महमूद : ‘किंग ऑफ द कॉमेडी’

प्राचीन भारतीय ग्रंथात रसानुभूती बद्दल खूप सविस्तर असे वर्णन आले आहे. यात रसांचे चार अंगे सांगितली आहेत. मनात जे विविध भाव प्रगट होतात त्याना ‘संचारी भाव’ असे म्हटले जाते. यात एकूण ३३ प्रकारचे भाव सांगितले आहेत. तर रसांचे एकूण ११ प्रकार नोंदवले आहेत. यामधील एक आहे हास्य रस. हे सर्वप्रकार भारतीय नृत्य शैलीत अत्यंत महत्वाचे समजले जातात.

हास्य हे आमच्या आनंदी जीवनाचे मूख्य सूत्र आहे, जे हल्ली दुर्मिळ होत चालले आहे. आम्ही दिवसभरातून किती वेळी हसतो? हा एक संशोधनाचा विषय आहे. भारतीय आद्य लोककलेतील सोंगाड्या वा विदूषक हा हास्याचा पूर्वज म्हणायला हरकत नाही.

नंतरच्या काळात नाट्य आणि चित्रपट या आधुनिक कलाप्रकारांनी हास्य टिकवून ठेवले हे त्यांचे उपकारच म्हणायले हवे. भारतीय चित्रपट हा नायक/नायिका, खलनायक, संगीत आणि विनोद या चार खांबावर आजही टिकून आहे. किंबहुना हे चार अंग चित्रपट बघायला भाग पाडतात.

१९४०-५०च्या दशकात चित्रपटसृष्टी जसजशी सर्वांगाने बहरू लागली तसतसे चित्रपटांचे विषयही बदलू लागले. या काळात विनोदी अभिनेत्यानां चित्रपटातून महत्वाचे स्थानही मिळू लागले. भगवानदादा, गोप, आगा, जॉनी वॉकर, किशोर कुमार,राजेंद्रनाथ, मुक्री, आय. एस. जोहर, धूमाळ, असित सेन, मारूती, सुंदर, टूणटूण, मनोरमा, केष्टो मुखर्जी, जगदीप, देवेन वर्मा, मोहनचोटी अशी एक लांबलचक फळी तयार झाली.

मुख्य नायकाचा मित्र वा हितचिंतक असे हे पात्र असे. हसविण्या बरोबरच चित्रपट कथेला पुढे नेण्याचे काम हे विनोद वीर करत असत. या सर्व नावात भगवानदादा, जॉनी वॉकर आणि किशोर कुमार यांची पडद्यावरची एंट्री धूम करीत असे. या नामावलीत आणखी एका नावाची भर पडणार होती.

वाचा : जॉनी वॉकर : नायकाच्या समांतर रोल मिळवणारा सहयोगी कलावंत    

वाचा : बॉलीवूडचे इफ्तेखार दिसताच, खरे पोलीस त्यांना सॅल्युट ठोकत

संघर्षाचा काळ

१९४३मध्ये भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीतला पहिला सूपरडूपर चित्रपट ‘किस्मत’ रिलीज झाला. या चित्रपटाचे नृत्य दिग्दर्शक होते मुमताज अली. त्याकाळातले सर्वात प्रसिद्ध रंगभूमी अभिनेता व नृत्य दिग्दर्शक म्हणून त्यांचा नाव लौकिक होता. त्यांना एकूण आठ मुलं होती.

किस्मतचे नृत्य दिग्दर्शन करताना त्यांच्या दुसऱ्या क्रमांकाच्या ११ वर्षाच्या मुलाने या चित्रपटात बाल कलावंत म्हणून भूमिका केली. या चित्रपटाने अशोक कुमार या अभिनेत्याला सुपरस्टार केले. भारतीय चित्रपटात नायकाचा सर्वप्रथम डबल रोल याच चित्रपटाने दिला.

