बादशाह खान होते अखंड भारतासाठी झटणारे योद्धे

भारतातील सत्ताधिशांच्या बेबंद आश्रयामुळे भारतातील बहुसंख्य जनतेस आज हिंदू राष्ट्राची स्वप्ने पडत आहेत. आजच्या काही कथित देशभक्तांनी हा भारत देश केवळ हिंदूचा असून इतर धर्मिय दुय्यम नागरिक आहेत, असा दुष्प्रचार सुरू केला आहे.

पण या भारत भूमीला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक हिंदू सोबतच अनेक मुस्लिम, शिख धर्मियांनी आपले रक्त सांडले आहे, कारावास भोगला आहे, त्याग केला आहे याची जाणीवही अनेकांना नाही.

भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले सर्वस्व त्यागले अशा अनेक महान भारतीय सुपुत्रापैकी एक ठळक नाव म्हणजे ‘भारतरत्न’ खान अब्दुल गफार खान. पेशावरच्या पठाण कुटूंबात जन्मलेले गफार खान यांचे कार्य समस्त भारतीयांनी त्यांच्या बद्दल सदैव ऋणी नि कृतज्ञ रहावे असेच आहे! प्रश्न हा आहे की, आजचा ‘न्यू इंडिया’ त्यांच्याबद्दल कृतज्ञ न राहता कृतघ्न का झाला आहे?

भारतरत्न खान अब्दुल गफार खान उपाख्य सरहद गांधी यांचा जन्म पेशावर येथील एका पठाण कुटुंबात ६ फेब्रुवारी १८९० रोजी झाला. पठाण म्हणजे क्षात्रतेज असणारा एक लढवय्या भारतीय समाज. या लढवय्या समाजाने भारतीय स्वातंत्र्यात अतिशय अतुलनीय असे योगदान दिले आहे.

पारतंत्र्यात असताना अनेक पठाणांना ब्रिटिशांनी कारावासात टाकले आणि अनेकांना फाशीची सजाही सुनावली. पण पठाण समुदाय डगमगला नाही, तो सतत लढत राहिला. हा समाज लढवय्या तर होताच शिवाय बदललेल्या जगातील परिस्थितीची जाण आणि भान त्याबरेबरच चातुर्य देखील त्यांच्याकडे होते.

खान साहेबांचे आजोबा अब्दुल्ला खान पठाण देखील असेच एक लढवय्ये वीर होते. त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात संघर्ष केला. लढाऊ वृत्ती त्यांनी त्यांच्या आजोबा कडून शिकली. परंतु त्यांनी आध्यात्मिकता त्यांचे वडील बैरम खान आणि महात्मा गांधी यांच्याकडून प्राप्त केली.

त्यांनी गांधीजींचे सत्य आणि अहिंसा हे तत्त्वज्ञान स्वीकारले. कारण ते इस्लामचा मूळ अर्थ सत्य, शांतता आणि अहिंसा असून तो गांधींच्या विचारांशी साम्य असणारा आहे असं मानत होते.

त्यांचे वडिल बैरम खान यांची अशी इच्छा होती की, अब्दुल गफार खान यांनी आधुनिक शिक्षण घ्यावे. म्हणून त्यांनी त्यांना मिशनरी स्कूलमध्ये भरती केले. त्यावेळी अनेक सनातनी पठाणांनी याचा विरोध केला. परंतु हा विरोध झुगारून अब्दुल गफार खान यांनी मोठ्या हिमतीने आधुनिक आधुनिक शिक्षण घेतले.

ही बाब आजही अनेक भारतीय आणि पाकिस्तानी कट्टर मुस्लिम समुदायासाठी खूप मार्गदर्शक अशी आहे. धर्माचरण हे आधुनिक शिक्षण आणि आधुनिक विचार यातील अडथळा बनता कामा नये, हा विचार अब्दुल गफार खान आणि त्यांच्या वडिलांच्या कृतीतून अंगीकारायला हवा हे महत्वाचे!

