या काळात इंग्रज राजवटीविरुद्ध देशात आणि परदेशात लढलेल्या मुसलमानांकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही.
किंबहुना गदर पक्षाची चळवळ, चलेजाव चळवळ, आज़ाद हिंद फौजेचा लढा, क्रांतिकारी चळवळ, कम्युनिष्ट–समाजवादी चळवळ, शेतकरी चळवळ, शाही नौदलातील तरुणांनी केलेल्या उठावात सहभागी झालेल्या मुसलमानांच्या योगदानाची उपेक्षा करणे कृतघ्नपणाचे आणि अनैतिहासिक ठरेल.
वाचा : ‘स्वातंत्र्य आंदोलनातील मुसलमान’ बेदखल का झाले?
वाचा : भिक मागून सर सय्यद यांनी जमा केला होता विद्यापीठासाठी निधी
वाचा : मौलाना आजाद यांनी भारतरत्न का नाकारला?
स्वातंत्र्य लढा आणि मुसलमान
मुसलमानांमुळे ‘आपल्या’ देशाची फाळणी झाली असे भाऊकतेने बोलले जाते आणि मुस्लिम लीग म्हणजे सर्व मुस्लिम असे सामान्यीकरण, सरसकटीकरण केले जाते त्यामुळे अनेक गोंधळ निर्माण होतात. यासंदर्भात राजा दीक्षित महत्त्वाचे निरीक्षण नोंदवतात. ते म्हणतात की, “इतिहास माणसांना पागल बनवत चालल्याचे आजच्या काळात आपणास दिसते. पण इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात भाऊकता आणि श्रद्धा यावर भर देऊन चालत नाही.”
निव्वळ व स्वयंसिद्ध असा भूतकाळ अस्तित्वातच नसतो या भूतकाळाला वर्तमानकाळाच एक अस्तित्व बहाल करतो. इतिहासलेखनाच्या रूपाने हे अस्तित्व व आकार सिद्ध होतो म्हणून सर्व इतिहास हा समकालीन असतो असे प्रसिद्ध इतिहासकार क्रोशे म्हणतो.
१७६३ मधील संन्यासी व फकीरांचे बंड, १८२० मधील वहाबींचे बंड, १८५७चा उठाव त्याचबरोबर १८८५ नंतरच्या स्वातंत्र्य आंदोलनात – १९४२च्या चले जाव या अंतिम आंदोलनाची हाक देणाऱ्या कॉंग्रेस अध्यक्ष मौलाना आज़ादपर्यंत… धर्मनिरपेक्ष लोकशाहीवादी राजकारण करणाऱ्या प्रवाहाचे नेतृत्व करणारी मुस्लिम नेत्यांची एक मालिकाच आहे.
इतकेच नव्हे तर कॉंग्रेस, कम्युनिस्ट, समाजवादी अशा गटातील मुस्लिम श्रमिकांची परंपरा हुतात्मा बाबू गेनूच्या बलीदानापासून स्पष्ट झालेली आहे. (प्रा. फकरुद्दीन बेन्नूर, भारतीय मुसालामांची समाजरचना आणि मानसिकता).
वरील बाबींचा विचार केल्यास मुस्लिम राजकारणाचे मुस्लिम लीगच्या स्वरुपात झालेल्या एकजिनसीकरणास (Monolith) छेद बसतो.
मोगल बादशाहची सत्ता कंपनीकडे आल्याने नोकरदार मुसलमानांचा (सैनिकी वर्ग) आणि मुलकी नोकरदारांचा वर्ग यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. त्याचप्रमाणे कायमधाराच्या पद्धतीमुळे जमिनीवरील हक्कच गेले. तेव्हा हिंदू शेतकरीही बिथरले. त्याचा परिणाम सर्वप्रथम संन्यासी आणि फकिरांच्या बंडात (१७६३ ते १८००) झाला.
तसेच अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना इस्लामच्या नावाने आकृष्ट करून वाहबींचा लढा १८२०मध्ये पूर्व बंगालमध्ये उभा राहिला. अशा प्रकारे ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेपासूनच मुसलमान समाजाने इंग्रजी सत्तेला विरोध करण्यास प्रारंभ केला. परंतु खऱ्या अर्थाने देशाच्या स्वातंत्र्य चळवळीस १८५७चा लढा आणि त्यानंतर झालेल्या सत्तांतरानंतर सुरुवात झाली.
