दिलीपकुमार यांची अदाकारी परिपूर्ण होती, पण….

नैनिताल, साल होते 1954. दिलीपकुमार, देव आनंद आणि हॉलिवूडच्या टारझनचे झिप्पी नावाचे चिपांझी माकड यांच्या भूमिका असलेला ‘इन्सानियत’ नावाचा सिनेमा पाहून चार वर्षांचा मी माझ्या दोन मावश्यांसोबत घरी परतत होतो. या माकडाचीच भूमिका सिनेमातील सगळ्या माणसांपेक्षा सरस झाली होती. “शेवटी हा मरतो का म्हणून दरवेळी?” माझ्या मावश्या  हळहळत होत्या. ते ऐकून त्यावेळी मी जरा गोंधळून गेलो होतो.

त्यानंतर आणखी काही वर्षांनी कोहिनूर हा मला फारच आवडलेला साहस आणि रोमान्स यांनी भरलेला हसरा- नाचरा सिनेमा पाहिला. त्यावेळी दिलीपकुमारवर जरा अधिकच मोहित असलेली माझी धाकटी मावशी वेगळीच कुरकुर करत होती. मग लीडर हा फसलेला उपरोधिक सिनेमा पाहून तर ती खवळलीच. “सारखे सारखे विदूषकी चाळे का करतोय हा?” तक्रारीने आता नवे रुप धारण केले होते.

माझ्या त्या मावश्या आज जिवंत असत्या तर हा थोर माणूस खरोखरच ‘तेजात विलीन होऊन, वाऱ्यात मिसळून’ गेल्याचे पाहून नक्कीच अश्रू ढाळत बसल्या असत्या. माझ्याही डोळ्यात पाणी आलेच. मात्र त्यामागे प्रामुख्याने एक खंत होती.

दिलीपकुमारसाहेब आपल्या जीवनात काय साधू शकले असते आणि त्यांनी काय साधायला हवे होते याबद्दलची खंत. “लाभलेल्या जीवनाचा उपयोग तुम्ही कसा करता हे महत्त्वाचे, मृत्युला त्याच्या निम्म्यानेही महत्त्व असत नाही.” हे सुभाषित मी आयुष्यभर ध्यानात ठेवलेय. त्यामुळे त्यांच्या मृत्यूबद्दल विलाप करत न बसता त्यांच्या जीवितकार्याचाच उहापोह मी यावेळी केला तर वाचकांनी मला क्षमा करावी.

वाचा : दिलीपकुमार : मुस्लिम ओबीसी चळवळीचे ‘अर्ध्वयू’

वाचा : ‘साहिबे आलम’ दिलीपकुमार यांचा मराठी बाणा

व्यावसायिक हिंदी चित्रपटसृष्टीच्या अभिनयक्षेत्रातील ते पवित्र अमृतकुंभ होते, त्यांच्या अभिनयाची उंची गाठणे यापुढेही कोणाला जवळपास अशक्य अशा शब्दांतील सार्थ आदरांजली सर्वांनी वाहून झालेली आहे. आता त्यांच्या विशिष्ट भूमिकांच्या निर्विवाद थोरवीबद्दलच न बोलता मी काही प्रश्न उपस्थित केले तर ते अशोभनीय ठरणार नाही असा विश्वास मला वाटतो.

महानायक म्हणून त्यांनी घालून दिलेले उदाहरण अनुकरणीय आहे का, आपल्या क्षेत्राच्या प्रगतीच्या शक्यता त्यांनी अधिकाधिक रुंदावत नेल्या की महानायकाभोवती फिरणारे चित्रपटक्षेत्राचे जे अवनत रुप आपण आज पहात आहोत त्या अधोगतीलाच ते साहाय्यभूत ठरले या चर्चेला मी येथे चालना दिली तर ते अप्रस्तुत किंवा अप्रासंगिक ठरणार नाही, असेच मला वाटते.