यातील या छोट्या बाल कलावंताने पुढे अशोककुमार बरोबर अनेक सिनेमे केले. ‘महमूद अली’ हे त्याचे नाव. पुढे चित्रपट सृष्टीतला सुप्रसिद्ध विनोद वीर ‘महमूद’ झाला. भगवान दादा, गोप व जॉनी वॉकर या विनोद वीरा नंतर नंतर सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली ती महमूदला.

हिंदी चित्रपटसृष्टीतला एक काळ असा होता की महमूद हा चित्रपटात असायलाच हवा असे निर्माते व वितरक आवर्जून सांगत. फक्त महमूदसाठी चित्रपट बघणारा एक खूप मोठा वर्ग त्याकाळी तयार झाला होता. मात्र महमूदला यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला.

महमूदचा जन्म २९ सप्टेंबर १९३२ रोजी मुंबईत झाला. तरुण महमूदने अभिनेता होण्यापूर्वी सर्व प्रकारची पडेल ती कामे केली. लोकलमध्ये टॉफी विकणे, सिने इंडस्ट्रीत ड्रायव्हरची गरज असते म्हणून ड्रायव्हर झाले. किस्मतचे दिग्दर्शक ग्यान मुखर्जी, गीतकार भरत व्यास, राजा मेंहदी अली खान, निर्माते पी.एल. संतोषी (दामिनी फेम दिग्दर्शक राजकुमार संतोषीचे वडील) यांचे ड्रायव्हर म्हणूनही काम केले.

सुप्रसिद्ध अभिनेत्री मीना कुमारीला टेबल टेनीस शिकविण्याची नोकरी महमूदला मिळाली. याच काळात मीना कुमारीची बहिण मधूच्या प्रेमात तो पडला व नंतर त्यांनी लग्न केले. मुलही झाली. संसार जरा मोठा झाल्यामुळे अधिक पैसे कमाविण्यासाठी आपण अभिनय करायला हवा असे त्याचे मत झाले आणि त्याने गंभीरपणे हे मनावर घेतले.

एकदा ‘नादान’ नावाच्या चित्रपटाचे चित्रीकरण चालू होते. मधुबाला या चित्रपटाची नायिका होती. तिच्या समोर एक ज्युनिअर कलाकार रिटेक वर रिटेक देत होता पण सीन ओके होत नव्हता. शेवटी दिग्दर्शकाने महमूदला संवाद म्हणायला लावले आणि टेक ओके झाला.

महमूदला याचे ३०० रूपये मिळाले. त्यावेळी ड्रायव्हर म्हणून त्याला केवळ महिना ७५ रूपये मिळत असत. मग त्याने ड्रायव्हरचे काम सोडले व ज्युनिअर आर्टिस्ट असोशिएसनच्या यादीत आपल्या नावाची नोंद केली. या नंतर मग त्याने बिमल रॉयचा ‘दो बिघा जमीन’, त्रिलोक जेटलीचा ‘गोदान’, गुरूदत्तचा ‘प्यासा’, जागृती, सीआयडी वगेरे चित्रपटात लहान सहान कामे केली. पण आणखीही लक्ष वेधून घेणारी भूमिका त्याला मिळाली नव्हती.

वाचा : दिलीपकुमार : मुस्लिम ओबीसी चळवळीचे ‘अर्ध्वयू’

वाचा : दिलीपकुमार यांची अदाकारी परिपूर्ण होती, पण….

हास्य कलावंत म्हणून प्रसिद्धी

एव्हीएम ही दक्षिणेतील प्रसिद्ध चित्रपट संस्था. १९५६ मध्ये या संस्थेचा ‘मिस मेरी’ नावाच्या चित्रपटाची निर्मिती होत होती. मीना कुमारी व जेमिनी गणेशन मूख्य भूमिकेत होते. महमूद स्क्रीन टेस्टसाठी तेथे गेला पण तो या टेस्टमध्ये नापास झाला.

