स्वातंत्र्य चळवळीत मुसलमानांचा सहभाग

स्वातंत्र्य चळवळीतील प्रवाह आणि मुसलमान

प्रमाणे काँग्रेसचा इतिहास म्हणजे स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास हे समजने चुकीचे आहे, त्याचप्रमाणे गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस ने वेळोवेळी केलेल्या अहिंसक सत्याग्रहामुळेच भारत स्वतंत्र झाला असे मानणे ही चुकीचे आहे. खरे म्हणजे सर्व पक्षातील विविध भाषिक तसेच विविध धर्माच्या स्वातंत्र्य सैनिकांची आपण नोंद घ्यायला हवी.

प्रादेशिक, भाषिक, वैचारिक, धार्मिक कळत आणि नकळत आलेल्या पूर्वग्रहांमुळे वस्तुनिष्ठ इतिहासलेखन झालेले नाही. वस्तुनिष्ठ इतिहासलेखन होऊ शकते का? आणि पूर्वग्रह हे जाणीवपूर्वकच आणले जातात का? याची चर्चा विस्तारभयास्तव येथे थांबवत आहोत.

ख्यातनाम इतिहासकारांकडून सुद्धा पक्षपातीपणा कसा होतो. आर. सी. मुजुमदारांसारख्या इतिहासकाराने स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास लिहितांना हिंदूंना आणि त्यातही बंगाली भाषिक हिंदूंना झुकते माप दिले आहे, असे य. दि. फडकेंनी ‘स्वातंत्र्य आंदोलनातील मुसलमान’ या पुस्तकात दाखवून दिले आहे.

प्रा. दिक्षित यांच्या मते, घडणाऱ्या इतिहासाची वाटचाल जशी विरोधविकासी वा द्वंद्वात्मक (Dialectical) असते. तशीच लिहिल्या जाणाऱ्या इतिहासाची वाटचाल सुद्धा द्वंद्वात्मक असते. उदा. वसाहतवादी इतिहासकारांना प्रतिक्रिया देतांना राष्ट्रवादी इतिहासकारांनी शिवाजी, राणा प्रताप यांना राष्ट्रीय अस्मिता म्हणून मांडले. त्यामुळे मुसलमानांना ‘परके’ ठरविणे सोपे झाले.

राष्ट्रीयत्वाची संकल्पना आणि राष्ट्रवादाची चळवळ युरोपमध्ये औद्योगिक क्रांतीनंतरच्या काळात भांडवलशाही व्यवस्थेची आधारभूत तत्त्व म्हणून विकसित झालेली होती. परंतु भारताच्या राष्ट्रीयत्वाच्या चळवळीचा संदर्भ वेगळा होता.

भारतातील राष्ट्रीयत्वाच्या चळवळीचा उद्देश ब्रिटिश वसाहतवादाविरुद्ध लढा देऊन स्वातंत्र्य मिळवण्याचा होता. असे असतांना चळवळीत फूट पाडण्यासाठी ब्रिटिश सत्ताधाऱ्यांनी भारतामध्ये ‘युरोपकेंद्री’ मांडणी रुजवली. त्यामधून धर्म हाच समाजरचना आणि राष्ट्र्निर्मितीचे तत्व म्हणून मांडला गेला. (प्रा. बेन्नूर, हिंदुत्व, मुस्लिम आणि वास्तव) यामुळे जमातवादी राजकारणाला चालना मिळाली आणि मग मुसलमानांची मुस्लिम लीग आणि हिंदूंची हिंदू महासभा निर्माण झाली.

‘जो मुस्लिम, ख्रिश्चन नाही तो हिंदू’ अशा प्रकारच्या वसाहतिक ज्ञानामुळे मुस्लिम व हिंदू धर्माच्या एकजिनसीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. परंतु १९११ मध्ये दोन लाख गुजराथी अनुयायांनी खानेसुमारीमध्ये आपला धर्म ‘हिंदू मुसलमानी’ असा लिहिला होता व माटावी कणबी या जातीत दोन्ही धर्मांचे आचरण केले जाते असे दिसून आले. (प्रा. बेन्नूर, उपरोक्त, पान-६७)  

प्रा. बेन्नूर म्हणतात, “मुस्लिमांची एकजिनसी मांडणी जरी होत असली तरी प्रत्यक्षात ती अस्तित्वात नसल्यामुळे मुस्लिम स्वातंत्र्य चळवळीतील विविध प्रवाहात दिसतात. भारतीय मुसलमानांच्या राष्ट्रवादासंबंधीची भूमिका समजून घेण्यासाठी इस्लाम, राष्ट्रवाद, अखिल इस्लामवाद (Pan Islam), कौम, मिल्लत, उम्मा, वतन इ. संकल्पनांचा विचार होणे गरजेचे आहे. परंतु अभ्यासकांनी  या संकल्पनांचे आणि शब्दांचे परस्पर विरोधी अर्थ दिल्याने गुंतागुंत वाढली आहे.”(उपरोक्त, पान-१४७).