वाचा : मौलाना आजाद यांनी भारतरत्न का नाकारला?

वाचा : ‘स्वातंत्र्य आंदोलनातील मुसलमान’ बेदखल का झाले?

राजद्रोहाचा खटला

मिशनरी स्कूल मधून शिक्षण घेतल्यावर त्यांनी पुढील शिक्षणासाठी अलीगढ हे शहर गाठले. तिथे त्यांच्यावर झालेल्या संस्कारातून या देशातील हिंदू मुस्लिम ऐक्यावर आधारलेली ‘गंगा जमनी तहजीब’ हीच देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊ शकेल या विचारातून त्यांनी समाजसेवा करण्यासाठी पुन्हा आपल्या गावी पेशावरला जाऊन समाजसेवा करायची आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचा हा संदेश सर्वत्र पोचवायचा हे ठरवले.

पेशावरमध्ये १९१९ मध्ये ‘रौलेट मार्शल लॉ’ लागू झाला होता. याच काळात त्यांनी गांधींचे शिष्यत्व पत्करले आणि खुदाई खिदमतगार या सामाजिक संस्थेची स्थापना केली. या संघटनेचे उद्दिष्ट इश्वराची सेवा हीच जनसेवा या तत्वावर आधारित होते.

गांधींनी ज्या प्रमाणे हिंदूंच्या आध्यत्मिक जाणिवांना प्रबळ करत राजकीय लढा उभा केला. त्याच आधारावर खान यांनी हा प्रयत्न खुदाई खिदमतगार संघटनेच्या माध्यमातून केला. या संघटनेची प्रतिज्ञा खूप बोलकी आहे. ती राजकीय इस्लामपेक्षा अंहिसा आध्यात्मिक तत्त्वावर आधारलेली होती.

“मी कधीही हिंसा करणार नाही, माझ्यावर अन्याय करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीबाबत मनात राग धरून मी त्याच्याशी सुडभावनेने वागणार नाही आणि त्याच्या व्यक्तीस मी माफ करेन” अशी प्रतिज्ञा खुदाई खिदमतगार या संघटनेत घेतली जात असे.

बदला घेण्याच्या वृत्तीचे म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या पठाण समुदायात असा विचार मांडणे, तो रूजवणे आणि लोकांना तो शंभर वर्षापूर्वी अंगिकारायला लावणे ही खरोखरच क्रांतिकारी बाब होती.

‘मार्शल लॉ’च्या त्यांनी विरोधात आंदोलन केले म्हणून ब्रिटिशांनी खान साहेबांना अटक करून त्यांच्याविरोधात राजद्रोहाचा खटला भरला. या खटल्यात त्यांना सहा महिन्याची सजा झाली. तेव्हापासून त्यांची कारकिर्द गांधीजीचे अनुयायी अशी घडली.

टिळक आणि गांधी यांना आपला नेता मानणाऱ्या खान यांनी काँग्रेसच्या सर्व आंदोलनात सहभाग नोंदवत हिंदू मुस्लिम ऐक्याचा नवा अध्याय घडवला. सी.आर. दास, नेताजी बोस, मोतीलाल नेहरू, पट्टाभी सितरामय्या, हसरत मोहानी आदी नेत्यांबरोबर खान यांनी कार्य केले.

वाचा : बिस्मिल आणि अशफाकउल्लाह उत्कट मैत्रीचे प्रतिक

वाचा : यूसुफ मेहेरअली ‘चले जाव’ घोषणेचे जनक

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे शिपाई

नेहरू रिपोर्ट आणि पूर्ण स्वातंत्र्याच्या घोषणेनंतर झालेल्या आंदोलनात त्यांनी एक काँग्रेस सदस्य या स्वरूपात भाग घेतला. कॉग्रेसच्या सर्वच नेत्यांसोबत त्यांना नंतर १९३० साली अब्दुल गफार खान यांना पुन्हा कारावास घडला. हा कारावास त्यांना त्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडविणारा ठरला!