वाचा : ‘बेगमात के आंसू’ : उद्ध्वस्त झालेल्या राजकन्यांच्या व्यथांचा दस्तऐवज
वाचा : ‘संपूर्ण क्रांती’ नव्हे संघाला मान्यता मिळवून देण्याचे कारस्थान
वाचा : बांगलादेश निर्मितीत इंदिरा गांधींची दुर्गादेवींची भूमिका
१८५७ चा उठाव आणि मुस्लिम समाज
१७५७ साली प्लासी आणि १७६४ साली बक्सार जिंकून ब्रिटिशांनी भारतात आपल्या सत्तेचे पाय रोवले व १८१८ साली मराठ्यांचा पराजय करून संपूर्ण भारत पादाक्रांत केला. व्यापारी म्हणून आलेले ब्रिटिशांनी सत्ताधारी झाल्यावर शोषणकारी आणि दमनकारी धोरणे राबविण्यास प्रारंभ केला.
अनेक प्रशासकीय सुधारांमुळे मुस्लिमांचे पारंपारिक रोजगार गेले. उदा. लष्करी तंत्र बदल्यामुळे सैनिकी पेशा गेला. त्याचप्रमाणे बंगाल आणि उत्तरप्रदेशात न्याय खाते आणि महसूल खाते यावर मुस्लिमांची असलेली मक्तेदारी संपुष्टात आली.
शेतीचे औद्योगिकीकरण केल्यामुळे अनेक उत्पादक मुस्लिम जाती परागंदा झाल्या. उदा. जुलाहा. कायमधाराच्या पद्धतीमुळे ब्रिटिशांनी नवीन प्रकारची जमीनदारी व्यवस्था लागू केली. त्यामुळे मुस्लिमांसह हिंदू शेतकरी ठिकठिकाणी विरोध करू लागले. अशाप्रकारे १८५७चे सामाजिक आणि राजकीय पर्यावरण निर्माण झाले. १८५७च्या उठावाचा उद्रेक सैनिकांच्या तुकडीतून झाला पण त्याचा वणवा संपूर्ण उत्तर भारतात पसरला. हिंदू-मुसलमानांनी सारख्या प्रमाणात उठावात सहभाग घेतला. परंतु “इतिहासकार तात्या टोपे, नानासाहेब पेशवा यांचे नाव घेतात… पण, फैजाबादच्या शरीफ मौलवी अहमदुल्लाह याला पकडण्यासाठी ५०,००० रुपयांचे बक्षीस लावले होते. त्याला गोळी मारून ठार मारण्यात आले आणि त्याचे शीर ब्रिटिश सरकारला पाठविण्यात आले याची दखल घेतली जात नाही.
अवधच्या बेगम हजरत महल ने तर विक्टोरिया राणीच्या जाहिरनाम्याला विरोध करणारा प्रती जाहीरनामाच काढला होता. ती सुद्धा लढता-लढता जखमी अवस्थेत नेपाळ येथे मृत पावली. तरी तिला राणी लक्ष्मीबाई सारखे स्थान इतिहासात दिले जात नाही.” असे प्रा. बेन्नूर म्हणतात.
स्वातंत्र्य चळवळीच्यासंदर्भात ‘जमातवादी इतिहासलेखन’ मोठ्याप्रमाण केले गेले असल्यामुळे अनेक गोंधळ समकालीन भारतात निर्माण झालेले दिसतात. याचे सूक्ष्म निरीक्षण प्रा. बेन्नुरांनी टिपलेले आहेत. १८५७ नंतर हिंदू-मुसलमानांत जी फूट पडून राजकीय-सामाजिक संघर्ष वाढत गेले.
त्याची तीन कारणे बेन्नूर पुढील प्रमाणे देतात- ‘एक- ब्रिटिशांची नीती, दोन- हिंदू मुस्लिम अभिजन वर्गाचे स्पर्धेचे आणि हितसंबंधाचे राजकारण. तीन- धर्मवादाचा उगम. यात आर्य समाजी व टोकाचे हिंदुत्ववादी आणि पोथिनिष्ठ उलेमा हे गट होते. (उपरोक्त, पान- १०८)
१८५७च्या उठावानंतर ब्रिटिशांच्या सूड नीतीचे दूरगामी परिणाम मुसलमानांच्या राजकारणावर, समाजकारणावर, धर्मकरणावर आणि मानसिकतेवर झाला. कारण, १८५७च्या उठावानंतर मुस्लिम हे ब्रिटिशांच्या सुडाचे बळी ठरले. (तारचंद, दि हिस्टरी ऑफ फ्रीडम मुव्हमेंट अइ इंडिया. पान-३४९)
वाचा : बिस्मिल आणि अशफाकउल्लाह उत्कट मैत्रीचे प्रतिक
वाचा : यूसुफ मेहेरअली ‘चले जाव’ घोषणेचे जनक
वाचा : बादशाह खान होते अखंड भारतासाठी झटणारे योद्धे
लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात इतिहासाचे सहाय्यक प्राध्यापक आहेत.