विज्ञानयुग आणि विज्ञानसाहित्य

विज्ञानकथा का लिहाव्यात?

विज्ञानकथा लिहिताना लेखकासमोर एक विशिष्ट हेतू असू शकेल. त्याला एखादी मनोवेधक वैज्ञानिक कल्पना वाचकापर्यंत आणायची असेल; पण एखाद्या पाठ्यपुस्तकाच्या शैलीत नव्हे. उलट, ती कल्पना गोष्टीरूपाने मांडता आली तर वाचक ती सहजगत्या आत्मसात करू शकेल, अशी भावना लेखकाला प्रेरित करू शकेल.

एखादी कडू गोळी गिळायला त्रास होतो; पण ती साखरेच्या आवरणात रंगीबेरंगी करून दिली तर सहजगत्या घशाखाली उतरते. हे उदाहरण देण्यामागे विज्ञानाला ‘कुरूप’, ‘कडू’ म्हणण्याचा उद्देश नाही, तर त्याकडे पाहण्याचा सामान्यांचा दृष्टिकोन कसा असतो, त्यावर भर देण्याचा आहे. शाळेत ज्या अनाकर्षक तऱ्हेने गणित आणि विज्ञान हे विषय शिकवले जातात, त्यामुळे विज्ञानाबद्दल सामान्य जनमानसात एक प्रकारची भीती वा अनास्था निर्माण झाली आहे.

काही समीक्षकांच्या मते असा एखादा दृष्टिकोन पुढे ठेवून केलेले लिखाण म्हणजे चांगले साहित्य नव्हे. मी अशा समीक्षकांना विचारतो की, एका दृष्टिकोनातून लिहिलेल्या साहित्याला आपण साहित्य मानावयास तयार नसाल, तर मग तुलसीदासाचे रामचरित मानस किंवा महाराष्ट्रातील संतवाङ्मय यांना काय म्हणणार आहात? या साहित्याला तुम्ही चांगले साहित्य म्हणणार नसाल, तर चांगल्या साहित्यासाठी तुमचे वेगळे मानदंड कोणते? पुढे जाऊन पूर्णपणे निर्हेतुक असे साहित्य असते का?

‘पंचतंत्र’ ह्या संस्कृत ग्रंथात नीतीने जगण्यास आवश्यक असे शिक्षण रोचक कथांच्या माध्यमातून दिले आहे. विष्णुशर्मा नावाच्या पंडिताने आपल्या काही नाठाळ शिष्यांना शहाणे करण्यासाठी ह्या उदबोधक कथा सांगितल्या. हे विद्यार्थी सामान्य शालेय शिक्षणास अपात्र ठरले होते; पण ह्या कथामाध्यमातून बरेच काही शिकले. त्याचप्रमाणे विज्ञानाशी फटकून वागणारा सामान्य वाचक विज्ञानकथा-माध्यमातून विज्ञानाशी जवळीक साधू शकेल.

फ्रेड हॉयेल ह्या सुप्रसिद्ध खगोलवैज्ञानिकाने विज्ञानकथा लिहायला सुरुवात केली. त्यामागे एक वेगळेच कारण घडले! १९५०-६०च्या दशकात आरंभिक भागात हॉयेलना एक कल्पना सुचली. अंतराळात तारांदरम्यान असलेला विशाल प्रदेश हायड्रोजन अणूने व्याप्त आहे असा एक सर्वमान्य समज होता.

हायड्रोजन अणूतील संक्रमणामुळे त्यातून २१ सेंटीमीटर लांबीच्या लहरी निघतात व अशा लहरी रेडिओ दुर्बिणीतून प्रत्यक्ष सापडल्या होत्या. त्यापलीकडे जाऊन हॉयेल यांनी असा तर्क उपस्थित केला, की ह्या प्रदेशात विविध रेणूंनी व्याप्त मेघपण आहेत. त्यामागची वैज्ञानिक बैठक मांडणारा संशोधनप्रबंध त्यांनी लिहिला; पण तो प्रसिद्ध करायला कोणी नियतकालिक तयार नव्हते.