येथे आपण काहीशी अखिल इस्लामवादाची चर्चा करूया. एकीकडे अखिल इस्लामवादी (Pan Islam) डॉ. इकबाल स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची (इथे इकबाल यांनी स्वतंत्र राष्ट्र असा शब्द प्रयोग केलेला नाही. मुस्लिम बहुल प्रांताना एकत्र करून स्वायत्त प्रांत त्यांना अपेक्षित होता. -संपादक) मागणी करतात तर दुसरीकडे अखिल इस्लामवादी डॉ. मुख्तार अहमद अंसारी अंसारी राष्ट्रवादी म्हणून शेवटपर्यंत काँग्रेसमध्ये राहून पाकिस्तानच्या मागणीला विरोध करतात.

तसेच इस्लामचा जागतिक कीर्तीचा अभ्यास असलेले मौलाना आज़ाद राष्ट्रवादी भूमिकेतून पाकिस्तानला विरोध करतात आणि काँग्रेसमध्येच राहतात, तर खाजगी आयुष्यात कोणतेही धर्माचरण न करता आणि इस्लामचा अभ्यास नसतानाही मुहंमद अली जीना हे धर्मवादी बनतात आणि धर्माच्या नावावर पाकिस्तानची निर्मिती करतात. हे सर्व कसे समजून घ्यायचे? याचा सविस्तर आणि गांभीर्याने इतिहास संशोधकांनी विचार करायला हवा.

वाचा : डॉ. मुंहमद इकबाल यांच्या तत्त्वज्ञानाचे चिंतन

वाचा : शायर ए आजम ‘साहिर लुधियानवी’ स्त्रियांसाठी मसिहा

वाचा : प्रगतिशील कविंच्या उर्दू शायरीतून ‘नेहरू दर्शन’

राष्ट्रवादी मुसलमानांची कोंडी

अखिल इस्लामवादी (Pan Islam) चळवळीचा भारतातील बहुसंख्य मुसलमानांवर प्रभाव होता. सय्यद जमालुद्दीन अफगाणी यांच्या मते अखिल इस्लामवादी विचारसरणी आणि राष्ट्रवादी चळवळ या परस्पर विरोधी नसून त्यांच्यामध्ये सुसंवाद साधणे शक्य आहे. (फडके, पान-१५)

जमालुद्दीन अफगाणीच्या अखिल इस्लामवादाचा हिंदुस्थानातील ज्या मुसलमानांवर प्रभाव पडला होता. त्यामध्ये मौलाना अल्ताफ हुसेन हाली (१८३७-१९१४), मुहंमद इकबाल (१८७६-१९३८), शिबली नोमानी (१८५७-१९१४), मौलाना महमदूल हसन (१८५७-१९२८), मौलाना अब्दुल बारी (१८७८-१९२६), मुहंमद अली (१८७८-१९३१), मौलाना आज़ाद (१८८८-१९५८) हे विद्वान, हकीम अजमल खान (१८६३-१९२७), मुख्तार अहमद अंसारी (१८८०-१९३६) हे डॉक्टर, जाफर अली खान (१८७३-१९५६), हे पत्रकार आणि ओबेदुल्ला सिंधी, मौ. बरकतुल्ला हे सशस्त्र क्रांतिकारी यांचा समावेश होतो.

अखिल इस्लामवादी असलेले अनेक मुस्लिम नेते खिलाफत चळवळीनंतर विविध राजकीय प्रवाहात सहभागी झाले. उदा. डॉ. अंसारी आणि मौलाना आज़ाद हे काँग्रेसमध्ये सक्रीय झाले. मुहंमद अली आणि मुहंमद इकबाल काही काळ काँग्रेसमध्ये राहून मुस्लिम लीगमध्ये गेले.

मौ. ओबेदुल्ला सिंधी आणि  मौ. बरकतुल्ला सारखे लोक शेवटपर्यंत क्रांतिकारी चळवळीत राहिले. या सर्वांच्या प्रेरणा अखिल इस्लामवादी जरी असल्या तरी त्यांचा अर्थ आणि मार्ग वेगवेगळे होते.