टेस्ट घेणाऱ्यांनी त्याला स्पष्ट सांगितले की, “तू आयुष्यात कधीही अभिनेता होऊ शकणार नाहीस तेव्हा हा विचार डोक्यातून काढून टाक.” आणि काय गंमत बघा याच एव्हीएम बॅनरने १५ वर्षांनंतर १९७१मध्ये एक चित्रपट बनवला ‘मै सुंदर हूँ’ आणि मुख्य भूमिकेत होता महमूद.

असाच वाईट अनुभव व कडवे बोल त्याला आणखी एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने सुनावले होते. कमाल अमरोही हे महमूदचे दूरचे नातेवाईक. एकदा तो त्याच्याकडे काम मागायला गेला. तेव्हा कमाल अमरोही म्हणाले, “तू मुमताज अलीचा मुलगा आहेस याचा अर्थ तू अभिनेता होऊ शकलाच पाहिजे असे काही नाही. हवे तर मी तुला थोडी आर्थिक मदत करतो, एखादा छोटा मोठा धंदा कर.”

या वेळी मात्र या कडव्या बोलांना महमूदने आव्हान म्हणूनच स्वीकारले. याच वेळी त्याला बी.आर. चोप्राच्या कॅम्पमधून बोलावणे आले. बी.आर. फिल्मस् ही नामवंत संस्था. ‘एक ही रास्ता’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला बोलावण्यात आले होते. पण तिथून आपल्याला कसे काय बोलावणे आले हे त्याला समजेना.

नंतर माहिती घेतल्यावर त्याला कळले की त्याच्या बायकोने मीना कुमारीला महमूदसाठी शिफारस करायला लावले होते. महमूदने निर्मात्याला नम्रपणे नकार दिला व सांगितले, “मला कोणाच्या शिफारशीवरून काम नको आहे. माझ्यातील क्षमताच मला एक दिवस काम मिळवून देईल.” आणि खरोखरच तसेच घडले.

महमूदचा संघर्ष चालूच होता. १९५८मध्ये ‘परवरीश’ नावाच्या चित्रपटात त्याला मोठी भूमिका मिळाली. चित्रपटाचा नायक राज कपूरच्या भावाची ही भूमिका होती. या भूमिकेने त्याला हास्य कलावंत म्हणून पहिली प्रसिद्धी मिळवून दिली.

या नंतर १९५९ मध्ये दक्षिणेतल्या प्रसाद फिल्म या बॅनरच्या ‘छोटी बहन’मध्ये भूमिका मिळाली. हा चित्रपट त्याच्या आयुष्याचा टर्निंग पाँईट ठरला. महमूद आणि शुभा खोटे ही जोडगोळी या चित्रपटाने दिली आणि पुढे अनेक वर्षे ही जोडी हिट झाली. या चित्रपटाचे मानधन म्हणून महमूदला ६००० रुपये मिळाले जी त्याची आजपर्यंतची सर्वात मोठी कमाई होती.

लगेच एका वर्षाने याच बॅनरच्या ‘ससुराल’ मध्येही त्याला भूमिका मिळाली. राजेंद्र कुमार आणि बी. सरोजादेवी प्रमूख भूमिकेत होते. मग मात्र महमूदची गाडी सुसाट निघाली. पुढची १५ वर्षे त्याने धुमाकूळ घातला. अनेकदा तो नायकाला पण भारी पडला. त्याला कधी अंगविक्षेप करण्याची गरज पडली नाही. संवाद फेकीचे त्याचे स्वत:चे असे एक स्वतंत्र तंत्र होतं. नायकाचा सर्वात चांगला मित्र म्हणून तो अनेक चित्रपटात झळकला.

वाचा : रूपेरी पडद्यावर ‘नाच्या’ची परंपरा कशी सुरू झाली?