कारण बहुतेक शास्त्रज्ञांना ही कल्पना अवास्तव वाटत होती. तेव्हा वैतागून हॉयेल यांनी ही कल्पना एका विज्ञानकथेत घातली व ती ‘द ब्लॅक क्लाऊड’ (कृष्णमेघ) ह्या कादंबरीच्या रुपाने प्रसिद्ध केली. ती कादंबरी कमालीची लोकप्रिय झाली. पुढे १९६० नंतर मिलीमीटर वेव्हलेंग्थच्या लहरींचे टेलिस्कोप प्रचारात आले आणि खगोलशास्त्रज्ञांना अंतराळात रेणूंचे मेघ सापडू लागले – कारण अश्या रेणूंतून मिलिमीटरच्या आसपास लांबीच्या लहरी निघतात.

विज्ञानकथा आणि वास्तविकता

फ्रेड हॉयेलचे उदाहरण अशा विरळ उदाहरणांपैकी आहे, जिथे विज्ञानकथा भविष्यदर्शी ठरली. एच. जी. वेल्स, आर्थर सी क्लार्क, रे ब्रॅडबरी आणि आयझक अॅसीमॉव्ह यांची नावे विज्ञानकथांच्या संदर्भात घेण्यात येतात. कारण त्यांच्या लिखाणात भविष्यातील वास्तवतेचे द्रष्टेपण होते.

एका वैज्ञानिक लेखात १९४५ मध्ये क्लार्क यांनी कल्पना मांडली, की पृथ्वीवर विषुववृत्तावर सुमारे ३८५०० कि. मी. उंचीवर पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरणारा कृत्रिम उपग्रह विषुववृत्तावरून पाहताना डोक्यावर स्थिर असेल व त्याचा उपयोग दळणवळणासाठी करता येईल.

आज जे ‘माहिती तंत्रज्ञाना’चे अफाट साम्राज्य पसरलेले दिसते, त्यामागे हीच कल्पना आहे. क्लार्कच्या कल्पनेनंतर तर २-३ दशकांत ही कल्पना वास्तविक प्रयोगात रूपांतरित झाली.

याहून माफक स्तरावरचे माझे वैयक्तिक उदाहरण नमूद करतो. १९७६ मध्ये मी एक गोष्ट लिहिली होती (धूमकेतू), ज्यात पृथ्वीशी एका धूमकेतूची टक्कर होण्याची संभावना चर्चिली होती. वर्षभरात होणाऱ्या टकरीतून पृथ्वीला व पृथ्वीवासीयांना कसे वाचवायचे? जागतिक स्तरावर वैज्ञानिक एकत्र येऊन धुमकेतूवर अण्वस्त्र धाडायची कल्पना साकार करतात. हे अण्वस्त्र एका अंतराळयानातून धूमकेतूजवळ धाडले जाते व तेथे त्यातून अणुस्फोट घडवून आणला जातो. स्फोटामुळे धूमकेतूला धक्का बसून त्याची दिशा बदलते आणि पृथ्वीवरचे अरिष्ट टळते.

त्यानंतर सुमारे १२-१३ वर्षांनी नासापुढे असा प्रश्न आला होता, की जर एखाद्या लघुग्रहांची किंवा धूमकेत्तूची टक्कर पुढे संभवत असेल तर त्या अरिष्टापासून पृथ्वीचे रक्षण कसे करावे? तेव्हा नासातील शास्त्रज्ञ-तंत्रज्ञ यांनी सुचवलेला उपाय वरील गोष्टीत वापरल्याबरहुकूम होता. इतकेच नव्हे तर काही वर्षातच अमेरिकन शास्त्रज्ञांनी ‘स्पेसवॉच’ नावाचा प्रकल्प चालू केला, ज्यात सौरमालेतील छोट्या मोठ्या वस्तूंची (अशनी, लघुग्रह, धूमकेतू आदी) निरीक्षणे घेऊन त्यांच्या कक्षा ठरवण्यात येतात.

उद्देश हा, की जर त्यापैकी एखादी वस्तू पुढेमागे केव्हातरी पृथ्वीवर आपटणार असेल, तर त्या संकटाचे निवारण वेळीच करायला वरील मार्ग अवलंबिता येईल. गेले वर्षभर सगळ्या जगात कोविडच्या व्हायरसने थैमान घातले आणि बरेच नुकसान केले. एक प्रकारे आपण विज्ञानकथेत वर्णन केलेली स्थिती अनुभवत आहोत. वैज्ञानिक मार्गाने वैद्यकीय लस शोधणे हाच सर्वमान्य उपाय ठरला. कोणत्याही धर्माची कर्मकांडे, फलज्योतिष यांचा उपयोग झाला नाही.