काँग्रेसच्या स्थापनेपासूनच राष्ट्रवादी मुस्लिम हे काँग्रेससोबतच होते. त्यामध्ये बदरुद्दीन तय्यबजीपासून डॉ. अंसारी, हकीम अजमल खान, मजरुल हक, हसरत मोहानी, मौलाना आज़ाद, अब्दुल बारी, मुजिबूर रहमान, डॉ. ज़ाकीर हुसैन असे नेते संमिश्र राष्ट्रवादाचा पुरस्कार करीत होते.

काँग्रेसने खिलाफतला पाठिंबा दिल्याने बहुसंख्य मुस्लिम कॉंग्रेससोबत आले परंतु १९२२ साली खिलाफत संपताच काहींनी काँग्रेस सोडली तरी राष्ट्रवादी विचारांचा गट कॉंग्रेससोबतच राहिला.

१९२४ साली डॉ. अंसारींनी ‘अखिल भारतीय राष्ट्रवादी मुस्लिम पक्षा’ची (All India Nationalist Muslim Party) स्थापना केली. तिचा उद्देश मुसलमानांमध्ये राष्ट्रीय भावना जागृत करणे, जमातवाद आणि राष्ट्रविरोधी कृत्यांना विरोध करणे, हा होता.

अखिल भारतीय राष्ट्रवादी मुस्लिम पक्ष हा सुद्धा काँग्रेसच्या राजकारणाचे अपत्य होता. जमात-उल-उलेमा, खुदाई-खिदमतगार, अखिल भारतीय मोमीन परिषद, अहरार पक्ष या काँग्रेससमर्थक मुस्लिम संघटनांसाठी अखिल भारतीय राष्ट्रवादी मुस्लिम पक्ष हे एक विचारपीठ होते.

मुशिरुल हसन यांच्या मते, मुंबईमध्ये सय्यद अब्दुल्ला बरेलवी या ‘बॉम्बे क्रोनिकल’च्या संपादकाने १९२९मध्ये ‘काँग्रेस मुस्लिम पार्टी’ची स्थापना केली होती. या पक्षाचा प्रभाव शहरी भागापुरता मर्यादित होता. अब्बास तय्यबजी आणि पुढे यूसुफ मेहेरअली यांनी पक्षाची धुरा सांभाळली. परंतु झपाट्याने वाढत असलेल्या जमातवादी राजकारणाने आणि ब्रिटिश नीतीमुळे राष्ट्रवादी मुसलमानांची कोंडी झाली. त्यामुळे काँग्रेस मुस्लिम पार्टीचे काम सुद्धा पुढे वाढू शकले नाही.

वाचा : रफिक झकारिया : एक समर्पित राजकारणी आणि विचारवंत

वाचा : भारत-पाकमध्ये दोस्ती करू पाहणारे फिरोज अशरफ

वाचा : ‘औरंगाबाद समाचार’ : निजाम राजवटीतले उर्दू-मराठी द्वि-भाषी वृत्तपत्र

फाळणीला विरोध

१९०५ साली ब्रिटिशांनी बंगालची फाळणी केली. १४ व १५ एप्रील १९०६ रोजी बारिसाल येथे भरलेल्या प्रांतिक अधिवेशनात. बंगालच्या फाळणीचा निषेध करणारा ठराव अतिकउल्लाह यांनी मांडला होता. फाळणीचा निषेध करण्यासाठी ५ सप्टेंबर १९०५ला कलकत्यात १० हजार हिंदू-मुस्लिम विद्यार्थ्यांची संयुक्त फेरी निघाली होती.

या पार्श्वभूमीवर ब्रिटिशांच्या प्रेरणेने आगाखान आणि सलीम उल्लाह यांनी १९०६ साली ढाक्यात मुस्लिम लीगची स्थापना केली. पुढील काही वर्षांनी मुस्लिगमध्ये ‘यंग पार्टी’चे वर्चस्व वाढले आणि मजरूल हक व मुहंमद अली (अली बंधूपैकी) यांच्या आग्रहामुळे लीगने ‘स्वराज्य’ हे आपले ध्येय असल्याचे १९१२च्या अखेर जाहीर केले.

त्यावेळी बॅरिस्टर मुहंमद जीना, हसरत मोहानी हे काँग्रेसमधील मुसलमान लीगचे सभासद बनले. पुढे वसाहतिक सत्तेने ‘राजकीय सुधारणा घडवून आणल्यामुळे संख्येला महत्त्व आले. संख्येच्या राजकारणाने तत्कालीन राजकीय-धार्मिक परिस्थिती झपाट्याने बदलून टाकली.

