चौदा जुलै १९७५ रोजी मदन मोहन गेला, तेव्हा वाटले की आता सुरांची आणीबाणी निर्माण होते की काय! मदनमोहनच्या पहिल्या ‘आँखें’ या चित्रपटामध्ये लताची गाणी नाहीत. पण त्यानंतर लताने जेव्हा-जेव्हा लाईव्ह शोज केले, तेव्हा तेव्हा ती मदनची गाणी गायची, तेव्हा त्यास सर्वाधिक प्रतिसाद मिळत असे.
‘लग जा गले’ आणि ‘खेलो ना मेरे दिल से’ या गाण्यांच्या कंपोझिशन्स ऐकून एड वेल्चदेखील प्रभावित झाला होता. रॉयल अल्बर्ट हॉल येथील लताच्या गाजलेल्या शोमध्ये रेन ऑर्केस्ट्राचा सहभाग होता आणि त्याचा कंडक्टर वेल्च होता.
२५ जून १९२४ला मदनचा जन्म बगदादमध्ये झाला, हे फार कमी लोकांना माहिती असेल. अर्थात आज तो हयात असता आणि इराकमध्येच असता, तर त्याला नागरिकत्व कायद्याचा लाभ झाला असता का, असा प्रश्न विचारता येईल.
‘दो भाई’ या चित्रपटातील गीताचे गाजलेले ‘मेरा सुंदर सपना बीत गया’, हे गाणे सचिनदेवच्या नावावर असले, तरी त्याची चाल ही मदनने रचलेली आहे. मदन त्यावेळी सचिनदांचा असिस्टंट होता. ‘शबिस्तान’ या सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी त्यातील नट श्याम हा घोड्यावरुन पळत असतानाच्या शॉटमध्ये पडून चित्रीकरणाच्या वेळी मृत्यू पावला.
‘शबिस्तान’चे संगीत दिग्दर्शन सी.रामचंद्र करत होते. परंतु त्यानंतर निर्मात्यांशी त्यांचा वाद झाला आणि मग मदनमोहनने राहिलेले काम पूर्ण केले. संगीतकार श्यामसुंदरचे निधन झाल्यानंतर ‘अलिफ-लैला’ चित्रपटाचे कामही मदनने पूर्ण केले आणि त्याचे कोणतेही श्रेय घेतले नाही.
‘भाई-भाई’ या चित्रपटातील, ‘ऐ दिल मुझे बता दे’, ‘मेरा नाम अब्दुल रहमान’, ‘कदर जाने ना’, ‘मेरा छोटासा देखो ये संसार है’, ‘दिल तेरी नजर में अटका रे’ ही त्यातली एक से एक बेहतरीन गाणी. मदनमोहनचा बॉक्स ऑफिसवर झालेला हा पहिला हिट सिनेमा.
‘कदर जाने ना’ ऐकून बेगम अख्तरने मदनला टेलिफोन करून त्याचे खूप कौतुक केले आणि त्याला हे गाणे म्हणून दाखवायला सांगितले. मदनने टेलिफोनवरून तिला हे गाणे गाऊन दाखवले. एकदा ऐकून समाधान होईना, त्यामुळे मदनने पुन्हा-पुन्हा गाऊन दाखवले.
वाचा : ‘बाबूजी धीरे चलना…’ म्हणणारी सदाबहार शकीला
वाचा : सलमा आग़ा : बॉलीवूडने नाव ठेवले, तरी ठरली सुपरहिट गायिका
प्रयोगधर्मी संगीतकार
‘देख कबिरा रोया’ चित्रपटामध्ये किशोरकुमारचा भाऊ अनुपकुमार आहे. या चित्रपटात ‘मेरी बिना तुम बिन रोये’, हे अहिर भैरवमध्ये आहे. ‘अश्कों से तेरी हमने ये तस्वीर बनाई है’, हे पहाडी रागामध्ये आहे आणि ‘तू प्यार करे या ठुकराए’ हे गीत भैरवीमध्ये आहे. अमिता, अनिता गुहा आणि शुभा खोटे यांनी ही सुंदर गाणी पडद्यावर साकार केली.