या कारावासाच्या काळात त्यांनी कुरआनचे पठण करण्याबरोबरच बरोबर शीखांचा धर्मग्रंथ ‘गुरु ग्रंथ साहिब’ आणि ‘भगवद्गीता’ यांचेही वाचन केले. कुरआन गुरुग्रंथसाहिब आणि भगवद्गीता यांच्या एकत्रित वाचनातून आणि चिंतनातून खान अब्दुल गफार खान यांचे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे एक प्रमुख शिपाई म्हणून व्यक्तिमत्त्व घडले.

आजवर घेतलेल्या हिंदू मुस्लिम ऐक्याच्या भूमिकेस एक तत्त्वचिंतनपर आधार लाभला. त्यांनी त्यांच्या अनुयायांना याच प्रकारे हिंदू-मुस्लिम ऐक्याची ओळख आणि अपरीहार्यता समजून सांगितली. त्यावेळी त्यांच्यासोबत कारागृहात असणारे अनेक मुस्लिम कैदी त्यांच्या या शिकवणीने प्रभावित झाले आणि त्यांनी महात्मा गांधींचे नेतृत्व मान्य करून देशातील हिंदू मुस्लिम ऐक्य हेच ब्रिटिश अन बरोबरच्या लढाईत प्रमुख आधार असेल हत्यार असेल अशी भूमिका मांडली.

पुढे १९३१ साली झालेल्या गांधी-आयर्विन करारानंतर खान अब्दुल गफार खान यांची कारागृहातून सुटका झाली. तेव्हापासून त्यांनी महात्मा गांधी यांचे शिष्यत्व पत्करून देशातील सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून दिले. महात्मा गांधी यांचे शिष्यत्व त्यांनी स्वीकारल्यानंतर त्यांच्याबरोबर त्यांचे बंधू डॉ. जब्बार खान देखील या सामाजिक कार्यात सामील झाले.

सविनय कायदेभंगाच्या चळवळीत या दोन्ही बंधूंनी योगदान दिल्यामुळे ब्रिटिशांनी त्यांना स्थानबद्ध केले आणि पुढे १९३४ मधे त्यांची सुटका झाल्यानंतर खान अब्दुल गफार खान आणि त्यांचे बंधू डॉक्टर खान दोघेही वर्धा येथील गांधीजींच्या आश्रमात राहू लागले.

त्यानंतर त्यांनी भारतात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रमुख नेते म्हणून भारतभर दौरे केले ज्यामुळे नंतरच्या कालखंडात ब्रिटिशांच्या विरोधात अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला मोठे समर्थन मिळाले. या दोन्ही बंधूंनी १९४२च्या भारत छोडो आंदोलनात सहभाग नोंदवला आणि त्यांना पुन्हा अटक झाली. त्यानंतर १९४५ साली त्यांची सुटका झाली.

गफार खान हिंदू-मुस्लिम ऐक्याचे आणि त्याचबरोबर अखंड भारताचे खरेखुरे समर्थक! अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी अखंड भारत हेच स्वप्न उराशी बाळगले होते. फाळणीच्या प्रस्तावास विरोध करणारे चारच नेते होते स्वतः महात्मा गांधी, गफार खान, राम मनोहर लोहिया आणि जयप्रकाश नारायण!

एका बाजूला बॅ. मुहंमद अली जिना मुस्लिम लीगच्या माध्यमातून धर्माच्या आधारावर राजकीय उद्दिष्टे साध्य करू इच्छित होते. त्याच वेळी भारतातील हिंदुत्ववादी सुद्धा बॅ. जिना प्रमाणेच हिंदू राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते.