या संदर्भात निर्माण झालेली योग्य प्रतिनिधित्वाची मागणी पुढे मुस्लिम लीगला स्वराज्यापेक्षा स्वतंत्र मुस्लिम राष्ट्र मागण्याकडे घेऊन गेली. मुस्लिम लीग व मुसलमानांच्या राजकारणातील टप्पे, वसाहतिक सत्तेच्या ‘राजकीय सुधारणांचे राजकारण आणि मुसलमानांचे विविध प्रवाह व वाढते जमातवादी राजकारण यांचा संयुक्त विचार करून मुसलमानांचा अभ्यास करणे खूपच अगत्याचे बनले आहे.

या ठिकाणी टिळक आणि सावरकरांची चर्चा करणे महत्त्वाचे ठरेल, असे आम्हास वाटते. टिळक आणि सावरकरांची विचारधारा हिंदूहिताची होती. दोघांमध्ये काही प्रमाणात वैचारिक सारखेपणा जरी दिसत असला तरी काळाच्या संदर्भामुळे खूपच वेगळेपणा सुद्धा होता.

टिळकांना आयुष्यात दोनदा राजद्रोहाच्या खटल्याला सामोरे जावे लागले. दोन्हीवेळा टिळकांची सुटका होण्यात मुसलमानांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. पहिल्यांदा १८९६मध्ये टिळकांना राजद्रोहाच्या शिक्षा झाली. त्यावेळी वेगवेगळ्या न्यायाधीशांकडे टिळकांच्या वकिलांनी जामीन मिळण्यासाठी अर्ज केले आणि पन्नास हजार रुपये जामीन म्हणून देण्याचेही कबूल केले पण, तरीही तीनवेळा जामीनाचा अर्ज नामंजूर करण्यात आला.

टिळकांवर गंभीर आरोप असल्यामुळे सगळेच न्यायाधीश राजसत्तेसमोर ‘अप्रामाणिक’ ठरवले जाऊ नये म्हणून टाळाटाळ करत होते. चौथा प्रयत्न म्हणून न्यायमूर्ती बदरुद्दीन तय्यबजी यांच्यासमोर टिळकांच्या जामीनाचा अर्ज आला. तय्यबजींनी दोन्ही बाजूच्या भूमिका ऐकून सत्तेची कोणतीही भीती न बाळगता टिळकांना जामीन मंजूर केला. (लईक फतेहअली, बदरुद्दीन तय्यबजी, पान-४०-४१)

दुसऱ्यांदा होमरूल चळवळीच्या काळात म्हणजे १९१६  साली टिळकांना राजद्रोह केला म्हणून शिक्षा झाली. यावेळी टिळकांना जामीन मिळावा म्हणून बॅ. मुहंम्मद अली जीना यांनी काम पाहिले. जीनांनी टिळकांना निर्दोष सोडावले आणि जामीनाची रक्कम सुद्धा कमी करविली. (शशिकांत रामचंद्र मोडक, झुंझार टिळक, पान-६९)  

हेच मुहंमद अली जीना पुढे पाकिस्तानचे जनक बनले. जीनांचा हा सर्व प्रवास कसा झाला हे पाहणे खूपच महत्त्वाचे आहे. सशस्त्र आणि गुप्त पद्धतीने ब्रिटिश विरोधी चळवळी बाबाराव सावरकर आणि वि. दा. सावरकर हे दोन्ही बंधू चालवत होते.

कर्झन वायली व जॅक्सन यांच्या हत्येमध्ये सहभाग असल्यामुळे बाबाराव आणि विनायक सावरकर दोघांनाही काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती. देशभरातून दोन्हींच्या सुटकेसाठी आवाज उठवला जात होता. त्यावेळी ‘बॉम्बे क्रॉनिकल’चे संपादक सय्यद अब्दुल्ला बरेलवी यांनी सुद्धा सावरकर बंधूंच्या सुटकेसाठी लेखन केले होते. (वि. वा. देशपांडे, चंद्रकांत शहासने, क्रांतिवीर बाबाराव सावरकर यांचे संक्षिप्त चरित्र, पान- ४९)

सय्यद अब्दुल्ला बरेलवी यांनी पुढील काळात ‘काँग्रेस मुस्लिम पार्टी’ची स्थापना केली होती हे आपण मागे पाहिले आहे. हल्ली जाणीवपूर्वक वरील दोन्ही घटना दुर्लक्षित केल्या जातात.