आपल्याकडे अनेक चित्रपट गाण्यांमुळेच वाचू शकले आहेत. मदनमोहनने अनेक गाणी रचताना प्रत्येक अंतऱ्याची चाल. वेगवेगळी देण्याचा प्रयोगही केला आहे. उदाहरणार्थ ‘एक हसीन शाम को’, ‘तुम जो मिल गये हो’ किंवा ‘बेताऽब दिल की तमन्ना’ अथवा ‘तुमसे कहूँ एक बात’ वगैरे.
गज़ल या चित्रपटात ‘नगमा ओ शेर की सौगात’, ‘रंग और नूर की बारात’ आणि ‘इश्क की गर्मी ए जजबात’ या तिन्ही गाण्यांत ध्रुपदातील शेवटचे शब्द ‘पेश करूँ’ असे आहेत. पण तिन्ही गाण्यांच्या चाली वेगवेगळ्या रागांत बांधल्या आहेत.
‘चंदन’ या चित्रपटात ‘ये खुले खुले से गेसूँ’, ‘ये उडी उडी सी रंगत’, ‘लोग कहे मेरे नयन बावरे’ या तिन्ही अंतऱ्यांत अलग-अलग चाली आहेत. मागे उत्तम गायकांची निवड करण्यासाठी एक गाण्याची स्पर्धा आयोजित केली गेली होती आणि त्याच्या परीक्षकांमध्ये सी. रामचंद्र, नौशाद, वसंत देसाई व मदन मोहन हे होते.
या समितीने आरती मुखर्जी आणि महेंद्र कपूर यांची निवड केली. मग मदनमोहनने महेंद्र कपूरला संधी दिली. मदनमोहन सहसा पाश्चात्त्य धुनांवर आधारित गाणी करायचा नाही परंतु ‘मेमसाब’ या चित्रपटातील ‘दिल दिल से मिला कर देखो’, हे ‘आयल ऑफ कॅप्री’ या इंग्रजी गाण्यावर आधारलेले होते.
मात्र मदनने ‘तुझे क्या सुनाऊँ मैं दिलरुबा’ हे ‘आखरी दांव’ साठी गाणे तयार केले, तेव्हा ते आपल्या ‘ये हवा ये चांदनी’ गाण्यावर आधारलेले आहे, असे वाटून सज्जाद हुसेन जाम वैतागला होता. मात्र मदनच्या आपकी ‘परछाइयाँ’मधील ‘यही है तमन्ना’, या रफीच्या गाण्यावरून ‘सागर किनारे, दिल ये पुकारे’ हे गाणे आरडीने बांधले आहे.
‘ठंडी हवाएँ’ आणि ‘रहे ना रहे हम’ या गाण्यांचा मीटरही तोच आहे. नौशादचा साथी हा चित्रपट आधी आला आणि मदनचा चिराग चित्रपट नंतरचा. ‘साथी’मध्ये ‘मैं तो प्यार से तेरे’ हे लताचे गाणे आहे. त्याची आणि ‘भोर होते कागा’ या ‘चिराग’ चित्रपटामधील गाण्याची चाल साधारण समानच आहे. परंतु ‘भोर होते कागा’ हे अधिक श्रवणीय आहे.
‘चाचा जिंदाबाद’मधील ‘प्रीतम दरस दिखाओ’ हे गाणे लता आणि मन्ना डेने म्हटले आहे. परंतु अगोदर उस्ताद अमीर खान यांची निवड झाली होती. मात्र इतक्या मोठ्या गायकासमवेत गाणे म्हणणे मला आव्हानात्मक वाटते, असे लताने सांगितले होते. या चित्रपटात एकीकडे शास्त्रोक्त संगीतावरील गाणी आणि दुसरीकडे ‘रॉक अँड रोल’ पद्धतीची धमाल गाणी, अशी व्हरायटी मदनने दिली.
वाचा : राहत इंदोरी : जमिनीशी नाळ जोडलेला कलंदर शायर
वाचा : मराठीतील ‘कोहिनूर-ए-गझल’ इलाही जमादार
डमी व्हॉइसचा गायक
जेव्हा रिमिक्सचा जमाना सुरू झाला, तेव्हा त्याच्या प्रारंभकाळात ‘जरूरत है जरूरत है, हे ‘मनमौजी’मधील मदनने चाल दिलेले गाणे रिमिक्स झाले आणि ‘क्या सूरत है’ म्हणून ते हिट झाले. अर्थात याचे श्रेय मदनला देण्यात आले नाही, हा भाग वेगळा.