निदान गंगा-जमनापर्यंत तरी त्यांच्या भूमिकांतील कौशल्यपूर्ण व्यक्तिदर्शन, भूमिकेचा आब राखणारी ढब, मधाळ शब्दफेक, संयत आणि तरीही सळसळता भावावेश हे सारे निव्वळ अद्वितीय, अतुलनीय असेच होते. त्या काळातील इतर सारे अभिनेते एखादी रचना सुरात गुंफणाऱ्या वाद्यवृंद संचालकाप्रमाणे उगाच हवेत हात फिरवत असताना या माणसाची भारावून टाकणारी स्तब्धता आणि अचूक पवित्रा या बाबी भारतीय चित्रपटसृष्टीत अभिनयाचा मानदंड ठरल्या होत्या.

उलट कृत्रिम नाट्यमयता, आवाजातील टोकाचे चढउतार, ताणलेले जबडे, थरथरते ओठ, जाड जाड भुवया आणि सदैव खालीवर होणारे हात हा त्या काळातील अभिनयाचा रुळलेला शिरस्ता होता. अनेकांनी दिलीपकुमार यांची भ्रष्ट नक्कल केली असली तरी त्यांचे संयत हावभाव आणि आवश्यकतेपुरत्याच हालचाली या गोष्टी त्यांच्या सहकलाकारांना किंवा त्यांच्यानंतर चित्रपटसृष्टीत आलेल्यांना फारशा उमगल्या नाहीत.

ते एकाच वेळी अनेक कामे हातात घेत नसत. त्यामुळे एकूण पन्नासेक चित्रपटच त्यांनी आपल्याला दिले. अगदी त्यांच्या काळाच्या मानानेही ही संख्या अगदी किरकोळ होय. यापैकी काही भूमिका निश्चितच काळाच्या कसोटीला उतरतील आणि टिकून राहतील. पण त्यांची उंची लक्षात घेता अभिनय आणि आपल्याला प्रिय वाटणारी काही सामाजिक कार्ये यांच्या पलीकडे त्यांनी फारसे काही केले नाही हे उघड आहे.

केवळ एकाच चित्रपटाची त्यांनी निर्मिती केली, निदान अधिकृतपणे तरी एकाही चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी  केले नाही. आपल्या अनुभवाचा फायदा दुसऱ्या कुणाला दिला नाही. एखाद्या अभिनेत्याला घडवण्याचे मनावर घेतले नाही.

१९७० पूर्वीची कामे सोडली तर भावी अभिनेत्यांना मार्गदर्शक ठरेल असे काही काम मागे ठेवले नाही. अगदी त्यांचे आत्मचरित्रसुद्धा त्यांच्या जुन्याच मुलाखतींची पुनर्मांडणी आहे. इतिहासातील आपल्या स्थानाचे पुरेपूर भान असलेल्या त्यांच्यासारख्या व्यक्तीने आपल्या काळातील एखाद्या मान्यताप्राप्त श्रेष्ठ निर्मात्याशी, दिग्दर्शकाशी संवाद करून त्याचे दस्तावेजीकरण करायचे किंवा आपले काम आणि त्याचे तंत्र याबाबत काही मार्गदर्शक टिपणे नोंदवायचे का मनावर घेऊ नये, हा खरोखरच चक्रावून टाकणारा प्रश्न होय.

वाचा : रूपेरी पडद्यावर ‘नाच्या’ची परंपरा कशी सुरू झाली?

वाचा : गणपत पाटील : अभिनयाची शिक्षा भोगणारा खरा ‘नटरंग’

आपले अगणित भक्त (Fans) टिकून रहावेत यासाठी कसल्या कसल्या त्रासदायक वेदना सोसाव्या लागतात याबाबत तरी निदान केव्हातरी त्यांनी मोकळेपणाने काही सांगायला हवे होते असे  मला वाटते.

आपण अनिवार्य आहोत अशी वातावरणनिर्मिती करण्यात त्यांचा हात खरोखरच कुणीच धरू शकत नव्हता. यामुळे आपण काम करत असलेला चित्रपट कमअस्सल होत असला तरी  त्याची त्यांना फिकीर नसे. त्यांच्या तरल आणि सूक्ष्म अभिनयकौशल्यापेक्षा त्यांचा हा मागणीनिर्मितीचा वारसाच आजच्या हिंदी चित्रपटसृष्टीत प्रभावी ठरलेला दिसतो.