वाचा : उर्दू इतिहासलेखनात शिवकालीन ग्रंथांचे महत्त्व

वाचा : डॉ. दाऊद दळवी : एक व्यासंगी इतिहासकार

वाचा : ‘रेनेसां स्टेट’ लिहिणारे गिरीश कुबेर म्हणजे पुरंदरेंचा इंग्लिश अवतार

समाजवादी चळवळीत मुस्लिम

१९१७ साली रशियामध्ये साम्यवादी क्रांती झाली. रशियन क्रांतीचा भारतातील चळवळींवर मोठा प्रभाव पडलेला दिसून येतो. नेहरू, बोस सारखी काँग्रेसमधील तरुण तुर्क काँग्रेसी मंडळी समाजवादाने भारावलेली होती. २० नोव्हेंबर १९२२ ते १० मे १९२३ या काळात रशियात प्रशिक्षण घेतलेल्या २४ जनांची यादी लंडनच्या ‘इंडिया ऑफिस’ने प्रकाशित केली होती. ते सर्व मुसलमान होते आणि अफगाणिस्थानातून रशियाला गेले होते. त्यांची नावे अशी- (१) शहाजानपुरचे हबीब अहमद, (२) लाहोरचे फेरोजुद्दीन, (३) भोपाळचे रफिक अहमद, (४) लाहोरचे अब्दुल मजीद, (५) पेशावरचे अब्दुल कादिर सहराही, ( ६) हरीपुरचे सुलतान अहमद.

(७) पेशावरचे फिदा अली खान (८) पेशावरचे अकबर शहा, (९) हजाराचे गोहर रहमान या नऊ जनांना पामीर मार्गे वायव्य सरहद प्रांतात पकडण्यात आले व त्यांना शिक्षा देण्यात आली. (१०) दिल्लीचे सय्यद रजा, (११) बिकानेरचे शौकत उस्मानी, (१२) लाहोरचे अब्दुल हमीद, (१३) लाहोरचे फजल इलाही, (१४) सियालकोटचे अब्दुल्ला, (१५) रहमत अली झकेरिया.

(१६) पेशावरचे अब्दुल कय्युम, (१७) अब्दुल अजीज, (१८) अली शहा, (१९) हजाराचे गुलाम अहमद खान, (२०) अब्दुल मजीद, (२१) लाहोरचे अब्दुल रहीम, (२२) अब्दुल वारिया, (२३) जालंधरचे इस्माईल आणि (२४) लाहोरचे शफिक अहमद हे चौवीस मुसलमान ताश्कंद येथे १९२० साली त्यांनीच स्थापन केलेल्या पहिल्या कम्युनिष्ट पक्षाचे सदस्य आणि एम. एन. रॉय यांचे सहकारी होते. (फडके, पान-३४). 

त्याचवेळी युरोपात सुद्धा काही भारतीय कम्युनिष्ट चळवळीची मदत घेऊन कार्य करीत होते. ‘इंडियन इंडिपेंडेन्स पार्टी’ नावाची संघटना बोल्शिविकांच्या मदतीने मौलवी बरकतुल्ला बर्लिन येथे (१९२०-२३) चालवित असल्याचे इंग्रज राज्यकर्त्यांच्या टिपणांत नोंदविलेले आढळते. (उपरोक्त, पान-२०)

अशा प्रकारे भारताबाहेर भारतीय कम्युनिष्ट विचारांशी समरस होऊन ब्रिटिश वसाहतवादाविरुद्ध देत होते. त्याचवेळी भारतात सुद्धा साम्यवादी विचारांचा प्रवाह कार्यरत झाला होता.

१९२४ साली सरकारने एम. एन. रॉय, शौकत उस्मानी, मुज्जफर अहमद, श्रीपाद डांगे, गुलाम हुसैन, नलिनी भूषण दासगुप्ता, रामचरणलाल शर्मा आणि लैलापुरचे सिंगा खेलू चट्टीयार या सात जनांवर इंग्रजी राज्य उलथवून टाकण्याचा कट केल्याबद्दल खटला भरला होता. (उपरोक्त, पान-४६)  १९२५मध्ये भारतात साम्यवादी पक्षाची कानपूरमध्ये (मौलान हसरत मोहानी पहिल्या अधिवेशाचे अध्यक्ष होते – संपादक) स्थापना झाली. परंतु साम्यवादी विचारांचे कार्यकर्ते त्याच्या आधीपासून कार्यरत होते.

२५ फेब्रुवारी १९३४ रोजी मिनू मसानी यांनी पुढाकार घेऊन बोलावलेल्या सभेत ‘मुंबई इलाखा काँग्रेस समाजवादी पार्टी’ची स्थापना केली. यामध्ये जयप्रकाश नारायण व राममनोहर लोहिया यांचीही भूमिका महत्त्वाची होती.

