प्रा. यास्मिन शेख : सदाप्रसन्न वैयायोगिनी

या शीर्षकात वदतोव्याघात आहे, अशी शंका वाचकाच्या मनात येणे स्वाभाविक आहे. व्याकरणासारखा क्लिष्ट विषय आणि त्यातील तज्ज्ञ व्यक्ती सदाप्रसन्न कशी असेल? पण यास्मिन शेख यांचे, म्हणजेच आमच्या शेखबाईंचे एकाच शब्दात वर्णन करायचे झाल्यास, हेच एक विशेषण समर्पक वाटते.

इतक्या वर्षांत त्यांच्या चेहऱ्यावर कधी वैताग किंवा कंटाळा बघितल्याचे मला तरी आठवत नाही. उदया त्या वयाची शहाण्णव वर्षे पूर्ण करत आहेत, हे त्यांच्या चेहऱ्यावरील टवटवीवरून आणि स्वरातल्या कोवळिकीवरून कोणाला खरेही वाटणार नाही.

यास्मिन शेख जन्माने ज्यू. हा समाज अतिशय प्रतिभावान. कार्ल मार्क्स, अल्बर्ट आइनस्टाइन, फ्रांझ काफ्का किंवा सिगमुंड फ्रॉइड हे ज्यूच होते. आजचा विचार केला, तर फेसबुक आणि व्हॉट्सअॅपचा मार्क झुकरबर्ग किंवा गुगलचा सर्गी ब्रिन यांच्यासारखे उद्योजक, स्टीव्हन स्पीलबर्गसारखा सिनेदिग्दर्शक, थॉमस फ्रिडमनसारखा पत्रकार किंवा बॉब डीलनसारखा गायक हेही ज्यूच.

जगातली यांची लोकवस्ती पाव टक्कादेखील नाही; पण आजवरच्या एकूण नोबेल विजेत्यांपैकी वीस टक्के ज्यू आहेत. पॅलेस्टाइन व आसपासचा परिसर, हे ख्रिस्ती आणि मुस्लिम यांच्याप्रमाणे ज्यू धर्मियांचेही मूळ स्थान. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी परदेशी आक्रमकांनी ज्यूंना देशोधडीला लावले.

वाचा : शासनाच्या मराठी मंडळावर मुस्लिम का नाहीत?

वाचा : साहित्य-संस्कृती व्यवहारातील पालखीवाहू ‘मुस्लिम’

मोडक्यातोडक्या जहाजातून भरकटत चाललेले त्यांचे एक जहाज कोकणात अलिबागजवळ खडकावर आपटून फुटले. त्यातले बहुतेक सगळे बुडालेच; पण सात जोडपी नौगावजवळ किनाऱ्यावर कशीबशी पोचली. अंगावरच्या वस्त्रांशिवाय जवळ काहीच नव्हते. स्थानिक कोळी समाजाने त्यांना उदार आसरा दिला.

काळाच्या ओघात या मूठभर ज्यूंची संख्या वाढत गेली. आपला धर्म त्यांनी जपला; पण स्थानिकांचे रीतिरिवाज व भाषा स्वीकारली. हे बेने इस्राएली १९४८ मध्ये इस्राएलच्या निर्मितीनंतर बहुतांशी तिथे परतले; भारतीयांच्या सहिष्णुतेबद्दल अपार कृतज्ञता मनात बाळगून.

त्यांच्यातील फ्लोरा सॅम्युएल या विदुषीने नंतर लिहिले, ‘मी साऱ्या जगाला सांगू इच्छिते, की भारत हा जगातील एकच असा देश आहे, जिथे आम्हा ज्यूंचा कधी धार्मिक कारणांवरून छळ झाला नाही.’ याच कृतज्ञताभरित ज्यूंमधली एक मुलगी म्हणजे जेरुशा रुबेन, लग्नानंतरच्या यास्मिन शेख.

त्यांचे वडील सार्वजनिक बांधकाम विभागात होते. फिरतीची नोकरी. तसे घर नाशिकला बांधलेले; पण उच्च शिक्षणासाठी कुटुंब पुण्यात. जेरुशा जात्याच खूप हुशार. प्रा. श्री. म. माटे यांची लाडकी विद्यार्थिनी. सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून १९४६ मध्ये त्या बी.ए. झाल्या; केवळ मराठीतच नव्हे, तर सर्वच विषयांच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळवून.

