पश्चिम बंगालबरोबरच इतर चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुका नेहमीप्रमाणे भाजपने देशाचे भवितव्य ठरविणाऱ्या असल्याचे म्हटले आहे. म्हणून सर्वपक्षीय राजकारणी फक्त या निवडणुका कशा आणि कोणत्या पद्धतीने जिंकता येतील, हिंसेच्या मार्गाने, पक्षांतर करून इ. सर्वकाही झाल्यावर मग घोडेबाजार थाटून कसेतरी या निवडणुकीत त्यांचा विजय व्हावा यासाठी झटत आहेत.
सामान्य माणसांचे कोणते प्रश्न आहेत, कोणकोणत्या समस्यांनी ते ग्रासले आहेत, त्यांच्या काल्याणासाठी कोणत्या योजना आखाव्यात याकडे कोणाचेही लक्ष नाही. याहीपेक्षा गंभीर प्रश्न असा की या देशाच्या नागरिकांना स्वतःच त्यांच्या समस्यांचे समाधान व्हावे असा विचार त्यांच्या मनालाही कधी स्पर्श करतो की नाही हे सांगता येत नाही.
१००-१२५ वर्षांपूर्वी संघाचा जन्म झाला, तेव्हापासून निरनिराळे अवतार घेऊन आता त्याचे भाजप झाले आहे. या देशाच्या जनतेची समस्या एकच मंदिर कुठे बांधायचे, कोणती मस्जिद पाडायची, एकंदर असे की त्या संघप्रणित पक्षाने भारतासाठी एकच अजेंडा ठरवलेला आहे तो म्हणजे ‘धर्मवेड्यांचा.’
वाचा : भारतात धार्मिक स्वातंत्र्याची अवस्था बिकट का होतेय?
वाचा : पश्चिम बंगाल निवडणुकीत काँग्रेसची ‘मुस्लिममुक्त’ धोरणे
धर्मवेडे म्हणजे ते स्वतः नाहीत त्यांना तर धर्म आणि धार्मिक शिक्षण, संस्कृतीशी काहीएक देणेघेणे नाही. या धर्मवेडामागे त्यांचे एकच षड़्यंत्र ते असे की भारतातल्या साऱ्या जनतेला धार्मिक हिंसा, जातीय व्यवस्था, मंदिर वगैरे प्रश्नांत गुंतवून त्यांना वेडे करून टाकणे म्हणजेच धर्मवेडे! त्यांचा खरा अजेंडा या देशाच्या संपत्तीची लूट माजवण्याचा आहे. ज्यांनी हा देश बांधला नाही, ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत कधी भाग घेतला नाही, अशा काही मूठभर उद्योगपतींना देशाची १०० टक्के संपत्ती विकायची आहे.
एकदा हे लक्ष्य साध्य झाल्यावर मग मागच्या दारातून या उद्योगपतींच्या संपत्तीतून आपला वाटा मिळवायचा आहे. या पलीकडे त्यांचा कसलाच ध्यास नाही. देशाची प्रगती, आर्थिक उन्नती, विज्ञान-तंत्रज्ञानाचा विकास, नैतिकता, संस्कृती, संस्कार या सर्व बाबींशी त्यांना काही देणेघेणे नाही. कारण ते देशाच्या विकासासाठी, जनकल्याणासाठी उपयोगी असतात आणि जनकल्याण एक असे क्षेत्र आहे ज्यास उद्ध्वस्त करण्याचे उद्देष्ट संघप्रणित भाजपचा सर्वांत महत्त्वाचा अजेंडा आहे.
अदानी आणि अंबानी सध्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताबा मिळवून बसले आहेत. सर्व कायदे, साऱ्या योजना त्यांच्या भल्यासाठी, त्यांच्या श्रीमंतीत भर टाकण्यासाठी भाजप सरकार अहोरात्र झटत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील सारे उद्योग व्यापारांचे खाजगीकरण करून त्यांच्या पदरी टाकायचे आहेत. कोट्यवधी शेतकऱ्यांच्या शेतजमिनींचा पट्टा त्यांच्या नावावर करायचा आहे.