दरम्यानच्या काळात काँग्रेसच्या भांडवली राजकारणाबाहेर जाऊन कृती करण्यासाठी १९३६ साली मीरत येथे भरलेल्या काँग्रेस समाजवादी पक्षाच्या अधिवेशनात कम्युनिस्ट पक्षाबरोबर संयुक्त आघाडी स्थापन करण्याचे ठरले. १९३७-३८ या दोन वर्षात कम्युनिष्ट – काँग्रेस समाजवादी पक्षाचे संयुक्त चिटणीस म्हणून सज्जाद झहीर आणि के. एम. अशरफ या दोघांनी काम केले.

पुढील काळात कम्युनिष्ट पक्षाच्या सदस्यांनी पाकिस्तानच्या मागणीला समर्थन दिले तर समाजवादी पक्षाने विरोध केला. ज्याप्रमाणे काँग्रेसच्या अहिंसक आंदोलनात मुसलमान होते, त्याचप्रमाणे काकोरी कटापासून ते गदर पक्ष आणि आज़ाद हिंद सेनापर्यंत सर्व क्रांतिकारी गटांमध्ये मुसलमानांचा सहभाग होता.

अंदमानातील वीस वर्षाच्या वास्तवानंतर सुटका झाल्यावर मुहंमद जफर थानेसरी यांनी उर्दूत ‘तवारीख-इ-अजीब उर्फ काला पानी’ या शीर्षकाचे आत्मचरित्र प्रसिद्ध केले आहे. (मौलाना थानेसरींच्या अंदमानातील अनुभवांविषयी  आणि त्यांच्या आयुष्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी पुढील महत्त्वाचा लेख आवश्य पाहावा – Satadru Sen, Contexts, Representation and the Colonized Convict: Maulana Thanesari in the Andaman Islands, Crime, Histoire & Sociétés / Crime, History & Societies , Vol. 8, No. 2 (2004), pp. 117-139)

विसाव्या शतकात बरीन्द्र घोष, उपेंद्रनाथ बॅनर्जी, वि. दा. सावरकर वगैरे क्रांतिकारकांनी आपले स्वानुभव पुस्तक रूपाने प्रसिद्ध केले या परंपरेची सुरुवात मुहंमद जफर थानेसरींनी केली होती. (फडके, पान-७)

८ फेब्रुवारी १८७२ रोजी अंदमानला भेट देणाऱ्या वाईसरॉय मेयोचा खून शेरअली नावाच्या पठाणाने खून केला. काकोरी कटात अशफाकउल्लाह खान या क्रांतिकारकाला फाशी झाली.

वाचा : भारतीय अल्पसंख्याक समुदायांचे हक्क आणि आव्हाने

वाचा : सावरकरांच्या हिंदुराष्ट्रात वंचितांचे स्थान काय असेल?

वाचा : हिटलरच्या आत्महत्येचा तो शेवटचा क्षण!

मौलवी बरकतुल्लाह

अमेरिकेत स्थापन झालेल्या गदर संघटनेच्या क्रांतिकारकांनी ब्रिटिशांविरोधी सशस्त्र क्रांतीची योजना आखली होती. त्यासाठी १ डिसेंबर १९१५ रोजी अफगाणिस्थानात काबूलला हंगामी सरकार बनविले गेले होते.

राजा महिंद्र वर्मा हे हंगामी सरकारचे अध्यक्ष तर मौलवी बरकतुल्लाह आणि मौलवी ओबेद्दुल्ला सिंधी हे अनुक्रमे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री होते. (उपरोक्त, पान-६) परंतु फितुरीमुळे सशस्त्र क्रांतीची योजना फसली आणि गदर पक्षाचे अनेक क्रांतिकारक पकडले गेले. काहींना फाशी झाली तर काहींना अंदमानमध्ये जन्मठेप भोगावी लागली.

मौलवी बरकतुल्लाह हे अखिल इस्लामवाद, साम्यवाद आणि भारतीय मुक्ती चळवळींमध्ये संवाद ठेवण्याचे काम करत होते. बरकतुल्लाह हे भोपाळ संस्थानातील होते. टोकियो विद्यापीठात (जपान) प्राच्यविद्येचे प्राध्यापक होते. जपानमध्ये असतांना आशियायी देशातील क्रांतिकारकांना साम्राज्यवादविरोधी लढ्यात एकत्र करीत होते.

पुढे अमेरिका, अफगाणिस्थान, जर्मनी आणि पुन्हा अमेरिका असा प्रवास त्यांनी भारतीय क्रांतिकारी चळवळीसाठी केला. गदर पक्षाचे महत्त्वाचे नेते होते.

१९०६मध्ये टिळकांना अटक झाल्यावर बहुतेक टिळक अनुयायांना काही दिवसांसाठी भारत देश सोडण्याचा संदेश मिळाला होता. त्यामुळे रामभाऊ मंडलिक हे जपानला गेले.