बीएनंतर त्यांना एमएसाठी फेलोशिप मिळाली होती; पण त्या काळात काही आजारपणामुळे त्या विश्रांतीसाठी पुण्याहून नाशिकमधील घरी गेल्या होत्या. त्यावेळी एमएसाठी पुस्तके कुठे मिळतील याची चौकशी करण्यासाठी, वडिलांबरोबर त्या सुप्रसिद्ध नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांच्या निवासस्थानी गेल्या. मुसळधार पावसात चिंब भिजलेल्या अवस्थेत!

वाचा : नवीन लेखकांसाठी पुस्तके प्रकाशित करण्याची सोपी प्रक्रिया

वाचा : मराठी ज्ञान, रोजगाराची आणि अभिजात होण्याची त्रिसूत्री!

कानेटकरांना त्यांच्या अभ्यासाविषयीच्या कळकळीचे विलक्षण कौतुक वाटले. त्यांनी आवश्यक ती पुस्तके मिळवून दिलीच; शिवाय नंतर त्यांनी जेरुशाची व डॅडी शेख या तेथील चित्रमंदिरात काम करणाऱ्या एका देखण्या, उमद्या, मुस्लिम तरुणाची ओळख करून दिली. कानेटकरांच्याच पुढाकाराने १९५० मध्ये दोघांचे लग्न झाले.

मिस जेरुशा रुबेन मिसेस यास्मिन शेख बनल्या. त्यांनी धर्म मात्र कधीच बदलला नाही. ही घटना तशी खळबळजनक होती; कारण जागतिक पातळीवर विचार केल्यास हिंदू-मुस्लिम भेदापेक्षा ज्यू-मुस्लिम भेद अधिक भयावह आहे. इस्राएल आणि भोवतालची अरब राष्ट्रे यांच्यातील सततचा संघर्ष त्याचेच द्योतक आहे.

पुढे शेखबाईंनी मुंबईला शीव येथील एस.आय.ई.एस. महाविद्यालयात २७ वर्षे मराठीचे अध्यापन केले. येथेच विंदा करंदीकर इंग्रजी व चंद्रकांत बांदिवडेकर हिंदी शिकवत. श्री. पु. भागवत मराठीचे विभागप्रमुख होते. शेवटची सात वर्षे शेखबाई विभागप्रमुख होत्या.

निवृत्तीनंतर दहा वर्षे त्या यूपीएससीच्या परीक्षार्थींना मराठी भाषाशास्त्र आणि व्याकरण शिकवीत होत्या. एकूण ४४ वर्षे त्यांनी मराठीचे अध्यापन केले. ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ आणि ‘मराठी शब्दलेखनकोश’ ही शेखबाईंची दोन्ही पुस्तके अभ्यासकांना खूप उपयुक्त ठरली आहेत.

शेखबाईंचे भाषाविषयक विचार सुस्पष्ट आहेत. शेखबाई म्हणतात, ‘बोलीभाषांचे महत्त्व मला मान्य आहे. ललित साहित्याला त्यामुळे प्रादेशिक डूब मिळून एक सच्चेपणा, एक जिवंतपणा येतो; पण वैचारिक लेखनात व एरवीही जिथे निवेदन असेल, तिथे प्रमाणभाषेचाच वापर हवा. नाही तर लेखकाला नेमके काय म्हणायचे आहे, ते समस्त मराठीजनांना कसे कळणार?

चंद्रपूरच्या लेखकाने झाडीबोलीत लिहिलेले कोकणातल्या वाचकाला कसे कळणार? मालवणी भाषेत लिहिलेले नागपूरच्या वाचकाला कसे कळणार? जळगावच्या अहिराणी भाषेत लिहिलेले कोल्हापूरच्या वाचकाला कसे कळणार? साधारण आशय संदर्भाने कळेलही; पण त्या आकलनात नेमकेपणा कसा येणार? प्रमाणभाषा जपली नाही, तर भाषेच्या क्षेत्रात अनागोंदी माजेल.’