वाचा : गणपत पाटील : अभिनयाची शिक्षा भोगणारा खरा ‘नटरंग’

प्रत्येक फ्रेममध्ये महमूद

चित्रपटात जवळपास नायकाच्या प्रत्येक फ्रेममध्ये तो दिसायचा. खलनायकाची ऐशीतैशी नायकापेक्षा तोच अधिक करत असे. आता तो पूर्णपणे रूळला होता. ‘मंझील’, ‘दिल तेरा दिवाना’, ‘छोटे नवाब’, ‘घर बसा के देखो’, ‘शबनम’, ‘चित्रलेखा’, ‘आरजू’, ‘पती पत्नी’, ‘मेहरबान’, ‘पत्थर के सनम’, ‘गुनाहो का देवता’, ‘प्यार किए जा’, ‘लव्ह इन टोकियो’, ‘आंखे’, ‘नील कमल’, ‘जवाब’, ‘जिगरी दोस्त’ इत्यादी चित्रपटात त्यांनी धमाल केली. याच काळात तो आणि आय.एस.जोहर या जोडगोळीने धम्माल उडवून दिली. पण तो एवढ्यावरच समाधानी नव्हता त्याला अनेक प्रयोगही करायचे होते.

१९६५मध्ये राजा नवाथे यांचा ‘गुमनाम’ चित्रपट आला. यात महमूदने पक्का हैदराबादी आचारी हैदराबादी बोली सकट आणला. लुंगी चट्ट्यापट्ट्याचे शर्ट, चॅपलिन टाईप मिशा असलेल्या या बटलरने ‘हम काले है तो क्या हुवा…’ म्हणत हेलेन बरोबर अक्षरश: धूडगूस घातला.

महानायक अमिताभला पण या गाण्याचा इतका मोह झाला की ‘देशप्रेमी’ या चित्रपटात ‘खातून की खिदमत मे…..’ हे गाणे याच गाण्याची थेट कॉपी होते. तर ज्युनिअर महमूदलाही याच गाण्याच्या नकलेने चित्रपटात प्रवेश मिळवून दिला. शैलेंद्रने ‘हम काले है तो’ हे गाणे खास हैदराबादी भाषेत लिहिले होते. या चित्रपटात महमूद सगळ्याच कलाकारावर भारी पडला आहे.

महमूदने आपल्या स्वभावाने अख्खी चित्रपटसृष्टी जवळ केली होती. स्वत: केलेले कष्ट तो आयुष्यभर विसरला नाही. सुरुवातीच्या काळात एकदा ‘मला कॉमेडी करण्याच्या टिप्स हव्या’ म्हणून तो किशोर कुमारकडे गेला होता. किशोर कुमारला त्याची क्षमता माहीत होती.

किशोर कुमार म्हणाला, “मी स्वत: कॉमेडियन असताना तुला का टिप्स देऊ?” यावर महमूद म्हणाला होता, “एक दिवस मी माझ्या सिनेमात तुला नक्की घेईन.” आणि महमूदने आपले वचन पाळले. १९६८मध्ये महमूदने एन.सी. सिप्पी यांच्या सहकार्याने ‘पडोसन’ची निर्मिती केली.

१९५२मध्ये आलेल्या ‘पशेर बारी’ या सिनेमाचा रिमेक होता. सुनील दत्तने पहिल्यांदाच या चित्रपटात विनोदी भूमिका केली. यातील किशोर कुमार आणि महमूदच्या डान्स मास्टर अण्णाने धम्माल केली. यातील ‘एक चतूर नार….’ या गाण्याला आजही प्रचंड प्रतिसाद मिळतो. पचंमदाने काय अफलातून गाणे रेकॉर्ड केले आहे.