“टोकियोत प्रो. बरकतुल्लाह यांचे मला सहाय्य लाभले. भोपाळच्या बेगमने त्यांना तेथे पाठवले होते. ते टोकियो विद्यापीठात प्राच्यविद्येचे प्राध्यापक होते व भारतातील राष्ट्रीय चळवळीशी एकरूप झाले होते. पं. श्यामजी कृष्णवर्मा यांच्या विश्वासातील मंडळींपैकी ते एक असल्याने श्यामजींची पत्रे प्रो. बरकतुल्लांकडे येत.” असे लिहिणाऱ्या रामभाऊ मंडलीकांनी पुढे आपल्या ‘माझा जपानचा प्रवास’ या प्रवासवर्णनात बरकतुल्लांची एका ओळीत सुद्धा चर्चा केलेली नाही.

“बरकतुल्ला हे प्रथम राष्ट्रवादी होते आणि नंतर मुस्लिम होते.” अशी ओळख त्यांची होती. भोपाळ आणि बॉम्बे येथील शिक्षण संपविल्यानंतर इंग्लंडमध्ये लिवरफुल विद्यापीठात शिकवण्यासाठी गेले. इंग्लंडमध्ये असतांनाच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली.

टोकियो विद्यापीठात निवड झाल्यावर मो. बरकतुल्लांनी जपानमध्ये आपल्या राजकीय कृतिकार्यक्रम चालू ठेवला त्यामुळे १९१४मध्ये ब्रिटिश सरकारच्या दबावामुळे जपान सरकारने बरकतुल्लाह यांना विद्यापीठातून काढून टाकले. जपान सोडण्यापूर्वीच बरकतुल्लाह आणि कॅलिफोर्नियातील क्रांतिकारी यांचे संबध आले होते.

कॅलिफोर्नियात पोहचल्यावर बरकतुल्लाह गदर पक्षाचे काम करू लागले. पहिले महायुद्ध सुरू झाल्यावर पहिले जर्मनी आणि नंतर इस्तंबूल येथून इजिप्त आणि मेसोपोटेमियामध्ये ब्रिटिश सत्तेच्याविरोधी प्रचार अभियान सुरू केले होते.

याचकाळात अफगाणिस्थानात गदर पक्षाचे हंगामी भारतीय सरकार स्थापन झाले होते. ज्याची चर्चा आपण मागे केली आहे. अफगाणिस्थानातील हंगामी सरकारचा प्रयत्न फसल्यानंतर बरकतुल्लाह यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेक वर्षे चालवलेले प्रयत्न थांबविले नाहीत. १९१७ साली रशियन क्रांतीनंतर तेथे सत्तेवर आलेल्या लेनिनच्या सरकारशी त्यांनी संधान बांधिले. १९२२ पर्यंत बरकतुल्लाह रशियात होते. भारतीय स्वातंत्र्याच्या संदर्भात लेनिनशी त्यांनी चर्चा केली होती.

पुढे अफगाणिस्थानचा अमीर हा ब्रिटिशांसोबत गेल्यामुळे बरकतुल्लाह बर्लिन येथे गेले. तेथे त्यांनी १९२२-२३मध्ये बोल्शेविकांच्या मदतीने ‘इंडिअन इंडीपेंडेन्स पार्टी’ नावाची संघटना काढली होती. फ्रांसने बंदी घातलेली असताना आणि इंग्लंडने आरोपी म्हणून घोषित केले असतानाही १९२५-२६ साली बरकतुल्लाह जिनेव्हा मध्ये ‘हिंदुस्थान गदर पार्टी’चे काम करत होते. १२ सप्टेंबर १९२७ रोजी अमेरिकेतील सनफ्रान्सिस्को येथे त्यांचे निधन झाले. (फडके, पान-२०/ मईना रामनत, पान-५२२)

ऑक्टोबर १९२७च्या गदर पक्षाच्या मुखपत्राच्या संपादकीयमध्ये म्हटले की, “The loss will not easily be forgotten nor will the gap created soon be filled. Heros like Barakullah are not born every day.”

बरकतुल्लाह यांच्या राजकीय कामाची दखल घेत संपादक पुढे लिहितात की, “For thirty five long years – the period of his exile from India – he wandered from place to place as a political refugee, with a price on his head.” 

याच लेखात बरकतुल्लाह यांच्या योगदानाची चर्चा करतांना म्हटले गेले की, “He lived for India; he died for India.” अंजूप एस. धिल्लन यांनी “Mualana has come and gone.”  या लेखात बरकतुल्लाह यांच्या कार्याचा आढावा घेतला आहे. त्यात ते म्हणतात की, “In the eyes of British government Mualana was a rebel, “a dangerous person,” but for Indians, he is a national hero, a martyr, whose glory will grow when Indians learn more about the life of this hoary Indian sage.”