वाचा : डॉ. अक्रम पठाण : मुस्लिम मराठी साहित्याचे साक्षेपी अभ्यासक

वाचा : कलीम खान : साहित्यातील आधुनिक कबीर

व्याकरणाचे नियम पाळण्यावरही त्या कटाक्षाने भर देतात. हेदेखील आज खूपसे अप्रिय ठरले आहे. शेखबाईंच्या मते, ‘संस्कृतची तोंडओळखदेखील नसलेल्यांसाठी म्हणून जर शुद्धलेखनाचे व विशेषतः ऱ्हस्व-दीर्घाबद्दलचे काही नियम बदलायचे असतील, तर त्यानुसार अधिकृतरीत्या नियमांमध्ये अवश्य बदल करा; पण जोवर तसे होत नाही तोवर सध्याचे, महामंडळाने बनवलेले व शासनमान्य असे १८ नियम आपण पाळलेच पाहिजेत.’

सोपे पर्यायी मराठी शब्द उपलब्ध असतानाही इंग्रजी शब्द वापरण्याला त्यांचा विरोध असतो. ‘तुमची मातृभाषा कोणती,’ या प्रश्नाला ‘मराठी’ असे उत्तर देणाऱ्या शेखबाईंच्या शमा आणि रुकसाना या दोन्ही मुलींचे शिक्षण मराठी माध्यमातूनच झाले आहे.

शेख आडनावाचा त्यांना खूपदा त्रासही झाला. एकदा मुंबई-पुणे आगगाडीच्या प्रवासात समोरच्या एका अपरिचित लहान मुलाशी त्यांच्या गप्पाटप्पा सुरू झाल्या. डॅडी शेख यांनी स्वतःची खिडकीतली जागा मुलाला दिल्यामुळे, तो अधिकच खूश होता. शेजारीच बसलेले मुलाचे आई-वडीलही गप्पांमध्ये हसतखेळत सामील झाले होते.

साधारण निम्मा प्रवास होऊन गेल्यावर, गप्पांच्या ओघात बाईंचे आडनाव ‘शेख’ आहे हे कळले आणि समोरच्यांची देहबोली एकदम बदलली. संभाषण मंदावले; मग जवळजवळ थंडावलेच. खिडकीत शेखांशेजारी बसलेल्या मुलाला त्याच्या आईने जवळजवळ हिसकावूनच आपल्याकडे घेतले आणि ती जरा लांब जाऊन बसली. उरलेल्या प्रवासात त्यांनी शेखांकडे पाहिलेही नाही.

असाच आणखी एक प्रसंग शेख दाम्पत्य पुण्यात फ्लॅट शोधत असतानाचा. एक फ्लॅट त्यांनी पसंत केला होता. प्राथमिक बोलणी झाली. प्रत्यक्ष व्यवहार करण्यासाठी जेव्हा शेख जोडपे त्या बिल्डरच्या कार्यालयात गेले व त्यांचे आडनाव शेख आहे हे स्पष्ट झाले, तेव्हा ‘सध्या फ्लॅट उपलब्धच नाही’ असे त्यांना ऐकावे लागले.

असे बरेच अनुभव गाठीशी असूनही, शेखबाईंच्या मनात जराही कटुता नाही; कारण या संदर्भातली त्यांची मते अगदी पक्की आहेत. त्या म्हणतात, ‘मला नेहमी वाटतं, धर्माची-जातीपातीची बंधनं माणसानं झुगारून द्यावीत. आपण कोणत्या धर्मात व जातीत जन्माला येणार, हे आपल्याला माहीत नसतं. ते आपण ठरवूही शकत नाही.

आपण माणसं आहोत आणि माणुसकी हा आपला एकमेव धर्म आहे, असं जर आपण मनापासून स्वीकारलं, तर मानवी समाज किती सुखी होईल, नाही?’ त्यांचे पती स्वतःही खूप पुरोगामी विचारांचे होते. ते वारले, तेव्हा त्यांच्याच अंतिम इच्छेनुसार शवाचे वैकुंठात दहन केले गेले होते, मुस्लिम परंपरेप्रमाणे दफन नव्हे, हेही येथे नमूद करायला हरकत नाही. अर्थात, त्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना महानगरपालिका अधिकाऱ्यांशी बराच वाद घालावा लागला होता.

मराठीप्रेम आणि परधर्मसहिष्णुता यांव्यतिरिक्त आवर्जून उल्लेख करायला हवा असा शेखबाईंचा तिसरा विशेष म्हणजे, त्यांची कर्तव्यनिष्ठा. महाविद्यालयात शिकवत असताना पाठाची पूर्वतयारी केल्याशिवाय, आवश्यक ती टिपणे काढल्याशिवाय त्या कधीही वर्गावर गेल्या नाहीत.