वाचा : मदनमोहन : अविट चालीची गाणी देणारा प्रतिभाशाली संगीतकार

वाचा : सलमा आग़ा : बॉलीवूडने नाव ठेवले, तरी ठरली सुपरहिट गायिका

सुपरहिट जोडी

महमूदची शुभा खोटे नंतर सत्तरच्या दशकात अरुणा ईराणी बरोबरही मस्त जोडी जमली. दोघांची केमेस्ट्री छान जुळली होती. ‘हमजोली’ या चित्रपटात महमूदने तिहेरी भूमिका करून धमाल केलीय. पृथ्वीराज, राज आणि रणजित कपूर अशी तिन अभिनेत्यांची धमाल पॅरोडी होती.

‘प्यार किए जा’मधील सिनेमा शौकिन बिलंदर पोरगं महमूद आणि त्याचा कवडीचुबंक बाप ओम प्रकाश यांनी जाम बहार उडवून दिली. मराठीतला महेश कोठारेचा ‘धूम धडाका’ याच चित्रपटावर बेतला आहे. अरुणा इराणी आणि अमिताभ यांना ‘बॉम्बे टू गोवा’ या चित्रपटात नायक नायिकाच्या भूमिकाही महमूदनेच दिल्या.

महमूद खूप मोठ्या मनाचा आणि नवीन टॅलेंट ओळखण्यात पारंगत होता. पचंमदा, राजेश रोशन, बासू मनोहारी यांना त्यानेच स्वतंत्रपणे संगीत दिग्दर्शनची संधी दिली. त्याने स्वत: अनेक चित्रपटाची निर्मिती केली. तृतीय पंथीय लोकांना चक्क स्वत:च्या चित्रपटात संधी दिली.

‘सज रही गली मेरी माँ…’ हे ‘कुवाँरा बाप’मधील गाणे आठवा. पोलिओग्रस्त मुलाची ही कथा होती. काय सुंदर आणि प्रगल्भ अभिनय केलाय यात महमूदने. ‘मस्ताना’, ‘लाखो में एक’, ‘मैं सुंदर हूं’, ‘कुवाँरा बाप’ हे माझे खूप अवडते चित्रपट. यात सर्वच चित्रपटातून महमूदने अक्षरश: प्रेक्षकानां रडवले आहे. यातल्या रिक्शांच्या शर्यतीत खरे रिक्शावाले सामिल झाले होते.

त्याच्या ‘साधू और शैतान’ आणि ‘कुवाँरा बाप’मध्ये दिलीप कुमार, मुमताज, किशोरदा, अमिताभ, धमेंद्र, विनोदखन्ना, हेमा मालिनी, दारासिंग, असित सेन यांनी कुठलाही मोबदला न घेता काम केले. रिक्शावाला हा चित्रपटाचा नायक होऊ शकतो याची ग्वाही त्याने दिली.

स्वत:चा वेगळा अंदाज, हावभाव बोलण्याचा ढंग याद्वारे महमूदने जवळपास ५ दशके प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आणि ‘किंग ऑफ कॉमेडी’ ही पदवी प्रापत केली. त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत त्याने जवळपास ३०० चित्रपट केले व तीन वेळा फिल्म फेअर पुरस्कारही प्राप्त केला.

१९९६मध्ये शाहरूख खानला घेऊन त्याने ‘दुश्मन दुनिया का’ नावाचा चित्रपट तयार केला पण तो साफ कोसळला. यात त्याने आपला मुलगा मंजूर अली याला लाँच केले होते.

वाचा : ‘बाबूजी धीरे चलना…’ म्हणणारी सदाबहार शकीला

वाचा : सलमा आग़ा : बॉलीवूडने नाव ठेवले, तरी ठरली सुपरहिट गायिका

तामिळी घराणे

सत्तरच्या दशकात जगदीप, असरानी, पेंटल, देवेन वर्मा, कादर खान यांच्या प्रभावामुळे महमूद काहीसा मागे फेकला गेला. त्याचे मधू बरोबरचे लग्न यशस्वी झाले नाही. १९६७ मध्ये दोघे विभक्त झाले. दुसरी पत्नी ट्रेसी ही अमेरिकन. या पत्नी पासून झालेले मन्झूर अली, मन्सूर अली आणि बेबी जीनी ही मुलगी…. पैकी मन्सूर अली हा लकी अली या नावाने सर्वाना परीचित आहे. तो अभिनेता आहे आणि त्याचा गझल आणि गीतांचा अल्बम प्रसिद्ध आहे.