मौलवी बरकतुल्लाहप्रमाणेच आपले संपूर्ण जीवन क्रांतिकारी आंदोलनात मौलवी ओबेदुल्लाह सिंधी महत्त्वाची भूमिका होती. हे आपण गदर चळवळीची चर्चा करतांना पहिले आहे. १९१५मध्ये गदर आंदोलनाच्या अपयशानंतर मौलवी ओबेदुल्ला सिंधींनी वायव्य सरहद प्रांतात ब्रिटिश सत्तेविरोधात वाढणारा असंतोष तेवत ठेवण्यासाठी आपल्या गतीविधी वाढविल्यात.  

ब्रिटिशांना आपली सत्ता उलथवून टाकण्यासाठी वायव्य प्रांतात होत असलेल्या गुप्त कारवायांची माहिती कळाली आणि ऑगस्ट १९१६मध्ये ‘रेशीमी रुमाल कारस्थान’ उघड झाले. तुर्को-जर्मन मिशनचे सहकार्य घेऊन भारतात ब्रिटिशविरोधी आंदोलन चालविण्यासाठी रेशमी रुमाल कारस्थान रचले गेले होते आणि त्यामध्ये मौलवी ओबेदुल्लाह सिंधी यांची महत्त्वाची भूमिका होती. 

वाचा : बांगलादेश निर्मितीत इंदिरा गांधींची दुर्गादेवींची भूमिका

वाचा : नेताजी, नेहरू आणि ब्रिटिशविरोधी लढा

वाचा : जेव्हा कायदामंत्री डॉ. आंबेडकर उर्दूमधील कामकाज पाहण्यासाठी कोर्टात बसले

आज़ाद हिंद सेनेतील मुस्लिम

भारताच्या क्रांतिकारी आंदोलनात आज़ाद हिंद सेनेची भूमिका महत्त्वाची होती. रासबिहारी बोस यांनी १५ जून १९४२ रोजी बँकाँक परिषदेचे आयोजन केले. सुभाषबाबुंचे येणे शक्य नसल्यामुळे त्यांनी शुभेच्छा पाठविल्या होत्या. बँकाँक परिषदेला आलेल्या ५४ सदस्यांपैकी १० सदस्य मुस्लिम होते. त्यामध्ये हाँगकाँगचे डी. एम. खान, ब्रह्मदेशाचे मुहंमद जफर, मुहंमद याकुब, मुहंमद शफी, मुहंमद शफिक खान, अब्दुल सत्तार, हाँगकाँगचे मेजर रहीम खान, कप्तान मोहम्मद इक्बाल, ए. ए. रशीद, मौलवी अकबर अली इ. हजर होते. (फडके, पान-८६)

पुढील काळात रासबिहारी यांनी सुभाष बोसांकडे आज़ाद हिंद सेनेचे सूत्र दिले. त्यावेळी कृतीकार्यक्रम करण्यासाठी सुभाष बाबूंना पैशाची आवश्यकता होती. त्यासाठी त्यांना आज़ाद हिंद बँक सुरू करायची होती. बँकेला हबीब नावाच्या रंगूनच्या धनाढ्य मुसलमान व्यापाऱ्याने लाखो रुपयांची देणगी दिली.

त्याच दरम्यान नेताजींच्या गळ्यात घातलेल्या एका हाराचा लिलाव पुकारला असतांना हबीबने त्या हाराच्या बदल्यात एक कोटी रुपयांची मालमत्ता आज़ाद हिंद सेनेला दिली. आज़ाद हिंद सेनेच्या सैनिकांमध्ये सर्व जाति- धर्माचे सैनिक होते. स्त्रियांची राणी लक्ष्मीबाईंच्या नावाने स्वतंत्र तुकडी होती.

स्वातंत्र्य लढ्यातील काँग्रेस, लीग, कम्युनिस्ट, समाजवादी पक्ष, क्रांतिकारी सशस्त्र चळवळ या सर्व प्रकारच्या प्रवाहांमध्ये मुस्लिम आपणास दिसून येतात. भारतातील स्वातंत्र्य आंदोलनाच्या मुख्य प्रवाहाच्या बाहेर असलेल्या अनेक प्रांतिक आणि भाषिक चळवळींमध्ये सुद्धा मुस्लिम आपणास दिसून येतात. उदा. शेतकरी आणि कामगारांमध्ये काम करणारी पंजाबची युनिनिस्ट पार्टी आणि बंगालची कृषक प्रजा पार्टी इत्यादी.