वाचा : ‘ऑक्सफॅम अहवाल २०२१’ म्हणजे विषमतेचा विषाणू
वाचा : करोना महामारीचे सांप्रदायिकीकरण
असे म्हणतात की ज्या तीन कृषी कायद्यांना सरकारने मंजुरी दिली आहे ते रद्द करून शेतकऱ्यांची मागणी पूर्ण करणे आता सरकारच्या हातात नाही, कारण अदानी-अंबानी सरकारला असे काहीही करू देणार नाहीत. साहजिकच मग गेल्या तिमाहीत अडाणींच्या श्रीमंतीत १६ अब्ज डॉलर आणि अंबानींच्या श्रीमंतीत ८ अब्ज डॉलर्सची वृद्धी झाली असेल तर यात नवल नाही. असेच चालले तर पुढच्या तिमाहीत ती तिप्पट झाल्याशिवाय राहणार नाही.
उद्योजकांच्या सेवेसाठी रेल्वेचे, बँका, विमा कंपन्या, विमानतळ, सार्वजनिक क्षेत्रातील कमीअधिक ११२ कंपन्यांचे खाजगीकरण करण्याचे कार्य २४ तास सुरू आहे. १० मंत्र्यांना मार्चअखेरपर्यंत याच कामावर नेमले गेले आहे. त्यांच्याच भल्यासाठी कोट्यवधी लोकांचे रोजगार गेले, १० हजारहून अधिक कंपन्या बंद पडल्या.
शासकीय बँकांच्या खाजगीकरणाविरूद्ध बँक कर्मचारी-अधिकारी वर्गाने संप पुकारला, त्याने काय होणार? तीन महिन्यांपासून शेतकरी संपावर आहेत, आंदोलन छेडले आहे, त्यांचे काय झाले? त्यांनी २०० माणसांचा बळी दिला. याचा उपयोग काय झाला? जोपर्यंत सबंध देश, सर्व नागरिक, तरुण, बेरोजगार उठाव करत नाहीत काहीही साध्य होणार नाही. पण हे महत्त्वाचे मुद्दे निवडणूक प्रचारातून गायब आहेत.
ममता आल्या की गेल्या स्टालिनने निवडणुका जिंकल्या की पनामस्वामींनी याचा काही एक प्रभाव देशाच्या सद्यस्थितीवर पडणार नाही. या राज्यांच्या निवडणुकीत ३० कोटी मुस्लिम लोकसंख्या आहे. त्यांना तलाकशिवाय इतर पक्षांनी काय दिले? त्यांच्या समस्या कुणी मांडायचा प्रयत्न यासाठी करत नाही की त्यांना सेक्युलॅरिझमची शिवी दिली जाईल.
वाचा : ‘सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट’ की सांस्कृतिक वारसा पुसण्याचा प्रयत्न
वाचा : सावरकरांच्या हिंदुराष्ट्रात वंचितांचे स्थान काय असेल?
असे म्हटले जाते की भारतात मुस्लिम लोक एका हातात ‘तलवार’ आणि दुसऱ्या हातात ‘कुरआन’ घेऊन आले होते. त्यांच्यानंतर इंग्रज आले, त्यांच्या एका हातात ‘बायबल’ आणि दुसऱ्या हातात ‘तराजू’ होता. मुस्लिमांनी तलवारीच्या बळावर धर्मांतर केले. इंग्रजांनी तराजूचा वापर करून व्यापार मांडला आणि भारताची संपत्ती लुटली.
मुस्लिमांनी संपत्ती नेली नाही, ती इथंच गुंतवली आणि शिक्षणाची दारे सामान्यांसाठी उघडी केली. त्यानंतर पंडित नेहरू म्हणजेच काँग्रेस पक्ष आला. त्यांनी इथल्या नागरिकांसाठी एकापेक्षा एक कल्याणकारी योजना, शिक्षण, सभ्यता संस्कृती भारतात रुजविली. देशाचा जसजसा विकार केला ते सर्वांच्या समोर आहे.
शेवटी त्रिशूलधारी भाजपने धर्माचे राजकारण करून साऱ्या देशाला पुन्हा गुलामीत टाकले. इंग्रजांच्या हातातला तराजू घेऊन देशाचा बाजार मांडला, ही सध्याची परिस्थिती आहे.
जाता जाता :
लेखक ज्येष्ठ पत्रकार असून गाजिउद्दीन रिसर्च सेंटरचे पदाधिकारी आहेत. इस्लामी तत्त्वज्ञानावर त्यांनी पुस्तके लिहिली आहेत.