वाचा : नेताजी, नेहरू आणि ब्रिटिशविरोधी लढा

वाचा : कार्ल मार्क्सवर होता धर्म आणि विज्ञानाचा मोठा प्रभाव

फाळणीचे कडवे विरोधक

अब्दुल गफार खान यांनी बॅ. जीना यांच्या मुस्लिम लीगला आणि सावरकरांच्या हिंदू महासभेला काँग्रेसच्या साथीने कडाडून विरोध केला. वायव्य सरहद्द प्रांतात १९३७च्या निवडणुकात मुस्लिम लीगला एकही जागा मिळाली नव्हती. परंतु १९४० साली पाकिस्तान निर्मितीची घोषणा केल्यावर मात्र मुस्लिम लीगला वायव्य सरहद्द प्रांत शिरकाव करता आला आणि त्यांना १९४० सालातील निवडणुकात १७ जागा मिळाल्या. परंतु तरीही ३० जागा मिळवून खान अब्दुल गफार खान यांचे बंधू डॉ. जब्बार खान यांच्या नेतृत्वाखाली ते सत्तेत राहिले.

अखंड भारताच्या फाळणीचा प्रस्ताव स्वीकारल्याबद्दल तत्कालीन काँग्रेस नेतृत्वावर ‘सत्तेसाठी फाळणी स्वीकारली’ असा आरोपही त्यांनी केला. पण ते त्यांच्या हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या आणि अंहिसेच्या तत्त्वापासून मागे हटले नाहीत. फाळणीच्या काळात वायव्य सरहद्द प्रांतात झालेल्या हिंसे दरम्यान खान अब्दुल गफार खान यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी अनेक हिंदूंचे आणि शिखांचे प्राण वाचवले.

देशाची फाळणी हा त्यांच्यासाठी खूप मोठा आघात होता. कारण स्वातंत्र्यपूर्व कालखंडात खान अब्दुल गफार खान यांनी सातत्याने बॅरिस्टर मुहंमद अली जिना आणि त्यांचा पक्ष मुस्लिम यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. परंतु फाळणीनंतर ‘पख्तुनीस्तान’ म्हणजेच वायव्य दिशेकडील अखंड भारताचा प्रांत हा स्वाभाविकपणे पाकिस्तानात सामील करणे अपरिहार्य बनले.

परिणामी खान अब्दुल गफार खान यांच्याबद्दल पाकिस्तानच्या सत्ताधिशांना कायमस्वरूपी तिरस्कार वाटत राहिला. फाळणी बद्दल अनेक मतमतांतरे असली तरीही, हा भारत देश अखंड राहिल आणि हिंदू मुस्लिम ऐक्य टिकेल, या हेतूने तन्मयतेने काम करणाऱ्या खान अब्दुल गफार खान यांना फाळणी ही खूप मोठा धोका या स्वरूपात अनुभवायला मिळाली.

वाचा : कशी होती तुघलक काळातील ईद?

वाचा : बाबरने शब्दबद्ध केलेला भारत कसा होता?

भारतात जंगी स्वागत

खान अब्दुल गफार खान १९६९ गांधी जन्मशताब्दीच्या निमित्ताने भारतात आले. तेव्हा त्यांनी भारतीय संसदेला उद्देशून केलेल्या भाषणात ‘भारत ज्याप्रमाणे बुद्ध यांना विसरला त्याच प्रमाणे तो गांधींनाही विसरत आहे’ अशी खंत व्यक्त केली होती.

भारताच्या फाळणीस स्वीकारल्या बद्दल त्यांनी भारतातील नेत्यांना उद्देशून उद्विग्नपणे असे वक्तव्यही केले की, “तुम्ही फाळणी करून, आम्हाला कोल्हे लांडगे यांच्या हवाली केले आहे.” त्यांचे हे वक्तव्य तंतोतंत खरे होते. अखेरपर्यंत त्यांनी कधीही फाऴणी स्वीकारली नाही. कारण पाकिस्तानची निर्मिती आणि पाकिस्तानच्या निर्मितीचे उद्दिष्ट याच्याशी खान अब्दुल गफार खान यांनी कधीही समर्थन केले नव्हते.