त्यांच्या काळातील इतर मोठे अभिनेते दरवर्षी दोन किंवा त्याहून अधिक चित्रपट करत असताना दिलीपकुमार यांच्या कामाची सरासरी दोनेक दशके दोन वर्षातून एकच चित्रपट अशी राहिली. यातली प्रत्येक भूमिका श्वास रोखून प्रतीक्षा करायला लावत असे.

अभ्यासूपणा आणि संवेदनशीलता यांचे एक वलय त्यांच्याभोवती निर्माण व्हावे अशीच त्यांची काटेकोरपणे आखणी केली जात असे. त्यांच्या तोलामोलाच्या सहकाऱ्यांपेक्षा ते वरच्या दर्जाचे वाटावेत अशीच या भूमिकांची जाणीवपूर्वक रचना केली जात असे. ते त्यांच्यापेक्षा  वेगळे दिसावेत पण वेगळे पडू नयेत अशी काळजी घेत.

संवादातील काव्यात्म वळणे, विचारपूर्वक घेतलेले पॉजेस, त्यांच्या अभिनयात आणि जीवनातही सुसंस्कृतता आणि शालीनता असल्याची काळजीपूर्वक जोपासलेली प्रतिमा हे या व्यवसायातील त्यांचे मुद्दल होते. ते त्यांच्या समकालीन अभिनेत्याप्रमाणे केवळ एखाद्या अभिनेत्याला समोर ठेवून बेतलेले नव्हते.

ते सभ्यता आणि सुसंस्कृतेच्या त्या मूर्तिमंत अवतारावर- प्रत्यक्ष जवाहरलाल नेहरूंवर बेतलेले होते. पंडितजींनी त्यांना हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रवक्ते होण्याचे आवाहन केले होते. मात्र त्यांच्या जीवनातील अत्यंत कठीण काळात – पाकिस्तानी हेर असल्याच्या हास्यास्पद आरोपाचे ते धनी होत असताना- पंडितजी ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले नाहीत, ही विचित्र विसंगतीच म्हणावी लागेल.

नंतरच्या काळात आपली प्रतिमा त्यांनी पूर्णतः बदलून टाकली. हा प्रयत्न आपल्या अभिनयाचा पट अधिक विस्तृत करण्यासाठी होता, आपली अभिनयक्षमता अजमावण्यासाठी होता की अगोदरच आपली भक्ती करणाऱ्या चाहत्यांची अधिकची मर्जी संपादण्यासाठी होता हे कोणीच सांगू शकणार नाही.

हे एका मानसोपचारतज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार केले असे त्यांनी स्वतः म्हटल्याचे सांगितले जाते. विमल रॉय, मेहबूब खान, के. असिफ आणि बी आर चोप्रा यांच्याबरोबर महत्त्वाची निर्मिती करणारी अर्थवाही चित्रपटांशी असलेली त्यांची नाळ त्यांच्या कारकीर्दीत नेमकी कोणत्या क्षणी तुटली आणि आत्मपूजनाचे पर्व केव्हा सुरू झाले हे नेमके सांगता येत नाही.

वाचा : सलमा आग़ा : बॉलीवूडने नाव ठेवले, तरी ठरली सुपरहिट गायिका

वाचा : मदनमोहन : अविट चालीची गाणी देणारा प्रतिभाशाली संगीतकार

मला वाटते गंगा-जमना नंतर हे घडले. गंगा-जमनापेक्षा सरस अभिनय करण्याचा प्रयत्न ते नेहमी करत राहिले पण कधीही त्यात यशस्वी होऊ शकले नाहीत. माझे हे निदान चुकीचेही असेल. दिलीपकुमारच्या चाहत्यांच्या तीन पिढ्यांची मते याबाबत वेगवेगळी आहेत. मी सांगितले ते केवळ माझ्या पिढीचे मत आहे.