उत्तम आणि निकृष्ट विज्ञानकथा कशा ओळखाव्यात?

या प्रश्नाचे उत्तर देताना आपल्याला विज्ञानकथेच्या दर्जाचे भान ठेवले पाहिजे. सर्वच विज्ञानकथा भविष्यद्रष्ट्या नसतात. उत्कृष्टतेचे वेगवेगळे निकष लावले तर फारच कमी कथा त्यात उतरतील. आपण अशा काही निकषांवर दृष्टिक्षेप टाकू या.

उत्तम विज्ञानकथेच्या गाभ्यात जे काही विज्ञान असते, ते सध्याच्या माहितीप्रमाणे बिनचूक तर असतेच; पण भविष्यात ते कुठे गेलेले असेल याची पण माहिती देणारे असते. अर्थात हे भविष्याचे आडाखे बिनचूक असतीलच असे नाही. पण ते सध्याच्या माहितीशी विसंगत नसावे. हे आडाखे कितपत बिनचूक होते, ते भविष्यकाळ वर्तमानात पोचला की ठरवेलच.

माझ्या लेखी विज्ञानकथेची क्षमता विज्ञान आणि समाज यांच्यातील परस्परसंबंधावर ती किती भाष्य करते यावरदेखील अवलंबून असावी. आज असे अनेक वैज्ञानिक विषय आहेत. स्टेम सेल संशोधन, उपग्रहांतून टेहळणी, क्लोनिंग, अणुइंधनाचा वापर/गैरवापर इत्यादी. त्यांचा समाजाशी घनिष्ट संबंध असतो.

भविष्यातील चित्रे रेखाटताना विज्ञानकथाकार समाजाला काही वैज्ञानिक संशोधनातून उद्भवणाऱ्या धोक्यांपासून सावध करू शकतो. मी १९७५-७७ दरम्यान ‘पुत्रवती भव’ ही गोष्ट लिहिली होती. त्या गोष्टीत गर्भाचे लिंग ठरवता येण्याची क्षमता मिळाली, तर काय गोंधळ उडेल याचे वर्णन केले होते. गर्भलिंग निदानामुळे तशीच परिस्थिती उद्भवलेली आपण पाहतो. गर्भ कन्येचा असल्यास तो पाडण्याचे क्रूर काम होऊ नये म्हणून कायदा करावा लागला.

आपले दैनंदिन व्यवहार मिनिट-तास-दिवस-महिना-वर्ष अशा कालमापकांवर चालतात; पण विश्वातील घटना याहून दीर्घ कालावधीच्या असतात. विज्ञानकथांद्वारे हे फरक व्यक्त करता येतील. माझ्या एका गोष्टीत (अंतराळातील स्फोट) एक सुपरनोवा म्हणजे स्फोट होणारा तारा दाखवला आहे.

स्फोटानंतर त्यातील बहिर्भागातील कण पृथ्वीपर्यंत पोचायला तीन सहस्त्रके लागू शकतात. वैश्विक कालमापनात सुपरनोवा ‘क्षणभंगुर’ असला, तरी स्फोटाच्या घटनेमध्ये मानवाचे दीर्घ कालखंड मावतात, हे त्या गोष्टीतून स्पष्ट होते.

आता थोडक्यात निकृष्ट दर्जाच्या विज्ञानकथा कशा असतात ते पाहू. विज्ञानकथेतले विज्ञान आजच्या विज्ञानाच्या कांकणभर पुढेच गेले असले तरी चालते, हे आधीच मान्य केले आहे; पण असे ‘पुढे’ गेलेले विज्ञान गोष्टीच्या कथानकात चर्चिले गेले असावे. म्हणजे ह्या ‘नव्या’ विज्ञानाची पार्श्वभूमी लेखकाच्या दृष्टिकोनातून वाचकांपर्यंत पोचते; पण पुष्कळ विज्ञानकथात विज्ञानाचे मूळ नियम कारण न देता हवे तसे बदलण्यात येतात. अश्या प्रकारचे एक उदाहरण पहा…

एका अमेरिकन विज्ञानकादंबरीत अंतराळयाने काही वर्षात आपल्या आकाशगंगेच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत जाताना दाखवली आहेत. भौतिकशास्त्राच्या सापेक्षतावाद सिद्धांताप्रमाणे जगात जास्तीत जास्त वेगाने धावू शकतो तो प्रकाश. प्रकाशकिरणे आकाशगंगेच्या चकतीवजा आकाराला- त्याच्या व्यासाइतके अंतर ओलांडायला एक लाख वर्षे घेतात! याचा अर्थ विज्ञानकथेतील याने प्रकाशाच्या हजार-दहा हजार पटीने अधिक वेगाने धावू शकतात. इतकी वेगवान याने बनवण्याचे तंत्रज्ञान कोणते?