‘आँखे’, ‘शबिस्तान’, ‘धुन’ आणि ‘१९५६’चा ‘फिफ्टी-फिफ्टी’ या आपल्या चार चित्रपटांत मदनमोहनने स्वतः गायन केले आहे. त्यापैकी ‘शबिस्तान’मध्ये ‘चिंचपोकळी, चिंचपोकळी’, हे गाणे त्याने शमशाद बेगमसमवेत म्हटले आहे आणि ‘आँखे’मध्येही शमशादसमवेत त्याचे एक गाणे आहे.
मदनमोहनने दोन गाणी लतासाठी डमी व्हॉइस म्हणून गायली. पण त्याच्या निधनानंतर ‘माई री, मैं कैसे कहूँ’ आणि ‘नैना बरसे रिमझिम रिमझिम’ ही गाणी एचएमव्हीने स्वतंत्रपणे रिलीज केली. ‘नैना बरसे’ हे अविस्मरणीय गीत मदनमोहनने १९५२ सालीच रचले होते. पण कोणत्याही चित्रपटात योग्य सिच्युएशन न मिळाल्यामुळे ते तसेच राहिले होते. शेवटी ‘वह कौन थी’मध्ये ते वापरण्यात आले. त्यातलेच ‘लग जा गले’ हे आजही तरुण पिढीला प्रचंड आवडते.
परंतु सुरुवातीला दिग्दर्शक राज खोसलाने ते रिजेक्ट केले होते. मनोजकुमारने त्याला ते घ्यावे असे कन्व्हिन्स केले. ‘नैना बरसे’ या गाण्याचे शुटिंग शिमल्याला निश्चित झाले होते. परंतु तोपर्यंत गाणे रेकॉर्ड झाले नव्हते. शेवटी शूटिंगसाठी मदनने ते आपल्या आवाजात ते ध्वनिमुद्रित केले.
जेव्हा शूटिंग सुरू झाले, तेव्हा साधना त्या गाण्यावर लिपसिंक करत होती. त्यावेळी तिथे हजर असे लोक एक बाई पुरुषाच्या आवाजात गाणे म्हणत आहे, हे बघून दूर चाट पडले होते. 1964 साली ‘वह कौन थी’चे नामांकन फिल्मफेअरसाठी झाले होते. पण नंबर लागला ‘दोस्ती’ या चित्रपटाचा!
हा चित्रपट मी लहानपणी पुण्यात गणेशोत्सवात रस्त्यावर बसून बघितला होता. ‘मेरा साया’च्या वेळीदेखील पुरस्कारासाठी नंबर लागला, ‘बहारो, फूल बरसाओ’ वगैरे गाणी असलेल्या ‘सूरज’ या चित्रपटाचा. त्यामुळे मदनमोहन वैतागला होता.
परिणामी ‘दस्तक’साठी त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तेव्हा तो त्या सोहळ्याला जाणारच नव्हता. संजीव कुमारलाही पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे तो जाणारच होता. संजीवने आग्रह केल्यानंतरच मदन त्याच्याबरोबर दिल्लीला गेला आणि त्यांनी पारितोषिके स्वीकारली.
वाचा : शायर ए आजम ‘साहिर लुधियानवी’ स्त्रियांसाठी मसिहा
वाचा : प्रगतिशील कविंच्या उर्दू शायरीतून ‘नेहरू दर्शन’
अविट गज़लचा निर्माता
मदनचे तलतवर खूप प्रेम होते. त्याला त्याचे गज़लगायन कमालीचे पसंत होते. ‘जहाँआरा’तील गाणी रफीने गावीत, असे दिग्दर्शकाचे मत होते. पण मदनने, किमान तीन तरी गाणी तलतला द्या असा आग्रह धरला होता. शेवटी निर्माता-अभिनेता ओम प्रकाशने मदनची सूचना मान्य केली.
मदन ठाम नसता तर ‘फिर वही शाम’, ‘तेरी आँख के आँसू’, ‘मैं तेरी नजर का सुरूर हूँ’ ही तलतची मोरपिशी गाणी आपल्याला ऐकायला मिळाली नसती. निर्माता एच एस रवैल यांच्या ‘लैला-मजनू’मध्ये किशोरने गाणी गावीत असे त्यांचे मत होते. पण हा विषय बघता आणि खास करून ऋषी कपूरसाठी रफीचा आवाज योग्य ठरेल, असे मदनचे मत होते आणि ते त्यांना मानावे लागले.