‘अंतर्नाद’ मासिकात ‘व्याकरण सल्लागार’ म्हणून त्यांचा उल्लेख असायचा; पण केवळ तेवढ्या व्यावसायिक पातळीवर आमचा संबंध कधीच नव्हता. ‘अंतर्नाद’चे काम त्यांना घरचेच वाटे. मासिकाची मुद्रिते त्या अगदी वेळेत तपासून देत. काम झाले, की लगेच स्वतः फोन करून कळवत; पाठपुरावा कधीही करावा लागत नसे.

एक मोठे नवल म्हणजे मुद्रिते तपासताना त्यांना चष्माही लावावा लागत नसे! यजमान हृदयविकाराच्या झटक्याने रुग्णालयात अतिदक्षता कक्षात असतानाही त्यांनी ‘अंतर्नाद’ची मुद्रिते तिथेच बसून व कसलेही अवडंबर न माजवता तपासून दिली होती.

वाचा : राहत इंदोरी : जमिनीशी नाळ जोडलेला कलंदर शायर

वाचा : मराठीतील ‘कोहिनूर-ए-गझल’ इलाही जमादार

साहित्यक्षेत्रात सगळ्यांच पातळ्यांवर आज पाट्या टाकायची प्रवृत्ती बोकाळत आहे. अशा परिस्थितीत शेखबाईंची कर्तव्यतत्परता जर लेखकांपासून पुस्तकविक्रेत्यांपर्यंत साहित्यक्षेत्रातील अधिकाधिकांनी अंगी बाणवली, तर अन्य कुठल्याही शासकीय वा बिनशासकीय मदतीशिवायदेखील मराठी साहित्यव्यवहार खूप अधिक उंचावर जाईल.

आजही दोन-तीन शब्दकोश नेहमीच त्यांच्या हाताशी असतात. एखाद्या शब्दाविषयी जरा जरी शंका आली, तरी कंटाळा न करता त्या शब्दकोश काढून तपासतील. लेखनसंस्कार करताना कुठलाही संदर्भ विचारा, लगेच स्पष्टीकरण देतील. स्वतःला ठाऊक नसेल, तर मुद्दाम शोध घेऊन माहिती पुरवतील आणि हे सर्व त्या अनेक अपरिचित व्यक्तींच्या बाबतीतही करतात. तेही अगदी हसतमुखाने.

त्या एकदा म्हणाल्या होत्या, ‘माझ्या प्रदीर्घ आयुष्यात जवळच्या आप्तेष्टांचे मृत्यू पाहण्याचे, क्लेशाचे अनेक प्रसंग आले; पण त्यामुळे हताश न होता, मनात नकारात्मक विचारांना स्थान न देता, सतत कार्यमग्न राहायचा मी निश्चय केला. मराठी भाषा व साहित्य यांच्या उपासनेला वाहून घेतलं. भा. रा. तांबे यांच्या ओळीत थोडा बदल करून मी ‘संध्याछाया सुखविती हृदया’ असं म्हणू शकते, ते या सकारात्मक दृष्टिकोनामुळेच.’ बहुधा हेच या वैय्यायोगिनीच्या चिरतारुण्याचे रहस्य असावे.

सहा वर्षांपूर्वी नव्वदीनिमित्त त्यांचा एक अनौपचारिक सत्कारसमारंभ त्यांच्या दोन्ही मुलींनी योजला होता. त्यात ‘अंतर्नाद’च्या वतीने शेखबाईंचा सत्कार करताना ज्येष्ठ संशोधक आणि लेखक डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर म्हणाले होते, ‘शेखबाईंकडे बघितल्यावर वाटते, की नाइण्टी तो झांकी है, सेन्चुरी अभी बाकी है! त्यांचा उत्साह बघितल्यावर वाटते, की तोही क्षण अजून दहा वर्षांनी नक्की येईल आणि त्यावेळीही आपण सर्व असेच इथे एकत्र येऊ!’

दाभोळकरांना अभिप्रेत असलेला तो क्षण आता अधिकच जवळ आला आहे. फक्त एक चौकार अजून हवा. शेखबाई, जीवेत शरदः शतम्!

(हा लेख लिहिताना २०१५ मध्ये मी ‘अंतर्नाद’च्या जून अंकात आणि ‘पुण्यभूषण’च्या दिवाळी अंकात लिहिलेल्या दोन लेखांचा आधार घेतला आहे.)

सौजन्य : मटा

जाता जाता :