त्यांना सापेक्षतेचा वरील नियम मोडणे शक्य कसे झाले, त्यातून प्रवास करणाऱ्या लोकांच्या शरीरधर्मावर इतक्या वेगाचा काय परिणाम होतो, इत्यादी प्रश्नांना लेखकाने पूर्णपणे बगल दिली आहे. अशी ही गोष्ट वाचताना आपण विज्ञानकथा न वाचता परीकथा वाचतोय असे वाटते. परिकथेत एखादी परी राजपुत्राला जादूचे बूट देते, जे घालून तो क्षणार्धात कितीही लांब जाऊ शकतो. याच कारणास्तव मला ‘स्टार वॉर्स’सारख्या फिल्म्सना विज्ञानकथाधारित म्हणावेसे वाटत नाही. त्यातील अंतराळयाने, विचित्र जीवजंतू, महाभयंकर शस्त्रास्त्रे यांचा मुलामा काढला, तर राहते ती सामान्य ‘वेस्टर्न’फिल्म!

काही निकृष्ट विज्ञानकथा वास्तवात भयकथा असतात. अशा कथा खरोखर विज्ञानकथावृक्षाला मारकच म्हटल्या पाहिजेत. कारण त्या वाचताना विज्ञान एक अनाकलनीय पण भीतीदायक विषय आहे, असे वाचकाला वाटते. वास्तवातल्या जगात संहारक शस्त्रास्त्रे आहेत. त्यांच्यापासून मानवतेला असलेला धोका स्पष्ट करणारी उत्तम विज्ञानकथा असू शकते. तशा अनेक कथा-कादंबऱ्या आहेत; पण अशांच्या कथानकात तर्कशून्य भीतीला वाव नसतो. तसेच काही भुताखेतांच्या भयकथात अंधविश्वासांना खतपाणी घातले जाते.

अंतराळयुगातल्या अंधविश्वासांना खतपाणी घालणाऱ्याही काही कथा असतात. ‘बर्मुडा त्रिकोण’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भूप्रदेशात अनाकलनीय असे काही घडत नाही, हे सप्रमाण सिद्ध झाले आहे; तरी इथे काहीतरी गूढ शक्ती आहे किंवा इथे परकीय जीव पृथ्वीवर ढवळाढवळ करण्यासाठी लपून बसले आहेत, अशा कथानकांचा सुळसुळाट दिसतो. त्यात भर पडते उडत्या तबकड्यांची.

अशा यानातून परकीय जीव येऊन पृथीवर लहानमोठी संकटे आणतात ही भावना, कुठलाही पुरावा नसताना, जनमानसात घर करून राहिली आहे. तिला दुजोरा देण्याचे काम अशा विज्ञानकथा करतात.

शेवटी आणखी एक मुद्दा! एखादी विज्ञानकथा व कादंबरी उत्तम वैज्ञानिक कल्पनेवर आधारित असूनही साहित्यिक गुणांच्या अभावामुळे (वाईट लेखनशैली, अपूर्ण स्वभावचित्र इत्यादी) निकृष्ट ठरेल. त्याउलट, विज्ञानात नापास झालेली कादंबरी साहित्यिक गुणांमुळे वाचनीय वाटेल.

अशा स्थितीतही विज्ञानकथेचे निकष लावल्यास मी पहिल्या रचनेला दुसरीपेक्षा अव्वल स्थान देईन. (ऐतिहासिक कादंबऱ्यांच्या बाबतीतही मी असेच परीक्षण करेन. जरी साहित्यरचना म्हणून एखादी कादंबरी गाजली असेल, पण तिने इतिहासाशी प्रतारणा केली असेल, तर ऐतिहासिक कादंबरी म्हणून तिला कमी लेखले पाहिजे.) थोडक्यात, आपण जेव्हा विज्ञानसाहित्याचे मूल्यमापन करतो, तेव्हा ज्या विज्ञानावर ते आधारलेले आहे ते पण तपासले पाहिजे.