या दिखाऊ व्यवसायात, विशेषतः त्यातील आमच्या छोट्याशा तळ्यात नायकत्व फार काळ टिकत नाही. दिलीपकुमार यांची अदाकारी परिपूर्ण होती. त्यांच्या नुसत्या अस्तित्वाने ते काम करत असलेल्या चित्रपटाची उंची वाढे. त्यांनी आपल्याला हव्या त्या प्रकारच्या चित्रपटासाठी नुसती मान हलवली तरी तो सुरू होऊ शकत होता.

देशातील सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून ते रास्तपणे सर्वमान्य होते. प्रेक्षकांच्या अनेक पिढ्या येऊन गेल तोपर्यंत ते सतत आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होते. अशी सारी परिस्थिती असताना त्यांनी कधीच धोका का पत्करला नाही, ते सतत सावध डावच का टाकत राहिले हे अनाकलनीय वाटते.

दिलीपसाहेबांच्या दर्जाच्या अभिनेत्याच्या वाट्यालाही प्रचंड असुरक्षितता आणि बाह्य जगाची अनभिज्ञता येते, याविषयी कुणाच्या मनात काही शंका असेल तर त्यांनी बहुधा एअर इंडियाच्याच विमानात जे.आर.डी टाटांशी झालेल्या त्यांच्या आकस्मिक भेटीचे वर्णन त्यातील अलिखित बाबीही  समजून घेत वाचावे.

जे.आर.डी.नी त्यांना ओळखले नाही यापेक्षा त्यांनी परस्परांना ओळखले नाही ही गोष्ट अधिक वेधक आहे. चाकोरीपलीकडे जाऊन आपल्या काळानुरूप सत्यान्वेषी पटकथा स्वीकारायला चित्रपटनिर्मात्यांना उद्युक्त करण्यासाठी दिलीपकुमार यांनी आपले वजन का वापरले नाही हे गूढ वाटत नाही.

अशा रीतीने अभिनेत्याच्या योगदानाविषयीची आपली समज ज्यामुळे विकसित झाली असती अशा चित्रपटांऐवजी एकामागून एक प्रेक्षकांच्या कलाने घेणारे, शर्मनाक आणि भंपक चित्रपट त्यांनी निवडले. त्यातल्या काहींनी बक्कळ धंदा केला परंतु माझ्यासह काही सच्च्या प्रशंसकांना त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणे त्यामुळे  भाग पडले.

स्टार झाल्यामुळे माणसांवर विचित्र परिणाम होत असतील तर मग चिरस्थायी दंतकथा बनण्याचा परिणाम अधिकच विचित्र असणार, होय ना?

या अभिनयाच्या व्यवसायाइतके विरोधाभास अन्यत्र कुठे नसतील. प्रेक्षकांचे अस्तित्व तुम्ही पूर्णपणे विसरून जायचे असते आणि त्याचवेळी तुम्हाला त्यांचे पुरेपूर भान राखायचे असते. प्रेक्षक समोर नाहीत असेच तुम्ही मानायचे असते आणि तरी त्यांच्यापुढेच तुम्हाला सादर व्हायचे असते.

जी भूमिका करत आहोत ते पात्रच आपण आहोत, असे तुम्ही मानायचे असते आणि तरी आपण एक वेगळी व्यक्ती आहोत याचे विस्मरण तुम्हाला होता नये. कहर हा की ज्याक्षणी आपण महान अभिनेता आहोत अशी तुमची खात्री पटते, त्याक्षणी तुमचे महान अभिनेतेपण संपुष्टात येते.

ते काही असो. त्यांच्या जादूगिरीबद्दल त्यांच्याशी चिरकाल कृतज्ञ राहतील अशा त्यांच्या लक्षावधी चाहत्यांपैकी  मी एक आहे.

“देवदूतांचे थवे गात गात तुम्हाला तुमच्या विश्रांतीस्थली घेऊन जावोत, सर! धरणी तुमच्यावर अलगद आच्छादन घालो.”

(सदरील लेख १० जुलै २०२१ला इंडियन एक्सप्रेसमध्ये  ‘Requiem for Dilip Kumar and a small complaint’ या  शीर्षकाखाली प्रकाशित झालेला आहे, त्याचे मराठी भाषांतर अनंत घोटगाळकर यांनी केले आहे.)

जाता जाता :