त्यानंतर ‘अमर अकबर अँथनी’, ‘हम किसीसे कम नहीं’, ‘सरगम’ अशा अनेक चित्रपटांत रफी हाच ऋषीचा आवाज होता. अर्थात रफीच्या निधनानंतर किशोरकुमारने ऋषीसाठी खूप गाणी गायली. नौशादला भेटलो होतो तेव्हा त्याने सांगितले होते की, मदनचे ‘अनपढ’मधील ‘आपकी नजरों ने समझा’ हे गाणे त्याला अतिशय आवडते.
‘अनपढ’मधील एका गाण्याचे रेकॉर्डिंग सुरू होण्यापूर्वी राजा मेहदी अली खान यांनी यांनी दिग्दर्शकाला सांगितले की, त्याने आणखीन एक गाणे लिहिले आहे. ते वाचून ‘हे तर या सिच्युएशनला अधिकच चांगले गाणे आहे’ असे दिग्दर्शकाचे मत झाले. मग तिथल्या तिथे मदननेही त्याची चाल लावली आणि ते गाणे (आपकी नजरों ने) पुढे वर्षानुवर्षे गाजत राहिले.
उस्ताद विलायत खाँ, अली अकबर खाँ, पंडित राम नारायण, पंडित शिवकुमार शर्मा, पंडित हरिप्रसाद चौरसिया या थोर कलावंतांनी मदनमोहनच्या चित्रपटसंगीतासाठी साथ दिली आहे. प्यारेलालने तर अनेक मदनगीतांमध्ये व्हायलिन वाजवले आहे. ‘दिल की राहें’, ‘हँसते जख्म’ वगैरे चित्रपटांत रईस खानने मदनमोहनसाठी सतार वाजवली आहे.
भूपिंदरला प्रथम संधी ‘हकीकत’द्वारे मदनने दिली. ‘परवाना’, ‘हँसते जख्म’, ‘मौसम’, ‘दिल की राहें’ या चित्रपटांना मदनमोहनने जे संगीत दिले आहे, ते कालसुसंगत आहे. काळाप्रमाणे आपण बदलायला हवे आणि पाश्चात्य शैलीही स्वीकारायला हवी हे त्याने जाणले.
मदनमोहनचे ‘तुम जो मिल गये हो’, हे माझे अत्यंत आवडते गाणे आहे. त्याची चाल खूप वेगळी आणि गुंतागुंतीची आहे. त्यात रचनेतले प्रयोगही दिसतात. मात्र साहेब बहादुर या देव आनंदच्या (आणखी एका भिकार) चित्रपटासाठी मदनने जे गाणे दिले आहे – ‘राही था मै आवारा’ – हे त्याचे शेवटचे गाणे. जे किशोर कुमारने म्हटले आहे.
त्याची चाल त्याने किशोरला समजावून सांगितली होती. मात्र रिहर्सल होऊ शकली नाही. ‘ए बंगाली, मेरा गाना ध्यान से सुनना और कल तैयारी कर के आना और खराब नहीं करना’, असे त्याने गमतीगमतीत किशोरला सांगितले आणि थोड्याच दिवसात मदनमोहनचे निधन झाले. त्यानंतर हे गाणे रेकॉर्ड झाले.
गाण्याचा मुखडा मदनच्या आवाजातही उपलब्ध आहे. अवघ्या ५१ वर्षांचे आयुष्य. परंतु मदनमोहन कोहली या अत्यंत देखण्या, रुबाबदार व प्रतिभाशाली संगीतकाराने एवढे काम करून ठेवले आहे, की त्याची गाणी ऐकून, त्याला भरत जाधवच्या शैलीत ‘मदन सुखाऽत्मेऽ’ अशीच हाक मारावीशी वाटते…
जाता जाता :
लेखक ४५ वर्षे पत्रकारितेत असून, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक विषयावरील वैचारिक लेखन, अध्यापन, पुस्तकलेखन, कादंबरीलेखन करत आले आहेत. ‘बाबू मोशाय’ याच नावाने त्यांनी चित्रपटसंगीत, साहित्य, नाटक या विषयात विपुल लेखन केले आहे. चित्रपट आणि चित्रपटसंगीत विषयावर त्यांची डझनभर पुस्तके
प्रकाशित झाली आहेत.