पहिल्या पत्नी पासून मसूद अली, मखदूम अली, मासूम अली ही मुलं. ही सर्व मुलं आणि मुलगी जिनी त्याच्या ‘एक बाप छह बेटे’ या चित्रपटात होती. त्याचा लहान भाऊ अनवर अलीला पण त्याने अभिनेता म्हणून समोर आणले. तर महमूदची सख्खी बहिण मिनू मुमताज ही पण अभिनेत्री आहे.

महमूदचे मूळ घराणे तामीळ आहे. त्याचे आजोबा (वडीलाचे वडील) एके काळी कर्नाटकचे नवाब होते. त्यामुळे दाक्षिणात्य भाषेवरील प्रेम लक्षात येते. महमूद घोड्याच्या रेसचा शौकिन होता. बंगलोरला त्याचा स्वत:चा घोडयांचा तबेला होता. त्याचे वडीलावर अफाट प्रेम होते.

‘कुवाँरा बाप’ या चित्रपटात त्याच्या वडीलांनी छोटी भूमिका केली आहे, जी त्यांची शेवटची भूमिका होती. वडिलाच्या कबरी शेजारी महमूदने आपल्या कबरीचा जागा आधीच तयार करून ठेवली होती. २३ जुलै २००४मध्ये अमेरिकेच्या पेनिसिल्व्हेनिया शहरात वयाच्या ७२व्या वर्षी महमूदने त्याच्या पाठीवरच्या ऑक्सिजनच्या सिलेंडरमधून झोपेतच शेवटचा श्वास घेतला.

असं म्हटलं जातं की अस्सल विनोदाच्या पायतळी वेदनांचा पाया असतो. चॅर्ली चॅप्लीनने आयुष्यात प्रचंड सहन केले होते कदाचित त्यामुळेच लोकानां तो इतकं खळखळून हसवू शकला. महमूदचे ही कदाचित असेच असावे. त्याच्या उतरत्या काळात हा माणूस प्रचंड एकटा पडला नव्हे एकाकी झाला.

त्याची एक प्रदीर्घ मुलाखत मी युट्यूब वर बघितली होती. या मुलाखतीत महमूद स्वत:चे कुटुंबीय व चित्रपटसृष्टीतील अनेक कलावंताबद्दल भरभरून बोलला आहे. यात अमिताभबद्दल जवळपास मिनिटांचा वीडिओ आहे. ज्या अमिताभला कधी काळी त्याने मदत केली होती ती सर्व हा महानायक का विसरला असावा याचं गूढ समजत नाही.

अमिताभ महमूद यांच्या अत्यंविधीला गेले नव्हते हे एक सत्य आहे. पडद्यावरच्या ज्या महमूदने लाखो प्रेक्षकांना चार दशके हसवले, हसता हसता लोळवले त्या ‘कॉमेडी ऑफ द किंग’ला मी या मुलाखतीत ढसाढसा रडताना बघितले.

उतार वयातील त्याची वाढलेली पांढरी दाढी आणि नाकाला लावलेले ऑक्सिजनचे नळकांडे बघून ‘हाच का तो महमूद ज्याने आपल्या हास्यातून आम्हाला जगण्यासाठी प्राण वायू दिला होता’ हा विचार मनाला बोचणी देत होता. आजही जेव्हा केव्हा माझ्या मनावर मळभ दाटून येते तेव्हा मी पडोसनचे ‘एक चतूर नार…’ बघतो आणि नव्या उर्मीने कामाला लागतो. आज महमूदचा स्मरण दिवस…मन:पूर्वक श्रद्धाजंली.

जाता जाता :