फाळणीनंतर त्यांनी पाकिस्तानमधे पाकिस्तान पासून ‘स्वतंत्र पख्तुनीस्थान’ निर्माण करण्याचे आंदोलन चालू ठेवले. ज्यास यश मिळालेच नाही.

भारत हा आपला देश धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक संसदीय लोकशाहीवर उभा राहिला. पण त्यात आपण खान अब्दुल गफार खान यांना सामील करून घेऊ शकलो नाही ही खुप मोठी खंत आजच्या भारतासाठी सदोदित सलणारी आहे.

अखिल भारतीय काँग्रेस बद्दल आणि अखंड भारताबद्दल सातत्याने सकारात्मक भूमिका घेणाऱ्या खान अब्दुल गफार खान यांचा पाकिस्तानमध्ये छळ झाला, हे वेगळे सांगायला नको. कारण पाकिस्तानी सत्ताधीशांनी त्यांना अनेक वर्ष तुरुंगात टाकले आणि आयुष्यातील काही काळ त्यांना अफगाणिस्तानमध्ये अतिशय कठीण परिस्थितीत व्यतीत करावा लागला.

गांधी जन्मशताब्दी सोहळ्यानंतर ते १९८५ साली पुन्हा भारतात आले. कारण होते काँग्रेसचा शतकपूर्ती महोत्सव. यावेळीही ते भारतात आकर्षणाचे प्रमुख केंद्र होते. भारतीय जनतेने त्यांना सतत भारताचा सुपुत्र मानून प्रेम केले. त्यांचे आत्मचरित्र ‘My life and Struggle’ हे त्यांची उद्विग्ता आणि भारतीयांबद्दलची आत्मियता समजण्यासाठी मुळातून वाचण्यासारखे आहे.

वाचा : कोकणी मुसलमानांचे पूर्वज ब्राह्मण होते का?

वाचा : भारताच्या लोकजीवनाविषयी बाबरला होती आस्था

भारत रत्न सन्मान

भारतातून परतल्यावर दोनच वर्षांनी १९८७ साली पाकिस्तानी सरकारने त्यांना पेशावरमध्ये स्थानबद्ध केले आणि तिथेच २० जानेवारी १९८८ रोजी त्यांचा मृत्यू झाला. ऐतिहासिक पुरावे नाहीत पण असे म्हटले जाते की त्यांना भारतात दफन व्हायचे होते पण त्यांच्या अनुयायांनी त्यांना अफगाणिस्तानातील जलालाबाद तिथे दफन केले!

भारत सरकारने १९८८ साली त्यांना ‘भारतरत्न’ हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला. भारतरत्न हा सन्मान मिळवणाऱ्या अनेक महान नेत्यांच्या यादीत खान अब्दुल गफार खान हे पाकिस्तानी नागरिक आहेत याचा अनेक आजकालच्या कथित देशभक्तांना पत्ताही नसेल!

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे एक प्रमुख नेते, अखंड भारताचे कडवे समर्थक आणि गांधीजींचे शिष्य म्हणून जगाला खान अब्दुल गफार खान यांची आजची ओळख आहे.

गांधीजींना पण ‘राष्ट्रपिता’ म्हणतो अगदी त्याच धर्तीवर खान अब्दुल गफार खान यांना भारतीय जनतेने तेच मानाचे स्थान दिले आणि त्यांचा ‘सरहद्द गांधी’ असा त्यांचा सन्मान केला. पण तरीही खान अब्दुल गफार खान यांनी मांडलेली खंत आणि अखंड भारताची त्यांची मागणी वा ईच्छा, ही प्रत्येक भारतीयासाठी सदैव एक मोठा प्रश्न म्हणून सर्व भारतीयांना सलत राहील.

जाता जाता :